आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य सेवा महासंचालकांनी भारतातील आरोग्य व्यावसायिक संस्थाप्रमुखांसोबत आरोग्यविषयक सेवांना प्रोत्साहन, निरोगी परिसर उपक्रम आणि तंबाखू नियंत्रण इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतली बैठक.

Posted On: 30 JUL 2024 9:40AM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) प्राध्यापक डॉ. अतुल गोएल यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील आघाडीच्या आरोग्य व्यावसायिक संस्था प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली. दूरदृश्य प्रणाली आणि प्रत्यक्ष अशा हायब्रीड प्रकारे झालेल्या या बैठकीला देशातील 27 प्रमुख आरोग्य व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आरोग्यपूर्ण आहाराला आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन तसेच तंबाखूसेवन आणि मद्यपानामुळे होणाऱ्या असंसर्गजन्य रोगांशी निगडित धोक्यांविषयी जनजागृती अशा आरोग्यसेवा विषयक उपक्रमांना चालना देण्याच्या कार्यात आरोग्य मंत्रालयाची व्याप्ती वाढवणे या बैठकीचा मूळ उद्देश होता.

केवळ रोगाचे निदान आणि उपचारांशी संबंधित पर्यायांवर लक्ष एकवटण्याऐवजी आरोग्यसेवांशी निगडित स्रोतांचा विनियोग रोग प्रतिबंधक क्रियांसाठी करण्यावर अधिक भर दिला पाहिजे असे डॉ. अतुल गोएल यांनी अधोरेखित केले. सर्व सहभागी सदस्यांनी आरोग्यपूर्ण जीवनाला प्रोत्साहन आणि रोगांना दूर ठेवणे तसेच तंबाखू आणि मद्य यांचा वापर न करणे आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 ची कडक अंमलबजावणी करणे या मुद्द्यांवर विचारमंथन केले.

या दृष्टीने  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय करत असलेले प्रयत्न आणि शिफारशींचे सर्व सदस्यांनी एकमताने कौतुक केले आणि आरोग्य संवर्धनासाठी एकत्रित सहयोगी दृष्टीकोनाचे महत्व मान्य केले.

या बैठकीत आरोग्य शिक्षण आणि जोखीम घटक कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करून एक आरोग्यपूर्ण राष्ट्र घडवण्यासाठी एकत्रित वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली. एकत्रित आणि सक्रिय उपायांच्या माध्यमातून जन आरोग्याचे रक्षण आणि सर्व नागरिकांना निरामय आयुष्य लाभावे यासाठी आपली मोहीम निरंतर सुरु ठेवण्याच्या ध्येयानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय मार्गक्रमण करत आहे. 

या बैठकीला अतिरिक्त उपमहासंचालक आणि ईएमआरचे संचालक डॉ. एल. स्वस्तिचरण आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहभागी झालेल्या आरोग्य व्यावसायिक संस्थांमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC), जागतिक आरोग्य संघटना (WHO), इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (API), कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया (CSI), इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (IAPSM), इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (IPHA), MeDeVision, भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघ (TNAI), इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन (IOA), इंडियन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी (ISO), इंडियन असोसिएशन ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री (IAPHD), असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन ऑफ इंडिया (AOMSI), नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन (NMO) यासह इतर संस्था सहभागी झाल्या होत्या.

 ***

JPS/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2038848) Visitor Counter : 86