माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी - 2024 मध्ये नवोदित भारतीय चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी नवीन विभाग स्थापन
"सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024" मध्ये 5 नवे चित्रपट दाखवले जाणार
"भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक" यासाठी दिले जाणार प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपयांचे पारितोषिक
Posted On:
14 SEP 2024 3:25PM by PIB Mumbai
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) - 2024 होणार आहे. एक स्वागतार्ह पाऊलाच्या रुपात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फी - 2024 चा भाग म्हणून नवोदित तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग सुरू केला आहे. "सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024" असे या विभागाचे नाव आहे.
सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024
इफ्फी या विभागाद्वारे, देशभरातील विविध कथा आणि सिनेमॅटिक शैली प्रदर्शित करणाऱ्या नवोदित भारतीय चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या निवडीतून तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि अनोखा कथा मांडणी दृष्टिकोन अधोरेखित होईल. नवीन दिग्दर्शकांच्या कार्याचे प्रदर्शन करून तरुण प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. भारतीय चित्रपटात नवीन दृष्टीकोन आणि कथांचे योगदान देणाऱ्या नवीन दिग्दर्शकांचे काम प्रदर्शित करणारे जास्तीत जास्त 5 नवोदित चित्रपट नियमांचे पालन करुन निवडले जातील आणि हे चित्रपट सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागात दाखवले जातील.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक
या व्यतिरिक्त, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये, भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार देखील प्रदान केला जाईल. या पुरस्काराचा उद्देश पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेचा आणि क्षमतेचा सन्मान करणे तसेच भारतीय चित्रपटांच्या विकासात या दिग्दर्शकाच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे.
"भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक " चे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
पुरस्काराचे नाव - भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार
वर्णन - नवोदित भारतीय दिग्दर्शकाला त्याची किंवा तिची सर्जनशील दृष्टी, कलात्मक गुणवत्ता, कथाकथन आणि एकूण प्रभावासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल
पुरस्कारप्राप्त करणारी व्यक्ती - दिग्दर्शक
पुरस्काराचे स्वरूप
अ. दिग्दर्शकाला प्रमाणपत्र
ब. दिग्दर्शकाला 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक
55 व्या इफ्फीमधील "सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाच्या" प्रवेशिका आता खुल्या असून चित्रपट https://iffigoa.org/festival/indian-debut-director या संकेतस्थळावर सादर केला जाऊ शकतो. 23 सप्टेंबर 2024 ही चित्रपट सादर करण्याची अंतिम मुदत आहे. याबाबतचे इतर संबंधित तपशील www.iffigoa.org वर उपलब्ध आहेत.
या नवोदितांना प्रकाशझोतात आणून, हा विभाग कलेचा अविष्कार करणाऱ्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी इफ्फीची बांधिलकी प्रदर्शित करत आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054994)
Visitor Counter : 123