निती आयोग
‘जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये भारताच्या योगदानाला ऊर्जा देणारे इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावरील अहवाल नीती आयोगाने आज केला प्रकाशित
भारताला इलेक्ट्रॉनिक्सचे ऊर्जाकेंद्र बनवणारा अहवाल नीती आयोगाकडून जाहीर
Posted On:
18 JUL 2024 10:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2024
जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये भारताच्या योगदानाला ऊर्जा देणारे इलेक्ट्रॉनिक्स या विषयावरील अहवाल नीती आयोगाने आज प्रकाशित केला. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र, त्यातील संधी व क्षमता आणि त्यासमोरील आव्हाने यांचे विश्लेषण या अहवालात मांडले आहे. भारताला जागतिक स्तरावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक उपायांचाही अहवालात समावेश आहे.
संकल्पना, उत्पादन, विपणन आणि वितरणाचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या आधुनिक उत्पादन प्रक्रियेत जागतिक मूल्य साखळ्या (जीव्हीसी) महत्त्वपूर्ण ठरतात. त्या 70% आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रतिनिधीत्व करतात आणि भारताला त्यात सहभागी होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स, वाहने, रसायने आणि औषधे आदी क्षेत्रांना चालना देण्याची गरज आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र त्यात केंद्रस्थानी असून त्यातील 75% निर्यातीचा उगम जीव्हीसीमध्ये होतो.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने आर्थिक वर्ष 2023 मध्ये वेगवान वाढीचा अनुभव घेतला असून ही वाढ 155 अमेरिकी डॉलर्स पर्यंत गेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोनचा वाटा असून ते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील 43% उत्पादन ठरले आहे. भारताने स्मार्ट फोनची आयात लक्षणीय प्रमाणात कमी केली असून 99% उत्पादन देशांतर्गत होते.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ सारख्या अभियानांमुळे पायाभूत सुविधा व व्यवसाय करण्यातील सुलभतेत सुधारणा झाल्या असून विविध प्रोत्साहनपर उपक्रमांमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळाली असून परकीय गुंतवणूकदारही आकर्षित झाले आहेत. तरीदेखील, भारतातील इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन तुलनेने मर्यादित असून जागतिक स्तरावर त्यात भारताचा वाटा फक्त 4% आहे.
4.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेवर चीन, तैवान, अमेरिका, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि मलेशिया यांसारख्या देशांचे वर्चस्व आहे. भारत सध्या दरवर्षी अंदाजे 25 अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याची निर्यात करतो, जागतिक मागणीत 4% वाटा असूनही भारताचा जागतिक वाटा 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला उच्च-तंत्रज्ञान उपकरणांचे स्थानिक पातळीवर उत्पादन करणे, संशोधन आणि विकास गुंतवणुकीद्वारे डिझाइन क्षमता वाढवणे आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी या पातळीवर काम केले पाहिजे.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे सध्याचे मूल्य आर्थिक वर्ष 23 पर्यंत 101 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. देशांतर्गत मूल्यवर्धनाच्या संदर्भात, या क्षेत्राने 15% ते 18% च्या दरम्यान योगदान दिले आहे आणि सुमारे 1.3 दशलक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
व्यवसाय परिदृश्यातून भारताचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 278 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढू शकते. महत्त्वाकांक्षी वाढीसाठी वित्तीय, आर्थिक, नियामक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये धोरणात्मक हस्तक्षेपांची शिफारस अहवालात केली आहे. यामध्ये घटक आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे, संशोधन आणि विकासाच्या रचनेला प्रोत्साहन देणे, दर सुसंगतीकरण, कौशल्य उपक्रम, तंत्रज्ञान हस्तांतरणाची सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक नेता म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याची प्रचंड क्षमता भारताकडे आहे. नव्या संधी घेत, मूल्य साखळीत एकात्मता वाढवून आणि विद्यमान आव्हानांवर मात करून, भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा वापर आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी करू शकतो.
खालील लिंकवर अहवाल उपलब्ध आहे :
https://www.niti.gov.in/sites/default/files/2024-07/GVC%20Report_Updated_Final_11zon.pdf
N.Chitale/Reshma/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034194)