संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 41 व्या भारतीय तटरक्षक दल कमांडर परिषदेचे उद्घाटन

Posted On: 24 SEP 2024 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2024

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज 24 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 41 व्या भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) कमांडर परिषदेचे उद्घाटन केले. ही तीन दिवसीय परिषद नव्याने उदयाला येत असलेली भू-राजकीय परिदृश्ये तसेच सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील गुंतागुंत यांच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक, परिचालनात्मक तसेच प्रशासनिक मुद्द्यांबाबत अर्थपूर्ण चर्चा करण्याच्या दृष्टीने आयसीजी कमांडरना सहभागी करून घेण्यासाठीचा महत्वपूर्ण मंच म्हणून कार्य करेल. 

तटरक्षक दलाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ कमांडरना संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी, निवडक आर्थिक क्षेत्राच्या निरंतर निरीक्षणाच्या माध्यमातून देशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षितता सुनिश्चित करणारे तसेच दहशतवाद आणि शस्त्रे, अंमली पदार्थ तसेच मानवी तस्करीसारख्या अवैध कारवाया रोखणारे भारताचे आघाडीचे दल अशा शब्दात आयसीजीचे वर्णन केले. संकटांच्या काळात आयसीजी चे कर्मचारी ज्या धाडसाने आणि समर्पण वृत्तीने देशाची सेवा करतात त्याची प्रशंसा करत संरक्षणमंत्र्यांनी पोरबंदर येथे नुकत्याच झालेल्या कारवाईत जीव गमावलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली.

अंतर्गत आपत्तींपासून देशाचे संरक्षण करण्यात आयसीजीने दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. मिचुंग चक्रीवादळानंतर चेन्नई येथे झालेल्या तेलगळतीमुळे त्या भागातील किनारपट्टी परिसंस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्या वेळी आयसीजीने दिलेल्या त्वरित प्रतिसादाची देखील राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. 

आयसीजीला सर्वात सशक्त तटरक्षक दलाचे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने स्वतःच्या संकल्पना मांडत संरक्षणमंत्र्यांनी आजच्या अनिश्चित काळात सामोऱ्या येणाऱ्या पारंपरिक तसेच नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी या दलाने मानवाभिमुख स्वरुपाकडून तंत्रज्ञानाभिमुख स्वरूप स्वीकारण्याच्या गरजेवर अधिक भर दिला. सागरी सीमांच्या ठिकाणी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की अशा पद्धतीचे उपक्रम देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी सामर्थ्याचा गुणाकार करणारे म्हणून काम करतात.

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, संरक्षण साहित्य उत्पादन विभाग सचिव संजीव कुमार आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभाग सचिव डॉ.नितेन चंद्र यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात दलाने हाती घेतलेल्या महत्त्वाच्या परिचालनात्मक, सामग्रीविषयक, लॉजिस्टिक्स, मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांचे बारकाईने मूल्यमापन करण्यासाठी ही परिषद वरिष्ठ आयसीजी अधिकाऱ्यांना मंच उपलब्ध करुन देते. देशाच्या सागरी क्षेत्रातील हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रमुख टप्प्यांबाबत देखील हे अधिकारी चर्चा करतील. परिषदेत उपस्थित कमांडर्स केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला अनुसरून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने संरचित विद्यमान आयसीजी प्रकल्पांचे देखील मूल्यमापन करणार आहेत.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058274) Visitor Counter : 57