जलशक्ती मंत्रालय

जल जीवन मिशनचा परिणाम


15.04 कोटींपेक्षा (77.87%) जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा होत असल्याची नोंद

Posted On: 08 AUG 2024 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
 

 

देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी भारत सरकार राज्यांच्या भागीदारीतून जल जीवन मिशन (जेजेएम) -हर घर जल राबवत आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये ज्यावेळी जल जीवन मिशन योजना सुरू करण्यात आली, तेव्हा केवळ 3.23 कोटी (16.8%) ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडण्या असल्याची नोंद करण्यात आली.आत्तापर्यंत, 05.08.2024 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, JJM अंतर्गत सुमारे 11.81 कोटी अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना नळपाणी जोडणी प्रदान करण्यात आली आहे. अशा प्रकारे05.08.2024 पर्यंत देशातील 19.32 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 15.04 कोटींपेक्षा जास्त (77.87%) कुटुंबांकडे त्यांच्या घरात नळाने पाणी येत असल्याची नोंद झाली आहे.

जीवनात बदल घडवणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत, ग्रामीण भागातील लोकांच्या घरात पिण्यायोग्य नळाच्या पाण्याचा पुरवठा करून त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.देशभरात मिशनची प्राधान्याने अंमलबजावणी केल्यामुळे,नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था/व्यक्तींद्वारे सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन केले जात आहे. यापैकी काहींची यादी खाली दिली आहे:

  1. जागतिक आरोग्य संघटनेने असा अंदाज वर्तवला आहे की JJM अंतर्गत संपूर्णता प्राप्त केल्याने दररोज 5.5 कोटी तासांपेक्षा जास्त वेळेची प्रामुख्याने महिलांच्या वेळेची बचत होईल, जो वेळ एरव्ही घरगुती गरजांसाठी पाणी भरण्यासाठी खर्च केला जातो.
  2. जागतिक आरोग्य संघटनेने असाही अंदाज वर्तवला आहे की देशातील सर्व घरांसाठी सुरक्षितपणे व्यवस्थापित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित केल्यामुळे अतिसाराच्या आजारांमुळे होणारे सुमारे 400,000 मृत्यू टाळता येऊ शकतात, अशा प्रकारे वाचलेल्या जीवांचा विचार करता अंदाजे 14 दशलक्ष अपंगत्व समायोजित जीवन वर्षांची (DALYs) बचत होऊ शकते.
  3. नोबेल पारितोषिक विजेते प्रा. मायकल क्रेमर यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे की सर्व घरांना सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या कक्षेत आणल्याने पाच वर्षांखालील बालकांमधील मृत्यूचे प्रमाण जवळपास 30% कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच वर्षाला 1,36,000 जीव वाचू शकतील.
  4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या भागीदारीत  जल जीवन मिशनच्या रोजगार क्षमतेचा अंदाज वर्तवला आहे. दोन संस्थांनी जारी केलेल्या अहवालात असा अंदाज वर्तवला आहे की जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीमुळे जल जीवन मिशनच्या कॅपेक्स(भांडवली खर्च) टप्प्यात थेट 59.9 लाख मानव -वर्षे  आणि 2.2 कोटी अप्रत्यक्ष मानव -वर्षे रोजगार मिळतील. शिवाय, मिशनचे परिचालन आणि देखभालीमुळे 13.3 लाख मानव -वर्षांचा थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी,  दर्जेदार साहित्य आणि दर्जेदार बांधकाम झाल्याची सुनिश्चिती शुल्क चुकते करण्यापूर्वी त्रयस्थ पक्षाकडून केली जात आहे. त्याबरोबरच पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रभावी देखरेखीसाठी एक ऑनलाईन ‘जेजेएम डॅशबोर्ड’ आणि मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे, जे राज्य/केंद्रशासित प्रदेश, जिल्हा आणि गावनिहाय प्रगतीची तसेच ग्रामीण घरांना नळाने पाणीपुरवठ्याच्या स्थितीची माहिती पुरवते. त्याशिवाय ग्रामीण समुदायांमध्ये आणि पंचायतींमध्ये योजनांविषयी मालकीची भावना निर्माण करण्यासाठी पाणीपुरवठा प्रणालीशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये गाव पातळीवरील नियोजन आणि  लोकसहभागाच्या पैलूंचा जेजेएमच्या रचनेत समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2043181) Visitor Counter : 42