संरक्षण मंत्रालय

तरंग शक्ती सरावामुळे मित्र देशांबरोबरचे सहकार्य, समन्वय आणि विश्वास आणखी मजबूत होईल असा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास


भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प ‘तरंग शक्ती’ सरावामधून प्रदर्शित झाल्याचे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 12 SEP 2024 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024

‘तरंग शक्ती’ हा बहुराष्ट्रीय सराव म्हणजे भागीदार देशांबरोबरचे सहकार्य, समन्वय आणि विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. जोधपूर येथे बहुराष्ट्रीय सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात आयोजित कार्यक्रमात मान्यवर उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, तरंग शक्तीच्या माध्यमातून भारताने सर्व भागीदार देशांबरोबरचे संरक्षण विषयक संबंध अधिक दृढ केले आहेत, आणि कोणत्याही आव्हानाचा आपण एकत्र येऊन सामना करू, असा त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला आहे.

संरक्षण मंत्री म्हणाले, “आजचा हा भव्य कार्यक्रम भारतीय हवाई दलाच्या दिमाखदार कामगिरीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. आपण आता केवळ सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था बनल्याचे यश साजरे करत नसून, आपल्या सशस्त्र दलांना आता जगातील सर्वात शक्तिशाली सशस्त्र दलांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे, याचा अभिमानही बाळगत आहोत.”

संरक्षण मंत्री म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय हवाई दलाकडे केवळ दोन प्रकारच्या लढाऊ विमानांचे सहा स्क्वाड्रन (ताफे) होते. त्याचप्रमाणे बाकीची युद्धसामुग्री जुनी तर होतीच, पण त्याची संख्याही मर्यादित होती. पण आज,जगभरातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि पुढील पिढीच्या उपकरणांनी सुसज्ज होत  भारतीय हवाई दलाने स्वतःचा कायापालट केला आहे.”

ते पुढे म्हणाले, “देशाच्या संरक्षण क्षेत्राने शस्त्रास्त्रे, प्लॅटफॉर्म, लढाऊ विमाने इत्यादींच्या निर्मितीमध्ये स्वदेशीकरणाच्या दिशेने दमदार पावले उचलली आहेत. आज आपण हलकी लढाऊ विमाने, सेन्सर्स, रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध हाताळणीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात स्वावलंबी झालो आहोत.”

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, संरक्षण मंत्र्यांनी इंटरनॅशनल डिफेन्स अँड एरोस्पेस एक्स्पो (IDAX-24), अर्थात आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि हवाई क्षेत्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनातून,स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि हवाई क्षेत्रातील नवोन्मेषाप्रति असलेली भारताची वचनबद्धता प्रदर्शित करण्यात आली आहे.

या प्रदर्शनात स्टार्टअप्स, एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग), आणि हवाई क्षेत्रातील अडुसष्ट मोठ्या उद्योगांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आणि अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान सादर केले.सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात सात देश आणि एकवीस निरीक्षक देशांच्या सहभागाने, IDAX-24 ने आंतरराष्ट्रीय सहयोग, संवाद, सहकार्य आणि कौशल्याची देवाणघेवाण वाढवून संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील भारताचे जगातील स्थान आणखी बळकट केले.


N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 2054247) Visitor Counter : 26