संरक्षण मंत्रालय
भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या नौदलांतील चर्चेची 12 वी फेरी
Posted On:
29 AUG 2024 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या नौदलांतील सहयोगी संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली येथे 27 आणि 28 ऑगस्ट 2024 या कालावधीत या दोन्ही देशांच्या नौदलांतील चर्चेची 12 वी फेरी पार पडली. भारतीय नौदलातील एसीएनएस(एफसीआय) रियर अॅडमिरल निर्भय बापना आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलातील सागरी धोरण विभागाचे मुख्य संचालक रियर अॅडमिरल डेव्हिड मानिंगी मखांटो यांच्या सहअध्यक्षपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या या चर्चेत नौदलांतील संबंध आणि परिचालनात्मक एकतानता आणखी बळकट करण्यासाठी परस्पर बांधिलकीची गरज अधोरेखित करण्यात आली.
भविष्यकालीन सहकार्याची पायाभरणी करत, यावर्षीच्या चर्चांमध्ये सज्जता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी परिचालनात्मक प्रशिक्षण तसेच दोन्ही देशांच्या मंचांमध्ये सुरक्षित माहिती आदानप्रदान विषयक नियमावलीत सुधारणा यांसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याशिवाय, सागरी क्षेत्रात नव्याने उदयाला येत असलेल्या गुंतागुंतींचे निराकरण करण्यासाठी आयबीएसएएमएआर(भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका सागरी सराव) यांसारख्या अविरत आदानप्रदान आणि सराव कार्यक्रमांच्या माध्यमातून परिचालनविषयक परस्परसंवादांचा शोध घेण्यात आला.
या चर्चेदरम्यान, सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट एक्स्चेंजेस (एसएमईई)च्या माध्यमातून हानी नियंत्रण आणि डायव्हिंग सपोर्ट यांसह अणुविषयक, जैविक, रासायनिक संरक्षण (एनबीसीडी) क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्याच्या संधींचा शोध घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. माहितीची वैयक्तिक पातळीवरील देवाणघेवाण, आपापल्या देशातील प्रशिक्षण सुविधांमध्ये अधिक प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम मिळण्याची क्षमता यांवर अधिक जोर देण्यात आला.
सध्या सुरु असलेली ही चर्चा, सागरी सुरक्षेसाठी आणि परीचालनात्मक सहयोगासाठी सामायिक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे आणि ही चर्चा भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकेचे नौदल यांच्यात अधिक दृढ सहकार्य निर्माण होण्यासाठीचा मंच म्हणून कार्य करते.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049875)
Visitor Counter : 46