उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे देशाला त्रास होत आहे हे दुःखद आणि चिंताजनक आहे - उपराष्ट्रपती


उपराष्ट्रपतींनी आज राजस्थान मधील अजमेर येथील केंद्रीय विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित केले

Posted On: 13 SEP 2024 4:15PM by PIB Mumbai

 

राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊनही काही लोक  देशाला त्रास देत आहेत आणि राष्ट्रवादाशी तडजोड करत आहेत याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी आज  चिंता व्यक्त केली.  हे  “घृणास्पद, निंदनीय, दोषास्पद  देशविरोधी वर्तन” आहे असे ते म्हणाले. “कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या  शत्रूंच्या स्वार्थाला प्रोत्साहन  देऊ शकत नाही,” असे ते पुढे म्हणाले.

"घटनात्मक पदावरील व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन राज्यघटनेच्या शपथेचा अवमान करते, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या संस्थांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवते , तेव्हा जग आपल्यावर हसते", असे ते  म्हणाले.

राजस्थानच्या अजमेर स्थित केंद्रीय विद्यापीठात आज एका मेळाव्याला संबोधित करताना धनखड यांनी प्रश्न केला की, "आपल्या राष्ट्रासाठी  योग्य आचरणाला साजेसे नसलेल्या, आपल्या राष्ट्रवादाला चालना न देणाऱ्या कृती करण्याची आपण कल्पना देखील करू शकतो का?" आपल्या विरोधकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करण्यापेक्षा राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, "देशाच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना इतिहासाने कधीही माफ केले नाही."

देशाच्या सीमेपलीकडे पाऊल टाकणारा प्रत्येक भारतीय हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्रवादाचा राजदूत असतो  याची नागरिकांना आठवण करून देत, उपराष्ट्रपतींनी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनुकरणीय नेतृत्वाचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात  विरोधी पक्षनेते असलेले वाजपेयी यांनी जागतिक व्यासपीठावर संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताच्या हिताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले होते.

या पदावरील माझे कर्तव्य राजकारण करणे हे  नाही. राजकीय पक्षांनी त्यांची स्वतःची कामे करावीत. विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन भिन्न असतील आणि शासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असेल. पण एक गोष्ट कायम राहिली पाहिजे: राष्ट्र सर्वोच्च आहे. आम्ही राष्ट्रीय भावना दाबू शकत नाही. जेव्हा देशासमोर आव्हाने येतात तेव्हा आपण  एकजुटीने उभे असतो. आपला  रंग, धर्म, जात, संस्कृती किंवा शिक्षण काहीही असले तरी आपली एकजूट आहे  आणि आपण  एक आहोत”, असे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करून संविधानाचे पालन करावे, त्याच्या आदर्शांचा आणि संस्थांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054680) Visitor Counter : 64