संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली
सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती, प्रादेशिक सुरक्षा विषयक प्रमुख समस्या आणि संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्याच्या मुद्द्यांवर केली चर्चा
अमेरिकेच्या संरक्षण उद्योगातील धुरीणांशी संरक्षण मंत्र्यांनी साधला संवाद
क्षमता विकास आणि औद्योगिक भागीदारीसाठी, संरक्षण क्षेत्रात अमेरिकेबरोबर काम करण्यासाठी भारत उत्सुक असून, त्यामुळे भविष्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करता येईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
24 AUG 2024 10:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आणि काही प्रादेशिक सुरक्षा विषयक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहयोग प्रकल्पांवर तसेच दोन्ही देशांचे उद्योग एकत्र काम करू शकतील अशा संभाव्य क्षेत्रांवरही त्यांनी चर्चा केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टन डीसी येथे यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम, अर्थात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या राउंड टेबल (गोलमेज) बैठकीत अमेरिकेच्या संरक्षण उद्योगातील वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला. या राउंड-टेबल बैठकीत अमेरिकेच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
भारत अमेरिकेच्या गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याचे स्वागत करत असून, कुशल मनुष्यबळ, गतिशील एफडीआय (थेट परदेशी गुंतवणूक), व्यापार स्नेही परिसंस्था आणि देशांतर्गत विशाल बाजारपेठेसह यामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
क्षमता विकास, तसेच चिरस्थायी तंत्रज्ञान आणि औद्योगिक भागीदारीसाठी, अमेरिकेच्या सहयोगाने संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी भारत उत्सुक आहे, जेणेकरून भविष्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करता येईल असे ते म्हणाले. बैठकी नंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
* * *
S.Nilkanth/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048419)
Visitor Counter : 53