सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आगामी युग युगीन भारत संग्रहालय संदर्भात, 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय राज्य परिषदेचे सांस्कृतिक मंत्रालयाकडून आयोजन


संग्रहालय व्यवस्थापन क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मजबूत सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न

नामांकित भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय व्यावसायिकांद्वारे भागधारकांची सल्लामसलत आणि क्षमता निर्माण कार्यशाळांचा या परिषदेत समावेश

Posted On: 28 JUL 2024 1:14PM by PIB Mumbai

 

सांस्कृतिक मंत्रालय 1 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत, नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे तीन दिवसीय राज्य संग्रहालय परिषद आयोजित करणार आहे.  जागतिक सर्वोत्तम पद्धतींचे उदाहरण स्थापित करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘युग युगीन भारत संग्रहालया’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी राज्य संग्रहालये आणि केंद्र सरकार यांच्यात सहकार्य वाढवणे, हे या परिषदेच्या आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.  ‘युग युगीन भारत संग्रहालया’साठी भारतातील कलात्मक वस्तू संपत्तीची सर्वसमावेशक समज वाढवण्यासाठी, आगामी राज्य संमेलनात राज्यांना त्यांच्या संग्रहाबद्दल तपशीलवार अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेत देशभरातील निवासी आयुक्त, संग्रहालय संचालक, अधीक्षक, क्युरेटर आणि संशोधकांसह विविध भागधारकांच्या गटाला एकत्र येण्याची संधी मिळेल. ग्लॅम (कलादालन, वाचनालय, अभिलेखागार आणि संग्रहालय) विभागाचे सहसचिव तसेच मंत्रालयाचे सचिव यांच्यासह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील परिषदेला उपस्थित राहणार आहेत.  सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत या परिषदेला  संबोधित करतील.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या ग्लॅम विभागाद्वारे हाती घेतलेल्या क्षमता-निर्माण उपक्रमांच्या मालिकेचा  राज्य संग्रहालय परिषद हा तिसरा टप्पा आहे.  14 जून, 2004 रोजी झालेल्या आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीच्या आणि त्यानंतरच्या फ्रान्स म्युझियम्स (25-29 जून, 2004) च्या भागीदारीत संग्रहालय व्यावसायिक (संचालक, क्युरेटर, शिक्षण अधिकारी आणि संरक्षक) यांच्या सहकार्याने झालेल्या कार्यशाळांच्या यशानंतर आयोजित या परिषदेचा मुख्य उद्देश भारतातील संग्रहालय परिसंस्था आणखी मजबूत करणे हा आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका सत्रात फ्रान्स म्युझियम्स कार्यशाळांचा  समारोप झाला होता.

प्रख्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या क्षमता-निर्माण कार्यशाळांच्या मालिकेद्वारे, मंत्रालयातील राज्य-स्तरीय कर्मचाऱ्यांना संग्रहालयासाठी आवश्यक असणारे संकलन व्यवस्थापन, संग्रहण आणि संग्रहालय प्रशासनातील आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे.  नॉर्थ आणि साउथ ब्लॉकचे वास्तु स्थापत्य आणि भौतिकता, संवर्धनातील जागतिक सर्वोत्तम पद्धती, ललित कलावस्तू हाताळणी, संकलन व्यवस्थापन, क्युरेशन आणि संग्रहालय व्यवस्थापन यासारख्या विविध विषयांवर भारत आणि परदेशातील तज्ञांची महत्त्वपूर्ण व्याख्याने देखील आयोजित केली जाणार आहेत.

सैद्धांतिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन या तीन-दिवसीय परिषदेत ‘युग युगीन भारत संग्रहालय’ (YYBM) प्रकल्पासाठी संभाव्य सहकार्यांसोबत नेटवर्किंगसाठी प्रशिक्षण आणि संधी प्रदान केली जाणार आहे.  याव्यतिरिक्त, राज्यस्तरीय संग्रहालय विकास उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय उपलब्ध निधी योजनांचे विहंगावलोकन सादर करेल, ज्यात नुकतीच अद्यतनित केलेली संग्रहालय अनुदान योजना आणि विज्ञान संस्कृतीच्या संवर्धनासाठीच्या योजना समाविष्ट आहेत.

***

M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2038088) Visitor Counter : 76