राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते 8 व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन
Posted On:
17 SEP 2024 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (17 सप्टेंबर 2024) नवी दिल्ली इथे 8व्या भारत जल सप्ताहाचे उद्घाटन केले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पाणीटंचाई झेलणाऱ्या लोकांची संख्या त्यांना पुरेसा पाणी पुरवठा करून कमी करण्याचे ध्येय अखंड मानवतेसाठी अत्युच्च महत्त्वाचे आहे. शाश्वत विकासाच्या ध्येयांमध्ये स्थानिक समुदायांच्या सहभागाने पाणी आणि स्वच्छता व्यवस्थापनाला पाठिंबा देऊन ते बळकट करण्यावर भर दिलेला आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की प्रत्येकाला पाणी पुरवण्यासाठी व्यवस्था करणे आपल्या देशाच्या प्राधान्यक्रमावर प्राचीन काळापासून आहे. लदाखपासून केरळपर्यंत जल संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या परिणामकारक व्यवस्था आपल्या देशात अस्तित्वात होत्या. ब्रिटिश काळात या व्यवस्था हळूहळू लोप पावल्या. आपल्या व्यवस्था निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या होत्या. आपल्या प्राचीन पाणी व्यवस्थापन व्यवस्थांवर संशोधन करून त्यांचा आधुनिक संदर्भ लक्षात घेऊन व्यावहारिक वापर व्हायला हवा.
राष्ट्रपतींनी सांगितले की विहिरी, तळी यांसारखे जलस्रोत आपल्या समाजात शेकडो वर्षांपासून पाण्याच्या बँका असल्यासारखे होते.आपण बँकेत पैसे ठेवतो आणि वापरासाठी हवे असल्यास ते आपल्याला बँकेतून काढून घ्यावे लागतात.तसेच पाण्याचे आहे.लोक आधी पाणी साठवत आणि त्यानंतरच त्यांना ते वापरासाठी उपलब्ध होत असे. पैशाचा अपव्यय करणारे लोक समृद्धीकडून दारिद्र्याकडे जातात. तसेच,पाणीटंचाई ही पावसाचे प्रमाण भरपूर असलेल्या प्रदेशांमध्येही दिसून येते. मर्यादित अर्थार्जन करून पैसा हुशारीने वापरणारे लोक त्यांच्या जीवनात उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणीचा यशस्वीरित्या सामना करतात. तसेच, कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात जलसंचय करू शकणारी गावे पाणीटंचाईच्या काळात सुरक्षित राहतात.राजस्थान आणि गुजरातेतील अनेक भागांत जलसंचयाच्या परिणामकारक पद्धती आत्मसात करून आपल्या प्रयत्नांनी लोकांनी पाणीटंचाईवर मात केली.
राष्ट्रपती म्हणाल्या की वर्ष 2021 मध्ये सरकारने ‘पावसाचे पाणी – जिथे पडेल तिथे, जेव्हा पडेल तेव्हा साठवा’ अशा आशयाचा संदेश देऊन मोहीम सुरू केली. जल संवर्धन, पावसाच्या पाण्याचा संचय आणि जल व्यवस्थापनाशी संबंधित इतर महत्त्वाचे उद्देश हे या मोहिमेचे ध्येय होते. वन संपत्ती वाढल्यानेही पाणी व्यवस्थापनास मदत होते. जल संवर्धन आणि व्यवस्थापनात लहान मुलांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपापली कुटुंबे आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये ती जागरूकता निर्माण करू शकतात आणि स्वतःही पाण्याचा सुयोग्य वापर करू शकतात. जल शक्ती प्रयत्नांचे जन चळवळीत रुपांतर व्हायला हवे; सर्व नागरिकांनी जल-योद्ध्याची भूमिका बजावयास हवी.
राष्ट्रपतींनी सांगितले की ‘भारत जल सप्ताह 2024’चे उद्दीष्ट समावेशी जल विकास आणि व्यवस्थापन आहे. जल शक्ती मंत्रालयाने आपले हे उद्दीष्ट गाठण्यासाठी भागीदारी आणि सहकार्य हे योग्य माध्यम निवडल्याबद्दल त्यांनी मंत्रालयाची प्रशंसा केली.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055712)
Visitor Counter : 83