अवजड उद्योग मंत्रालय
अवजड उद्योग मंत्रालयाने पीएलआय एसीसी योजनेअंतर्गत एका बोलीदाराला 10 गिगावॅट तास क्षमता निर्मितीचे कंत्राट केले प्रदान
Posted On:
04 SEP 2024 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024
केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने एडवांस्ड केमिस्ट्री सेल (एसीसी ) बॅटरी स्टोरेजसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय ) यशस्वी बोलीदाराची निवड जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला क्युसीबीएस प्रणालीच्या आधारे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10 गिगावॅट तास एसीसी क्षमता निर्मितीचे कंत्राट प्रदान करण्यात आले आहे. हा उपक्रम देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि एसीसी बॅटरी उत्पादनात भारताला आघाडीचा देश म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
10 गिगावॅट तास क्षमतेच्या एडवांस्ड केमिस्ट्री सेल उत्पादनासाठी 3,620 कोटी रुपयांच्या कमाल अर्थसंकल्पीय खर्चासह उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेसाठी जागतिक स्तरावर काढलेल्या पुनर्निविदेअंतर्गत सात बोलीदारांकडून अवजड उद्योग मंत्रालयाला बोली प्राप्त झाली होती, ज्याची घोषणा 24 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली होती .
या निविदेला प्रतिसाद म्हणून 70 GWh च्या एकत्रित क्षमतेसाठी बोली सादर केलेल्या बोलीदारांची यादी पुढीलप्रमाणे आहे : एसीएमई क्लीनटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अमारा राजा ॲडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड, लुकास टीव्हीएस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि वारी एनर्जीज लिमिटेड.
सर्व सात (7) बोलींचे मूल्यमापन करण्यात आले आणि आरएफपी अंतर्गत आवश्यकतेनुसार सहा (6) कंपन्यांची वित्तीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली. त्यानुसार, सरकारच्या सीपीपी पोर्टलद्वारे आरएफपी च्या पारदर्शक जागतिक निविदा प्रक्रियेअंतर्गत, तांत्रिक मूल्यमापनाच्या निकालांच्या घोषणेनंतर, 2 ऑगस्ट 2024 रोजी पात्र बोलीदारांसाठी वित्तीय बोली उघडण्यात आली.
पात्र बोलीदारांचे अंतिम मूल्यमापन गुणवत्ता आणि खर्चावर आधारित निवड (QCBS) प्रणालीनुसार करण्यात आले आणि बोलीदारांना त्यांच्या एकत्रित तांत्रिक आणि वित्तीय गुणांच्या आधारे क्रम देण्यात आले. मंत्रालयाने 10 GWh PLI ACC क्षमता निर्मितीचे कंत्राट सर्वात जास्त गुण मिळालेल्या पात्र बोलीदाराला म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला देण्यात आले आहे आणि उर्वरित पाच पात्र बोलीदारांना त्यांच्या क्रमवारीनुसार , दुसऱ्या क्रमांकापासून प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रतीक्षा यादीतले बोलीदार आहेत: एसीएमई क्लीनटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (वेटलिस्ट 1), अमारा राजा ॲडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (वेटलिस्ट 2), वारी एनर्जी लिमिटेड (वेटलिस्ट 3), जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड (4डब्ल्यू), आणि लुकास टीव्हीएस लिमिटेड (वेटलिस्ट 5).
मे 2021 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने एसीसी ची पन्नास (50) गीगा वॅट तास उत्पादन क्षमता साध्य करण्यासाठी 18,100 कोटी रुपये खर्चाच्या उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना असणाऱ्या तंत्रज्ञान स्नेही ‘‘एडवांस्ड केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेज कार्यक्रमाला’ मंजुरी दिली होती. एसीसी पीएलआय बोलीची पहिली फेरी मार्च 2022 मध्ये पूर्ण झाली आणि तीन लाभार्थी कंपन्यांना एकूण तीस (30) गीगा वॅट तास क्षमतेचे वाटप करण्यात आले आणि निवडक लाभार्थी कंपन्यांसोबतच्या कार्यक्रम करारावर जुलै 2022 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2051878)
Visitor Counter : 44