युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसाळे याला कांस्य पदक


भारताला पॅरीस 2024 ऑलिंपिक्स मध्ये तिसरे पदक

Posted On: 01 AUG 2024 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

पॅरीस ऑलिम्पिक्समध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन (3पी) प्रकारात भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्निलने चिकाटी आणि अचूकतेचे उत्तम दर्शन घडवत हे टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स दर्जासाठी योग्य खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. प्रत्येक फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने एकूण 451.4 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आणि देशासाठी कांस्य पदक जिंकले. भारताचे हे पॅरीस ऑलिम्पिक्समधील तिसरे पदक ठरले असून ही तिन्ही पदके नेमबाजीच्या विविध प्रकारांमध्ये मिळाली आहेत.

पात्रता फेरी –

पात्रता फेरीत 590 गुणांसह 7वा क्रमांक मिळवून स्वप्निलने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला अंतिम विजेत्यांमध्ये स्थान मिळवता आले.

पॅरीस ऑलिम्पिक्ससाठी सरकारच्या महत्वाच्या उपाययोजना आणि आर्थिक सहाय्य –

  • साधनसामग्री मिळवण्याबाबत – नेमबाजीत उत्तम दर्जाची कामगिरी कायम राखण्यासाठी आवश्यक साधने मिळवून दिली.
  • वैयक्तिक प्रशिक्षकासह देशांतर्गत प्रशिक्षणाची संधी – वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षण, लक्ष्यकेंद्रीत मार्गदर्शन आणि कौशल्यात सुधारणा घडवून कामगिरी उंचावण्यासाठी सहाय्य केले .
  • टीओपीएस (टॉप्स) अर्थात टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम – रु. 17,58,557/-
  • प्रशिक्षण आणि स्पर्धेची वार्षिक दिनदर्शिका (एसीटीसी) – रु. 1,42,69,647/-

यश –

ऐतिहासिक ऑलिम्पिक पदकापर्यंतच्या प्रवासात स्वप्नील कुसाळे याने अनेक स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवले आहे.

  • जागतिक विजेतेपद, कैरो (2022) – चौथे स्थान मिळवून भारतासाठी ऑलिम्पिक कोटाद्वारे पात्र ठरला .
  • आशियाई क्रीडा स्पर्धा  2022 – सांघिक प्रकारात सुवर्ण पदक.
  • विश्वचषक, बाकू (2023) – मिश्र सांघिक  प्रकारात सुवर्ण आणि वैयक्तिक व सांघिक  प्रकारात दोन रौप्य पदके.
  • जागतिक विजेतेपद, कैरो (2022) – सांघिक प्रकारात कांस्य पदक.
  • जागतिक चषक, नवी दिल्ली (2021) – सांघिक  प्रकारात सुवर्ण पदक.

पार्श्वभूमी –

दिनांक 6 ऑगस्ट 1995 रोजी पुणे इथे एका शेतकरी कुटुंबात स्वप्निल कुसळेचा जन्म झाला. 2009 मध्ये स्वप्निलच्या वडलांनी त्याला महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक क्रीडा उपक्रम – क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन दिला. तेव्हापासून त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. एक वर्ष कठोर शारिरीक प्रशिक्षणानंतर एका क्रीडाप्रकाराची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने नेमबाजीची निवड केली. 2013 मध्ये त्याला लक्ष्य स्पोर्ट्सचे  प्रायोजकत्व मिळाले. 2015 मध्ये कुवेतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन 3 प्रकारात जुनिअर गटात सुवर्ण पदक पटकावले. तुघलकाबाद इथे झालेल्या 59व्या राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत त्याने 50 मी. रायफल प्रोन प्रकारात  गगन नारंग आणि चैन सिंहला मागे टाकत विजेतेपद मिळवले. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्याने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या 61व्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावून केली.


S.Kane/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2040381) Visitor Counter : 77