शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे शिक्षण संस्थांसंदर्भातील भारतीय मानांकन 2024 अहवाल जारी


रोजगारक्षमता कौशल्ये हे मानांकनातील प्रमुख घटक – धर्मेंद्र प्रधान

सर्व 58,000 भारतीय उच्च शिक्षण संस्थांचा समावेश मानांकन आणि मूल्यांकन आराखडा मानांकनात व्हायलाच हवा – धर्मेंद्र प्रधान

समग्र श्रेणीत आयआयटी मद्रासने पहिले स्थान कायम राखले

Posted On: 12 AUG 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज शिक्षण क्षेत्रासंदर्भातील भारतीय मानांकन 2024 हा अहवाल जारी केला. हा अहवाल 2015 मध्ये शिक्षण मंत्रालयाने या उद्देशासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखड्याची (एनआयआरएफ) अंमलबजावणी करतो.

मानांकन, मूल्यांकन आणि मान्यता ही एनईपी 2020 ची एक महत्त्वाची शिफारस असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी श्रोत्यांना संबोधित करताना सांगितले. एनआयआरएफ च्या क्रमवारीत एनईपी च्या भावनेचे सखोल प्रतिबिंब ही समाधानकारक बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. अध्यापन, अभिनवता, संशोधन, पदवीचे निकाल आणि इतर बाबींमध्ये उत्कृष्टता दाखविणाऱ्या आणि भारतीय मानांकन 2024 मध्ये अभिमानास्पद स्थान मिळवणाऱ्या सर्व उच्च शिक्षण संस्थांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले.

शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता, कामगिरी आणि सामर्थ्य जाणून घेणे हा विद्यार्थी आणि पालकांचा हक्क आहे त्यामुळे देशातील सर्व 58,000 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश मानांकन आणि मूल्यांकन आराखड्यांतर्गत व्हायला हवा यावर  मंत्र्यांनी भर दिला. रोजगारक्षमता आणि कौशल्यांना प्राधान्य असल्याचे निदर्शनास आणताना प्रधान म्हणाले की आमच्या मानांकन यंत्रणेमध्ये कौशल्याचा देखील मापदंड म्हणून समावेश करणे आवश्यक आहे. अमूर्त पैलू हे शिकण्यासाठी आणि विकासासाठी शक्तिशाली प्रेरणा आहेत. मानांकनाच्या चौकटीत शिक्षणाचे अमूर्त पैलू आणण्यासाठी आपण यंत्रणा आखली पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारतातील उच्च शिक्षण संस्थांचा हा सलग 9 वा भारतीय मानांकन अहवाल आहे. भारतीय मानांकन 2024 अहवालातील चार वेगळ्या अतिरिक्त बाबी पुढीलप्रमाणे आहेत:

  1. राज्य सार्वजनिक विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठे या तीन नवीन श्रेणींचा समावेश; आणि
  2. एनआयआरएफ आराखडा "नवोन्मेष" मानांकनाचे भारतीय मानांकनात एकत्रीकरण.

मुक्त विद्यापीठे, राज्य सार्वजनिक विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठे या तीन श्रेणी जोडून, भारतीय मानांकनाचा विद्यमान पोर्टफोलिओ 16 श्रेणी आणि विषय निहाय वाढला आहे ज्यांना भारतीय मानांकन 2024 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय मानांकन 2024 ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासने सलग सहाव्या वर्षी, म्हणजे 2019 ते 2024 आणि अभियांत्रिकीमध्ये सलग 9 व्या वर्षी, म्हणजे 2016 ते 2024 या कालावधीत समग्र श्रेणीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
  • समग्र श्रेणीतील सर्वोच्च 100 मध्ये 23 राज्य सार्वजनिक विद्यापीठे, 22 खाजगी अभिमत विद्यापीठे, 16 आयआयटी, 9 एनआयटी, प्रत्येकी 7 केंद्रीय विद्यापीठे, प्रत्येकी 7 खाजगी विद्यापीठे, प्रत्येकी 4 एम्स, आयआयएसईआर आणि सरकारी अभिमत विद्यापीठे, 3 अन्य सीएफटीआय आणि 1 महाविद्यालय यांचा समावेश आहे.
  • विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सलग नवव्या वर्षी, म्हणजे 2016 ते 2024 या कालावधीत अव्वल स्थानी आहे. संशोधन संस्था श्रेणीमध्ये ही संस्था सलग चौथ्या वर्षी, म्हणजे 2021 ते 2024 या कालावधीत प्रथम स्थानावर आहे.
  • व्यवस्थापन विषयात अहमदाबाद येथील आयआयएम (IIM) ही संस्था 2020 ते 2024 या कालावधीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान राखून आहे. 2016 ते 2019 या कालावधीत या संस्थेने व्यवस्थापन विषयातील भारतीय क्रमवारीत पहिल्या दोन संस्थामध्ये स्थान मिळवले.
  • नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) सलग सातव्या वर्षी, म्हणजे 2018 ते 2024 या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या शिवाय, एम्स सर्वसाधारण श्रेणीमध्ये 7 व्या स्थानावर आहे.  2023 मध्ये सर्वसाधारण श्रेणीमध्ये एम्स 6 व्या स्थानावर होते.
  • या वर्षी फार्मसीमध्ये नवी दिल्लीतील जामिया हमदर्द  ही संस्था अव्वल स्थानावर आहे. जामिया हमदर्द सलग चार वर्षे, म्हणजे 2019 ते 2022 पर्यंत पहिल्या स्थानावर होती. 2018 आणि 2023 मध्ये ही संस्था फार्मसीमध्ये दुसऱ्या स्थानावर होती.
  • 2017 ते 2023 अशी सलग सात वर्षे आपले पहिले स्थान कायम राखणाऱ्या मिरांडा हाऊसला मागे सारत हिंदू महाविद्यालयाने प्रथमच महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवले. हिंदू कॉलेज 2019, 2022 आणि 2023 मध्ये दुसऱ्या स्थानावर आणि.  2020 आणि 2018 मध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते.
  • आयआयटी रुरकीने सलग चौथ्या वर्षी म्हणजे 2021 ते 2024 या कालावधीत आर्किटेक्चर आणि प्लॅनिंगमध्ये पहिले स्थान कायम ठेवले. 2018 ते 2020 या कालावधीत आयआयटी रुरकी दुसऱ्या स्थानावर होते.
  • बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी ने 2018 ते 2024 या कालावधीत सलग सातव्या वर्षी कायदे विषयात पहिले स्थान कायम ठेवले आहे.
  • दिल्लीतील महाविद्यालयांनी महाविद्यालयांच्या क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखले असून या यादीतील पहिल्या 10 महाविद्यालयांपैकी सहा महाविद्यालये दिल्लीतील आहेत.
  • चेन्नईच्या सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसने सलग तिसऱ्या वर्षी दंत विषयात अव्वल स्थान पटकावले आहे.
  • नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
  • 2024 मध्ये प्रथमच सुरू करण्यात आलेल्या राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये चेन्नईतील अण्णा विद्यापीठ अव्वल स्थानावर आहे.
  • नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ  (IGNOU) हे 2024 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या मुक्त विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये अव्वल आहे.
  • नवोन्मेष प्रकारात कानपूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अव्वल स्थानी आहे.
  • या वर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विद्यापीठ श्रेणीमध्ये पुण्यातील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) अव्वल स्थानावर आहे.

भारतीय क्रमवारी 2024 पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:  https://www.nirfindia.org/

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

* * *

S.Patil/Vasanti/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044720) Visitor Counter : 28