राष्ट्रपती कार्यालय
अबू धाबीच्या युवराजांनी राष्ट्रपतींची भेट घेतली
Posted On:
09 SEP 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024
अबू धाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी आज (9 सप्टेंबर, 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या की, यूएईबरोबर भारताच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीशी सुसंगत असलेली उच्च-स्तरीय प्रतिबद्धतेची दीर्घ परंपरा जारी राखत संयुक्त अरब अमिरातचे नेतृत्व करणाऱ्या तिसऱ्या पिढीचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या,दोन्ही देशांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे गेल्या दशकभरात ऐतिहासिक द्विपक्षीय आणि दूरदर्शी संबंधांमध्ये परिवर्तन झाले आहे.अबू धाबीच्या युवराजांच्या भेटीदरम्यान, नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या अनेक करारांद्वारे आपण ही भागीदारी आणखी वाढवली, याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, यूएईमध्ये 35 लाखांहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्य करतात त्यामुळे उभय देशांमध्ये लोकांचे एकमेकांमध्ये असलेले संबंध या नात्याचा पाया आहेत. विशेषत: कोविडसारख्या महामारीच्या कठीण काळात तिथे वास्तव्य करणाऱ्या भारतीय लोकांची घेतलेली विशेष काळजी, त्यांचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी यूएईच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
भारत आणि यूएईमध्ये एकसंध आणि बहुसांस्कृतिक वारसा असलेला समाज आहे. महात्मा गांधी आणि सन्माननीय महोदय शेख झायेद यांनी दाखवलेला शांतता, सहिष्णुता आणि सौहार्दाचा मार्ग आपल्या राष्ट्रीय चरित्रात खोलवर रुजलेला आहे, याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
अमिराती समाजाच्या सर्व स्तरांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग आणि योगदान याविषयी राष्ट्रपतींना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, भारत आणि यूएई या दोन्ही देशांनी दाखवून दिले आहे की, "महिलांच्या नेतृत्वाखाली होणारा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरू शकतो.’’
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2053238)
Visitor Counter : 49