युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सरबजोत सिंगच्या नेतृत्वाखालील सहा नेमबाजांचा क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे केला सत्कार
Posted On:
01 AUG 2024 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाने बजावलेल्या प्रभावी कामगिरीची दखल केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घेतली आहे.उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सहा नेमबाजांचा आज मायदेशी परतल्यावर सत्कार करण्यात आला.यावेळी युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेदेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकरसह कांस्यपदक पटकावणारा सरबजोत सिंग होता.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या रोख पुरस्कार योजनेचा भाग म्हणून डॉ. मांडविया यांनी 22.5 लाख रुपयांचा धनादेश सरबजोत सिंग याला प्रदान केला.या कार्यक्रमात अर्जुन बाबुता, रमिता जिंदाल, रिदम सांगवान, संदीप सिंग आणि अर्जुन सिंग चीमा तसेच त्यांचे प्रशिक्षक सुमा शिरूर, समरेश जंग आणि सरबजोतचे वैयक्तिक प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या योगदानाचीही दखल घेण्यात आली.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अर्जुन बाबुताचे पदक थोडक्यात हुकले आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत तो चौथ्या क्रमांकावर राहिला.
सत्कार समारंभात डॉ.मांडविया यांनी खेळाडूंचे कौतुक केले."तुम्ही प्रत्येक जण चॅम्पिअन आहात.तुमच्यापैकी काहींना अगदी थोडक्यात पदक हुकल्याचे स्वीकारणे जड गेल्याची जाणीव मला आहे.पण यामुळे तुमची खेळाबद्दलची आवड, ध्यास कमी होऊ देऊ नका. ही हळहळ भविष्यातील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठीची तुमची प्रेरणा ठरू दे",असे ते म्हणाले.
खेलो इंडिया उपक्रमाचा प्रभाव डॉ. मांडवीय यांनी अधोरेखित केला,ते म्हणाले,"या खेपेला 117 खेळाडूंपैकी 70 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा सहभागी झाले आहेत, ही देशातील उदयोन्मुख प्रतिभेची ग्वाही आहे. या 117 खेळाडूंपैकी 28 जण खेलो इंडियातून पुढे आले असून ते आता टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचा भाग आहेत. सातत्यपूर्ण कामगिरी राखून त्यांनी तळागाळापासून ते उच्चस्तरीय अशा दोन्ही योजनांचा लाभ यशस्वीरित्या मिळवला आहे."
खेळाडूंची मेहनत आणि खेळाप्रती वचनबद्धतेच्या मुद्द्यावर भर देत डॉ. मांडवीय म्हणाले,"सरबजोत हे या खेलो इंडिया ते टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना अशा चढत्या भाजणीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. मात्र,केवळ पाठिंबा देणे ही यशाची खात्री नसते; तर खेळाडूचे कष्ट, त्यांच्या पालकांकडून, प्रशिक्षकांकडून व त्यांच्या भोवती असलेल्या सगळ्यांकडूनच मिळणारे प्रोत्साहन अंतिम विजयासाठी महत्त्वाचे ठरते."
कांस्य पदक विजेता सरबजोत 2019 पासून खेलो इंडिया शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडू आहे. अर्जुन चीमा, ऱ्हिदम संगवान, अर्जुन बाबुता आणि रामिता हे देखील या योजनेचे लाभार्थी असून पुढे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचा भाग झाले आहेत.
या संवादादरम्यान, पॅरीस ऑलिम्पिक्समधील आपले अनुभव नेमबाजांनी सामायिक केले आणि आता भारतात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी, क्रीडा विज्ञान व प्रशिक्षणादी सुविधांची प्रशंसा केली. पॅरीस ऑलिम्पिक्सपर्यंतच्या त्यांच्या प्रवासासाठी सरकारकडून मिळालेल्या पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
S.Kane/S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040506)
Visitor Counter : 104