ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेली जाहिरात केल्याबद्दल, शंकर आयएएस या अकादमीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ठोठावला 5 लाख रुपयांचा दंड


शंकर आयएएस अकादमीने दिशाभूल करणारी जाहिरात तात्काळ बंद करण्याचा आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने केला जारी

Posted On: 01 SEP 2024 12:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) शंकर आयएएस अकादमी विरोधात कारवाईचा आदेश जारी केला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त म्हणू अनुपम मिश्रा जबाबदारी सांभाळत आहेत.

दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आयएएस अकादमीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक महत्वाचा घटक या नात्याने ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच कोणत्याही वस्तू अथवा सेवांबद्दलकोणत्याही प्रकारची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तरतुदींचे उल्लंघन करण्याच्या वृत्तीला आळा बसावा या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 18 मधील तरतुदींनुसार, कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या संदर्भात कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून, या कायद्यातील तरतुदींचे किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियम तसेच नियामक तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची खातरजमा करण्याचे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण केंद्राकडे आहेत.

शंकर आयएएस अकादमीने दिलेल्या जाहिरातीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 संदर्भात खाली नमूद दावे केले आहेत-

  • 1. "अखिल भारतीय स्तरावर 933 पैकी 336 जणांची निवड होणार"
  • 2. "सर्वोत्कृष्ट 100 उमेदवारांमध्ये 40 उमेदवार"
  • 3. "तामिळनाडूमधून 42 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, त्यापैकी 37 जणांनी शंकर आयएएस अकादमीमधून शिकवणी घेतली आहे,"
  • 4. "भारतातील सर्वोत्कृष्ट आयएएस अकादमी"

शंकर आयएएस अकादमीने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात केली होती. मात्र वर नमूद केलेल्या जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात, यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली होती असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला या जाहिरातींच्या परिक्षणांमध्ये आढळून आले. ही माहिती लपवल्याने, जाहिरात पाहण्याऱ्यांपर्यत असा संदेश पोहचला की संस्थेने जे उमेदवार यशस्वी झाले आहे असा दावा केला आहे, त्या सगळ्यांनी या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळा वर ज्या सशुल्क अभ्यासक्रमांची जाहिरात केली आहे, तेच अभ्यासक्रम निवडले होते. दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर या जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन ते संस्थेने जाहिरात केलेले सशुल्क अभ्यासक्रम खरेदी करण्याकडे आकृष्ट होतात.

शंकर आयएएस अकादमीने आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या जाहिराती मध्ये 336 उमेदवार यशस्वी झाल्याचा दावा केला होता, मात्र आपल्या उत्तरात त्यांना  केवळ 333 यशस्वी उमेदवारांची माहिती सादर करता आली.  या अकादमीने दावा केलेल्या 336 पैकी 221 विद्यार्थ्यांनी मोफत मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम, 71 विद्यार्थ्यांनी मेन्स टेस्ट सीरिज, 35 विद्यार्थ्यांनी प्रीलिम्स टेस्ट सीरिज, 12 विद्यार्थ्यांनी जनरल स्टडीज प्रीलिम्स कम मेन्स, 4 विद्यार्थ्यांनी प्रीलिम्स टेस्ट सीरिज सह इतर काही मुख्य अभ्यासक्रम (पर्यायी आणि / किंवा सामान्य ज्ञानविषयक अभ्यासक्रम जीएस) घेतले होते. मात्र अकादमीच्या जाहिरीतीत अभ्यासक्रम निवडीबाबतची ही वस्तुनिष्ठ माहिती  उघड केली गेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली असल्याचे निरीक्षण ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोंदवले आहे. सदर माहिती ही अत्यंत महत्वाची होती, मात्र ती लपवून अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीतून, उमेदवारांच्या यशात शंकर आयएएस अकादमीचा नेमका वाटा किंवा भूमिका काय हे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे उमेदवार असलेल्या ग्राहकांना स्पष्टपणे कळत नाही, आणि त्याउलट त्यांच्यावर या जाहिरातीचा दिशाभूल करणारा मोठा प्रभाव पडतो. एका अर्थाने या जाहिरातीमुळे व्यापार व्यवसायाच्या अनुचित पद्धतीपासून ग्राहकांना स्वतःचे संरक्षण करता यावे, याकरता त्यांना संपूर्ण माहिती देण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले असल्याचेही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे.

