पंचायती राज मंत्रालय
15 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंचायत प्रतिनिधी विशेष अतिथी म्हणून होणार सहभागी
नवी दिल्लीत, जनपथ येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात पंचायतींमधील महिलांचे नेतृत्व यावर उद्या राष्ट्रीय कार्यशाळा आणि सत्कार समारंभ
Posted On:
13 AUG 2024 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2024
तळागाळाच्या स्तरावर लोकशाहीचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि पंचायत प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एका ऐतिहासिक उपक्रमांतर्गत पंचायती राज संस्थांमधील (PRIs) निर्वाचित महिला प्रतिनिधी(EWRs)/ निर्वाचित प्रतिनिधी (ERs) यांना दिल्लीत 15 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या 78व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्योत्पादन आणि पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल निमंत्रित निर्वाचित महिला प्रतिनिधी/ निर्वाचित प्रतिनिधींचा उद्या जनपथ येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात त्यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार करतील. उद्या या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येईल. सुमारे 400 विशेष अतिथी, प्रामुख्याने पंचायती राज संस्थांमधील निर्वाचित महिला प्रतिनिधी(EWRs) त्यांच्या पतींसोबत दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळयात सहभागी होतील.
पंचायती राज मंत्रालयाकडून उद्या नवी दिल्लीतील जनपथ येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात सकाळी साडेदहा वाजल्यापासून या निमंत्रित पंचायत प्रतिनिधींच्या सहभागाने पंचायतींमधील महिलांचे नेतृत्व यावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायतींमधील महिला नेतृत्वाला भेडसावणारी आव्हाने आणि असलेल्या संधी यावर या कार्यशाळेत विचारमंथन होईल, ज्यामध्ये यशोगाथांचे दर्शन होईल आणि स्थानिक शासनात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या धोरणांवर चर्चा होईल. सत्कार समारंभाचा भाग म्हणून भाषिणीच्या सहकार्याने बहुभाषिक ई-ग्रामस्वराज मंच सुरू करण्यात येईल. या नाविन्यपूर्ण उपक्रमातून भारतातील सर्व 22 भाषांमध्ये ई-ग्रामस्वराज पोर्टल उपलब्ध होईल, ज्यामुळे विविध भाषिक समुदायांकडून त्याचा वापर वाढेल आणि त्याच्या व्याप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पंचायतींमधील महिलांचे नेतृत्व यावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे थेट वेबकास्टिंग सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू होईल आणि दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलेल्या पंचायत प्रतिनिधींचा सत्कार समारंभ संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढील वेबकास्ट लिंकवर उपलब्ध असेलः
https://webcast.gov.in/mopr थेट वेबस्ट्रीमिंग पंचायती राज मंत्रालयाच्या सोशल मीडिया पेजेसवर उपलब्ध असेल :
X (Twitter): https://x.com/MoPR_GoI;
Facebook: https://www.facebook.com/MinistryOfPanchayatiRaj;
Instagram: https://www.instagram.com/MinistryOfPanchayatiRaj;
and YouTube: https://www.youtube.com/@MinistryOfPanchayatiRaj.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044867)
Visitor Counter : 44