कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात जाहीर सभेला केले संबोधित, लोकदरबाराचेही आयोजन
Posted On:
20 JUL 2024 4:32PM by PIB Mumbai
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ग्राम सुरक्षा रक्षक अर्थात व्हिलेज डिफेन्स गार्ड्सच्या पुनरुज्जीवनाला दुजोरा दिला.

“अलीकडील दहशतवादी घटना लक्षात घेता डोडा जिल्हा आणि लगतच्या भागातील सुरक्षा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून एक निश्चित धोरण कार्यरत आहे, परंतु अशा धोरणांबाबत जाहीर चर्चा केली जात नाही", असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तसेच अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सक्षम करण्याच्या उद्देशाने दहशतवादग्रस्त भागात ग्राम सुरक्षा रक्षकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. या माध्यमातून त्यांना दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सक्षम बनवले जाईल. गरज भासेल तिथे या रक्षकांना तैनात केले जाईल, असे सांगतानाच एसआरएल रायफल्ससह शस्त्रेही त्यांना पुरवली जातील, जेणेकरून ते कोणत्याही आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतील, असे ते म्हणाले.

डोडाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की गेल्या दहा वर्षांत दुर्गम भागांशी संपर्क सुधारण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोईसाठी महामार्गांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील सर्व क्षेत्रांचा समान विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले आणि त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.
त्यानंतर ते जिल्हा प्रशासनाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित लोकदरबार उपक्रमात सहभागी झाले. तीन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या उपक्रमात त्यांनी सार्वजनिक सेवांचे वितरण वेळेत सुधारण्यासाठी सर्व संभाव्य उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034692)
Visitor Counter : 43