उपराष्ट्रपती कार्यालय
कोचिंग हा सध्या नफेखोरीचा उद्योग झाला आहे - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
कोचिंग सेंटर्स कडून वर्तमानपत्रातील जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या मोठ्या खर्चाची तपासणी होणे गरजेचे - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
दिल्ली येथील कोचिंग सेंटरमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूसंदर्भात राज्यसभेत चर्चा
Posted On:
29 JUL 2024 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2024
दिल्ली येथील कोचिंग सेंटरमध्ये पावसाचे पाणी भरल्याने युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात आज राज्यसभेत नियम 176 अंतर्गत अल्पकालीन चर्चा करण्यात आली. या चर्चेला परवानगी देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले, “देशातील युवा लोकसंख्याविषयक लाभांशाची जोपासना व्हायला हवी असे माझे मत आहे. मात्र मला असे दिसून आले आहे की कोचिंग हा एक प्रकारे व्यवसायच झाला आहे.”
वर्तमानपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर कोचिंग सेंटर्सतर्फे अव्वाच्या सव्वा खर्च केला जातो त्याबाबत चिंता व्यक्त करून, हा पैसा विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या गलेलठ्ठ शुल्कातूनच केला जातो असे मत उपराष्ट्रपती धनखड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “कोचिंग हा सध्या नफेखोरीचा उद्योग झाला आहे.प्रत्येक वेळी वर्तमानपत्र वाचताना आपल्याला पहिली एक-दोन पाने अशा सेंटरच्या जाहिरातींनी भरलेली दिसतात. अशा जाहिरातींसाठी खर्च होणारा प्रत्येक रुपया विद्यार्थ्यांकडूनच घेतलेला असतो, या सेंटर्सची प्रत्येक नवी इमारत विद्यार्थ्यांच्या पैशातूनच उभी राहते,” ते पुढे म्हणाले.
कोचिंग संस्कृतीमुळे देशात निर्माण झालेल्या भूमिगत खड्डासदृश परिस्थितीची तुलना ‘गॅस चेंबर्स’शी करत अध्यक्ष म्हणाले, “अधिकाधिक प्रमाणात संधी उपलब्ध होऊ लागलेल्या आपल्यासारख्या देशात ही समस्या निर्माण करत आहेत.ही सेंटर्स ‘गॅस चेंबर्स’प्रमाणेच श्वास कोंडणारी आहेत...” राज्यसभेत उपस्थित सदस्यांनी देशात उपलब्ध असणाऱ्या इतर विविध प्रकारच्या रोजगाराबद्दल तसेच कौशल्यविषयक संधींबद्दल आपल्या देशातील युवकांना जागरुक करावे अशी सूचना याप्रसंगी धनखड यांनी केली.
जेव्हा काही पक्षाच्या सभागृह नेत्यांना चर्चेसाठी तसेच सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालण्याची सुनिश्चिती करण्यासंदर्भात सूचना करण्यासाठी सभापती दालनात बोलावले जाते तेव्हा स्वीकारल्या जाणाऱ्या बहिष्कार तसेच नकारासारख्या चुकीच्या पद्धतींबाबत दुःख व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “मला होणारा मनस्ताप, माझ्या वेदना मला व्यक्त करायच्या आहेत. या सभागृहाचे सभापती जेव्हा माननीय सभासदांना चर्चेसाठी दालनात येण्याची विनंती करतात, तेव्हा मिळणारा नकार अभूतपूर्व पद्धतीने चुकीचाच नव्हे तर तो संसदीय मर्यादांची पायमल्ली करणारा आहे. सभागृह नेते सदनात सभापतींवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करतात ही नक्कीच निरोगी पद्धत नव्हे.”
आज सकाळच्या वेळात, सुधांशू त्रिवेदी आणि स्वाती मालीवाल यांच्यासह काही राज्यसभा सदस्यांनी युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या मृत्यूसंदर्भात नियम 267 अन्वये चर्चा करण्याची मागणी करणारी नोटीस दिली.संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी या विषयाची तातडी लक्षात घेत नियम 267 अंतर्गत चर्चा करण्याची तयारी दाखवली मात्र सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर विरोधी पक्षांनी नियम 267 अंतर्गत चर्चा करण्याचे अमान्य केले. जर सभागृहातील प्रमुख राजकीय पक्षांना मान्य असेल तसेच सभागृहाने संमती दिली असेल तरच नियम 267 अंतर्गत एखाद्या विषयावर चर्चा करता येते असे अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले आणि सभापतींनी नियम 176 अंतर्गत अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038720)
Visitor Counter : 72