कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि सर्वसामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित होण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाला असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचा आनंद घेतला असून, लाल चौकातील ‘अहदूस’ उपाहार गृहाला त्यांनी दिलेल्या भेटीतून हे स्पष्ट होत आहे: डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
24 AUG 2024 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि सर्वसामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित होण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाला असल्याचे, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ‘भारत24 न्यूज’ वृत्त वाहिनीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही या प्रदेशात नव्याने प्रस्थापित झालेल्या स्थैर्याचा आनंद घेतला असून, लाल चौकातील ‘अहदूस’ उपाहार गृहाला त्यांनी दिलेल्या भेटीतून हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रदेशात पुन्हा प्रस्थापित झालेली शांतता आणि सर्वसामान्य स्थितीचा हा पुरावा आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
"कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधील मोठ्या लोकसंख्येला नागरिकत्वाचे अधिकार मिळाले, ज्यांना गेली सात दशके त्यापासून वंचित ठेवले गेले होते", असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की जम्मू आणि काश्मीर मध्ये कलम 370 च्या समर्थकांनी आपले राजकीय हित जपण्यासाठी घटनात्मक तरतुदींचा दुरुपयोग केला. पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हा स्वार्थ होता, कारण यामुळे ते केवळ 10% किंवा त्याहूनही कमी मतांनी निवडून येऊन सरकार स्थापन करू शकले, आणि अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या त्यांची घराणेशाही चालू राहिली, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले, “आपण पाचवा वर्धापन दिन साजरा करत असताना, काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा उल्लेख करणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत लोकशाही, प्रशासन, विकास आणि सुरक्षा, अशा चार पातळ्यांवर मोठे परिवर्तन घडले आहे.”
डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले की, पंचायत राज कायद्यातील 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती केंद्रातील काँग्रेस सरकारने आणली, मात्र त्यांच्याच नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये त्या लागू केल्या नाहीत. 2019 पूर्वी केंद्राकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या ठिकाणी लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊ शकले नाही.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि विकास आणण्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना जाते, ज्यांनी या प्रदेशातील नागरिकांना विश्वास दिला आणि आश्वासन दिले की जम्मू-काश्मीर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेल आणि देशाच्या मुकुटातील रत्न म्हणून चमकेल.”
भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस नुकताच साजरा झाला. त्याबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की 55 वर्षांपूर्वी 1969 साली अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवले, त्या क्षणापासून भारताचा अंतराळ प्रवास सुरु झाला. देशातील वैज्ञानिक समुदायाच्या अजोड समर्पणाची त्यांनी प्रशंसा केली, ज्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
2014 सालापासून देशाच्या वैज्ञानिक मोहिमांना गती मिळाली, आणि वैज्ञानिक समुदायाच्या प्रतिभेसाठी अवकाश खुले झाले, याचे संपूर्ण श्रेय, पंतप्रधान मोदी यांनी दिलेले धोरणात्मक पाठबळ आणि त्यांचे नेतृत्व याला असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, ती सुमारे 300 वर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील दशकात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर्स वरून 44 अब्ज डॉलर्स वर पोहोचणार असल्याच्या अर्थमंत्र्यांच्या अंदाजाचा त्यांनी पुनरूच्चार केला.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करून आणि भारताची अफाट क्षमता आणि प्रतिभा जगासमोर स्वतःला सिद्ध करू शकेल, असे अनुकूल वातावरण निर्माण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक विक्रम साराभाई यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशाच्या अंतराळ शास्त्रज्ञांना सक्षम केले आहे.
* * *
M.Pange/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048558)
Visitor Counter : 54