युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघाचा सत्कार केला, खेळाडूंच्या असामान्य कामगिरीची केली प्रशंसा


पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 03 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताने, टोकियो पॅरालिम्पिकमधील 19 पदकांच्या संख्येला मागे टाकत एकूण 20 पदके मिळवली

भारताने पॅरा-बॅडमिंटनमध्ये पाच पदकांसह आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली

Posted On: 04 SEP 2024 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024

भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघ आज भारतात परतला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे त्यांचा सत्कार केला.

भारतीय पॅरा बॅडमिंटन संघाने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये एकूण 5 पदके (1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य) जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

खेळाडूंना संबोधित करताना डॉ. मांडवीय यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान वाटत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “तुमच्या असामान्य कामगिरीचा संपूर्ण देशाला मोठा अभिमान आहे. तुमचे समर्पण आणि चेतनेने भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.”

अत्यंत थोड्या गुणांनी पदकापासून वंचित राहिलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना डॉ. मांडवीय म्हणाले, “आपण पदके गमावली नाहीत, तर बहुमोल अनुभव मिळवला. मला विश्वास आहे की भविष्यातील पॅरालिम्पिक स्पर्धेत आपल्या पदकांच्या संख्येत आणखी भर पडेल आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण विजेता म्हणून उदयाला येईल.”

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील भारताच्या प्रगतीबद्दल बोलताना, डॉ. मांडवीय यांनी गेल्या दशकभारत ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धांमधील देशाच्या सुधारलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. "गेल्या 10 वर्षात, आपण सातत्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे, जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे," त्यांनी नमूद केले.

पॅरा-ॲथलीट्सना उत्तम सुविधा, प्रशिक्षण आणि सर्वोच्च स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी देऊन, त्यासाठी पाठबळ देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. यापुढेही हे पाठबळ मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले आणि भविष्यातील स्पर्धांमध्ये आणखी वरच्या पातळीवरील यश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पाच पदक विजेत्यांमध्ये नितेश कुमार (सुवर्ण), सुहास एलवाय (रौप्य), तुलसीमाथी मुरुगेसन (रौप्य), नित्या स्रे (कांस्य) आणि मनीषा रामदास (कांस्य) यांचा समावेश आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 03 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताने, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेल्या 19 पदकांच्या संख्येला मागे टाकत एकूण 20 पदके मिळवली आहेत.

पॅरा-ॲथलीट्सनी त्यांचे स्पर्धेतील अनुभव सांगितले आणि सरकारने, विशेषत: टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत पाठबळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना त्यांच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधन संपत्ती  उपलब्ध झाल्याबद्दल या योजनेला त्यांनी श्रेय दिले.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या 13 पॅरा शटलर्सच्या एकूण 19 परदेश दौऱ्यांसाठी  भारत सरकारने सहाय्य केले.


 
S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2051909) Visitor Counter : 58