या सोबतच या जाहिरातीचे परिक्षण करताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असेही अशी 18 प्रकरणेही आढळून आली, ज्यात, उमेदवारांनी शंकर आयएएस अकादमीमधून प्रारंभिक अभ्यासक्रम (Preliminary course) खरेदी केला आहे, आणि त्यांच्या पावतीवर 09 ऑक्टोबर 2022 ही तारीख अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख म्हणून  नमूद केली आहे, मात्र प्रत्यक्षात केद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा 2022 साठीची पूर्व परीक्षा 05 जून 2022 रोजी पार पडली होती, आणि त्या परीक्षेचा निकालही 22 जून 2022 रोजी जाहीर केला गेला होता. याचाच अर्थ असा होऊ शकतो की या उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या आगामी म्हणजेच 2023 साली होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी प्रारंभिक अभ्यासक्रम खरेदी केला आहे. तर त्याचवेळी शंकर आयएएस अकादमीने असा दावा केला आहे की, त्यांचे एकूण निवड झालेल्या यादीमधील उमेदवार हे केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा 2022 च्या परीक्षेतील यशस्वी उमेदवार आहेत.

माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी 10 लाखांहून जास्त उमेदवार अर्ज करत असल्याचे निरीक्षणही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त श्रीमती निधी खरे यांनी आपला आदेश जारी करताना नोंदवले आहे.  त्या अनुषंगाने पाहीले तर शंकर आयएएस अकादमीने केलेली जाहिरात ही ग्राहकांच्या एका वर्गाला म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास उत्सूक असलेल्या उमेदवारांना लक्ष्य करूनच केली आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये संबंधित महत्त्वाची माहिती, इतक्या सत्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे मांडली गेली पाहीजे की, त्यातून ग्राहकांसमोर वस्तुस्थितीविषयीची माहिती अशा काही स्पष्टतेने आणि ठळकपणे मांडली गेली असेल की ग्राहकांकडून चूक होणेच कठीण बाब ठरू शकेल.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 2 (28) (4) मध्ये महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दलची व्याख्या स्पष्टपणे केली गेली आहे. त्यानुसार या अकादमीने दिलेल्या जाहिरातीत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांनाही देणे महत्वाचेच ठरते. कारण संबंधित ग्राहकाला कोणता अभ्यासक्रम आणि कोणती शिकवणी संस्था निवडावी याची योग्य निवड करण्यात अशी माहितीच आधारभूत ठरत असते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच खाजगी शिकवणी संस्था लागलीच वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा भडीमार करायला सुरुवात करतात. त्यांच्या या जाहिरातींमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे ठळकपणे दाखवली जातात. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने महत्वाची माहिती लपवून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केलेल्या अनेक संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने असे निरीक्षणही नमूद केले आहे, की शिकवणी संस्था आपल्या जाहिरातींमध्ये एकसारख्या यशस्वी उमेदवारांची नाव आणि छायाचित्रे ठळकपणे वापरत आहेत, आणि संबंधित यशस्वी उमेदवार हे त्याच शिकवणी संस्थेतच प्रशिक्षण घेतलेले पूर्णवेळ विद्यार्थी होते अशा प्रकारचा आभास निर्माण करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या नोटीसांवर विविध शिकवणी संस्थांनी दिलेल्या उत्तरांचेही प्राधिकरणाने तपासणी केली. त्यात प्राधिकरणाला असे आढळून आले की परीक्षेत यशस्वी झालेल्या बहुतांश  उमेदवारांनी, या शिकवणी संस्थांच्या केवळ मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये किंवा अशा संस्थांद्वारे दिल्या जाणाऱ्या विनामूल्य मार्गदर्शन सत्रांच्या कार्यक्रमांमध्येच सहभाग नोंदवलेला आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की, अनेक संस्थाने यशस्वी झालेले एकसारेखच उमेदवार हे आपेलेच विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे, मात्र त्यांनी संबंधित विद्यार्थ्याने आपल्या संस्थेत कोणता अभ्यासक्रम निवडला होता, त्या अभ्यासक्रमाचा कालावधी काय होता याबद्दलची माहिती मात्र त्यांनी लपवून ठेवली होती. संभाव्य ग्राहक अर्थात परीक्षार्थी विद्यार्थ्याची दिशाभूल करणे हाच ही माहिती लपवण्यामागचा उद्देश होता.

***

S.Tupe/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050606) Visitor Counter : 96