आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात 500हून अधिक उपक्रमांसह आयुष स्वच्छता ही सेवा अभियानाने घेतला वेग

Posted On: 24 SEP 2024 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2024

 

आयुष मंत्रालयाने देशभरातील आपल्या अखत्यारितील परिषदा आणि संस्थांच्या सहयोगाने ‘स्वच्छता ही सेवा’ (एसएचएस) अभियानांतर्गत देशात 502 उपक्रमांना सुरुवात केली आहे. या 15 दिवसांच्या अभियानाला 17 सप्टेंबर 2024 रोजी सुरुवात झाली असून ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबवण्यात येणार आहे. ‘स्वच्छतेत लोकसहभाग’, ‘संपूर्ण स्वच्छता’ आणि ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ अशा तीन स्तंभांवर हे अभियान आधारलेले आहे. ‘स्वच्छतेत लोकसहभागां’तर्गत मंत्रालयाने आतापर्यंत  एकूण 227 उपक्रम हाती घेतले  असून त्यामध्ये जन सहभाग, जागरूकतेत वाढ आणि स्वच्छतेला संयुक्त जबाबदारी बनवण्यावर भर आहे. ‘संपूर्ण स्वच्छते’अंतर्गत 90 उपक्रमांची यशस्वी निर्मिती करण्यात आली असून यात दुर्लक्षित भागांमधील अस्वच्छतेची दखल घेण्याचा उद्देश आहे. ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरां’तर्गत 185 उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सफाई कामगारांचे आरोग्य आणि कामादरम्यान परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे हे या उपक्रमांचे उद्दीष्ट आहे.

आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव म्हणाले, “स्वच्छता हे केवळ कर्तव्य नसून देशाप्रती आपल्या समर्पित भावनेची  ग्वाही आहे. आपल्या प्रत्येक कृतीत स्वच्छतेचा अंगिकार करून आरोग्यपूर्ण आणि अधिक सुदृढ भारत घडवण्याची ताकद प्रत्येक नागरिकामध्ये आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ, हरित आणि आरोग्यमय भारत घडवण्यासाठी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आपण सगळे एकत्र येऊया.”

आयुष मंत्रालयाचे अभियान यशस्वीरित्या राबवण्याला गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय आणि जल शक्ती मंत्रालयाने देशभरात स्वच्छता राखण्यासाठी  सहकार्य दिले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अशी त्यांची संकल्पना असून वागणुकीत व सांस्कृतिक बदलाला प्रोत्साहन देण्याचा हेतू केंद्रस्थानी आहे.

स्वच्छ भारत मिशनला सुरुवात झाल्यापासून ते यशस्वी करण्यात एकत्रित जबाबदारीची भावना आणि प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.

दुसरा स्तंभ ‘संपूर्ण स्वच्छते’चा भर स्वच्छता मोहिमा राबवण्यावर  आहे. दुर्लक्षित किंवा आव्हानात्मक ठिकाणी; ज्यांचा अस्वच्छतेसाठी उल्लेख होतो अशी ठिकाणे स्वच्छ आणि आरोग्यमय करण्याचा त्यामागे उद्देश आहे. असे 90 उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले आहेत.

विशेषतः गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना अशी ठिकाणे ओळखून, त्या भागांमध्ये नागरिक व सहयोगी संघटनांना एकत्र आणून महास्वच्छता मोहिमा राबवण्यास यामध्ये प्रोत्साहन दिले जाते.

तिसरा स्तंभ ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरा’त सफाई कर्मचारी, ज्यांना सफाई मित्र असेही म्हटले जाते, त्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि हिताला प्राधान्य दिले जात आहे. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या हेतूने 185 उपक्रमांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, आरोग्य शिबिरांच्या  आयोजनाद्वारे सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबांना आवश्यक आरोग्य सेवांचा पुरवठा होईल यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही सेवा अभियानाने गती घेतली असून ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आयुष मंत्रालयाने या महत्त्वाच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन देशभरात स्वच्छता आणि आरोग्यसंपन्न  संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे.

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058337)