शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजना- नॅटस 2.0 च्या पोर्टलचे केले उद्घाटन, डीबीटीद्वारे पदवी आणि पदविकाधारकांना नोकरीतील प्रशिक्षणासाठी दिली 100 कोटी रूपयांची छात्रवृत्ती
Posted On:
30 JUL 2024 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2024
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजनेच्या (नॅटस 2.0) पोर्टलचे उद्घाटन केले आणि डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीद्वारे शिकाऊ उमेदवारांना 100 कोटी रुपयांची छात्रवृत्ती दिली. हे प्रशिक्षणार्थी माहिती तंत्रज्ञान/आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा), उत्पादन, वाहन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हा उपक्रम युवकांच्या कौशल्य आणि रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रीत करतो. या पोर्टलवर मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवार नोंदणी अर्ज करतील अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त आस्थापना/उद्योगातील रिक्त जागा आणि करारांच्या व्यवस्थापनासाठी पोर्टल उपयुक्त आहे. पदवी आणि पदविकाधारकांना रोजगार कौशल्ये विकसित करण्यासाठी या पोर्टलची मदत होईल.
लोकशाही पद्धतीने शिकाऊ उमेदवारांमध्ये कौशल्ये विकसित करून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी नॅटस पोर्टल 2.0 हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या पोर्टलमुळे प्रशिक्षणार्थींना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्यात आणि रोजगार देण्याऱ्या कंपन्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी मदत मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्याचे तंत्रज्ञानाधिष्ठित युग केवळ पदवी मिळविण्यासाठी नाही तर क्षमता निर्माण करणारे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. आपल्याकडील अभ्यासक्रमांनी रोजगारक्षमता कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पात कौशल्य आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
सर्व शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या योजनेच्या लाभार्थ्यांमधून जनचळवळ उभारायची आहे, असेही ते म्हणाले.
सर्व लाभार्थ्यांना स्टायपेंडमधील शासनाच्या हिश्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2039352)
Visitor Counter : 108