उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतागृहे बांधल्यामुळे माता-भगिनींच्या जीवनातील शाप दूर झाला आहे - उपराष्ट्रपती जगदीप धनखड


लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनामुळे स्वच्छतेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात लक्षणीय बदल - उपराष्ट्रपती

‘स्वच्छ भारत’ अभियान महिला सक्षमीकरण आणि स्थायी उपजीविका टिकवून ठेवण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे – उपराष्ट्रपती

Posted On: 17 SEP 2024 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोकांच्या स्वच्छतेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला आहे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधोरेखित केले आहे. उपराष्ट्रपती आज राजस्थानमधील झुंझुनू येथील परमवीर पीरू सिंह  सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात 'स्वच्छता ही सेवा - 2024' मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करत होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून केलेली घोषणा ही या दशकातील जगातील सर्वात क्रांतिकारी पाऊल असल्याचे सिद्ध झाले आहे,आणि ते देशातील निरंतर बदलाचे प्रतीक बनले आहे, असे धनखड म्हणाले.गेल्या दशकभरात या मोहिमेमुळे आणि पंतप्रधानांच्या पुढाकारामुळे स्वच्छतेच्या संदर्भात लोकांच्या मानसिकतेत क्रांतिकारी आणि व्यापक बदल झाला आहे", असेही त्यांनी सांगितले.

देशात शौचालयांची कमतरता हा एक शाप होता, जो या मोहिमेद्वारे दूर झाला आहे, असे उपराष्ट्रपतींनी स्वच्छतेत लोकसहभागाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले. "शौचालयांच्या कमतरतेमुळे महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जात होती, मात्र आता मोठ्या प्रमाणावर राबविले जात असलेले हे अभियान हे बहुआयामी विकासात प्रतिबिंबित होत आहे."

उपराष्ट्रपतींनी ‘मेरा युवा भारत’ कार्यक्रमाची प्रशंसा केली. सोबतच, सर्व कुलगुरू, प्राचार्य आणि सर्व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी तरुणांना या कार्यक्रमाशी जोडावे असे आवाहनही केले.

भारतातील कचरा व्यवस्थापनातील आमूलाग्र बदल अधोरेखित करताना धनखड यांनी सांगितले की, "भारत आता जगासमोर एक उदाहरण बनले असून आज कचऱ्यापासून इंधन आणि ऊर्जा निर्माण केली जात आहे."

स्वच्छता ठेवण्याच्या कामात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देताना, उपराष्ट्रपती म्हणाले की,"आपण या कर्मचाऱ्यांना सलाम केला पाहिजे,आपण त्यांना नेहमी सर्वोच्च आदर दिला पाहिजे.कारण ते एका अशा महत्त्वाच्या कार्यात गुंतलेले आहेत जे केवळ समाजासाठीच नाही तर आपल्या वसुंधरेसाठी देखील महत्त्वाचे आहे."

"स्वच्छता ही सेवा आहे. स्वच्छता ही मानवतेप्रती सर्वोच्च बांधिलकी आहे.आपण ती खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे.जेव्हा संपूर्ण समाज एकजुटीने या दिशेने काम करेल, तेव्हाच आपण एका स्वच्छ आणि मजबूत भारताची उभारणी करू शकु, आणि तेव्हाच आपला प्रवास यशस्वी होईल, अशी मला आशा आहे”, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणाचा मजकूर तुम्ही येथे वाचू शकता :  https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2055543


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2055791) Visitor Counter : 48