गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्या निमित्त शहरी आणि ग्रामीण भारताचा कायापालट करण्यासाठी 3 कोटीहून अधिक नागरिक ऐच्छिक श्रमदानात झाले सहभागी
Posted On:
23 SEP 2024 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2024
"स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता,” या संकल्पनेवर आधारित ‘स्वच्छता ही सेवा' 2024 मोहिमेचा आज 7 वा दिवस असून या मोहिमेने एक उल्लेखनीय टप्पा या आधीच गाठला आहे. मोहीम सुरू झाल्यापासून अवघ्या सात दिवसांत, निश्चित करण्यात आलेल्या स्वच्छता लक्ष्य युनिट्सपैकी (CTUs) 25% युनिट्स स्वच्छ जागेत रूपांतरित आणि सुशोभित करण्यात आले आहेत. देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी 5 लाखांहून अधिक स्वच्छता लक्ष्य युनिट्स जे की अंधाऱ्या, आव्हानात्मक आणि दुर्लक्षित ठिकाणी आहेत, त्यांची स्वच्छता करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन - शहर विभाग (SBM-U) स्वच्छतेचे एक दशक पूर्ण होत असताना 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या दोन आठवड्यांच्या कालावधीत राबवला जाणारा हा उपक्रम या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ 2024 साठी, देशभरात स्वच्छता लक्ष्यीत युनिट्स (CTUs), स्वच्छतेमध्ये जन भागिदारी आणि सफाईमित्र सुरक्षा शिबिर या तीन स्तंभांतर्गत 15 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात 3 कोटी नागरिक सहभागी होत आहेत. देशभरात आतापर्यंत 4 लाखाहून अधिक ठिकाणी स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) मध्ये स्वच्छतेचे उपक्रम सक्रियपणे सुरू झाले असून यातून विविध राज्यांमध्ये नागरिकांचा प्रभावी सहभाग दिसून येतो. अशा 1 लाखांहून अधिक युनिट्सचे यापूर्वीच स्वच्छ ठिकाणात परिवर्तन झाले आहे. 45,000 हून अधिक स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) स्वच्छ आणि सुशोभित करून उत्तर प्रदेश या मोहिमेत आघाडीवर आहे.
‘एक पेड माँ के नाम मोहिमे’ अंतर्गत आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात, 7,000 हून अधिक खाऊ गल्ल्या स्वच्छ करण्यात आल्या आणि प्रादेशिक परंपरा दर्शविणारे सुमारे 50,000 सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आले.
विविध केंद्रीय मंत्रालये निश्चित करण्यात आलेल्या स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTU) मध्ये स्वच्छता मोहिमेसाठी, तसेच वृक्षारोपण मोहीम, सायक्लोथॉन, प्लोगाथॉन आणि सांस्कृतिक महोत्सवांसह ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रियपणे सहभागी होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या मोहिमेत विविध उपक्रमांचे नेतृत्व करत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता लक्ष्य युनिट्स (CTUs) मध्ये स्वच्छता मोहीमेचा प्रारंभ केला, स्वच्छतामित्र शिविर आयोजित केले आणि श्रमदान केले. केंद्रीय मंत्री देखील देशभरातील प्रतिज्ञा, वृक्षारोपण मोहीम आणि इतर उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले.
दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये स्वच्छतेसाठी आपल्या समर्पणाची पुष्टी करत अनेक राज्ये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, विश्वासू संस्था, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, केंद्रीय मंत्रालये आणि इतर राज्य सरकारे ‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेत एकत्रित येऊन काम करत आहेत. वाढत्या गतीने आणि सक्रिय देशव्यापी सहभागातून, मोहिमेचा दृश्यमान प्रभाव लक्षणीय बनला आहे. हा सामूहिक प्रयत्न केवळ मोहिमेलाच बळ देत नाही तर कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट असलेल्या स्वच्छ भारत मिशन- शहर विभाग च्या उद्दिष्टांनाही पूर्ततेकडे नेतो.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058074)
Visitor Counter : 60