माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विंग्स टू अवर होप्स- खंड 1,राष्ट्रपती भवन: हेरिटेज मीट्स द प्रेझेंट आणि कहानी राष्ट्रपती भवन की या पुस्तकांचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रकाशन


सर्व देशवासीयांप्रति राष्ट्रपती मुर्मू यांच्या आस्थेची प्रभावी अभिव्यक्ती म्हणजे ही पुस्तके असून आपल्या लोकशाहीसाठी हा खजिना आहे : चौहान

आगामी पिढ्यांसाठी ही पुस्तके उत्तम संदर्भग्रंथ म्हणून काम करतील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

Posted On: 18 JUL 2024 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2024


केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज विंग्स टू अवर होप्स- खंड 1 (इंग्रजी आणि हिंदी), राष्ट्रपती भवन: हेरिटेज मीट्स द प्रेझेंट आणि कहानी राष्ट्रपती भवन की या पुस्तकांचे प्रकाशन केले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.

प्रकाशित झालेली ही पुस्तके भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या समृद्ध वारशाची प्रतीके आहेत, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पूर्वी केलेल्या भाषणांचे संकलन हे आपल्या लोकशाहीसाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक खजिना आहे. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर वंचित वर्ग, शेतकरी, सशस्त्र दल आणि युवकांसह सर्व देशवासीयांप्रति मुर्मू यांना असलेल्या आस्थेची प्रभावी अभिव्यक्ती म्हणजे हे संकलन आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र आणि शीर्षकातून आपल्या लोकशाहीची कथा प्रतित होते, असे त्यांनी नमूद केले.

पुस्तकांमधील संदेश प्रत्येक भारतीयाला यशाची नवी शिखरे गाठण्यासाठी नवी  उमेद देतील असे मंत्र्यांनी सांगितले. कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांवर महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात असल्याचे ते म्हणाले.

ही पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल डॉ. एल. मुरुगन यांनी प्रकाशन विभागाचे अभिनंदन केले. विविध विषयांवरील लोकहित साधणारी पुस्तके नियमितपणे प्रकाशित करण्याचे श्रेयही त्यांनी प्रकाशन विभागाला दिले. विविध विषयांवरील राष्ट्रपतींच्या विचारांचे सर्वात अस्सल संकलन म्हणजे ही पुस्तके असून येणाऱ्या पिढ्यांसाठी ती एक उत्तम संदर्भग्रंथ ठरतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर मान्यवरांनी राष्ट्रपतींना पुस्तकाची प्रत अर्पण केली.

पुस्तकांविषयी:

विंग्ज टू अवर होप्स या पुस्तकात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात विविध प्रसंगी दिलेली भाषणे आहेत.

या पुस्तकात त्यांच्या 75 भाषणांचे अकरा विभाग केलेले आहेत.

"राष्ट्रपती भवन: हेरिटेज मीट्स द प्रेझेंट" हे पुस्तक राष्ट्रपती भवनाचा सखोल वेध घेताना इतिहास, वारसा आणि वास्तू वैभवाचा मागोवा घेते.राष्ट्रपतीभवना मागची संकल्पना ते भारताच्या राष्ट्रपतींचे सध्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून त्याची भव्यता याची साद्यंत माहिती या पुस्तकात दिली आहे.  

मूर्तिमंत वर्णन आणि आकर्षक छायाचित्रे यामुळे राष्ट्रपती भवनाचा कानाकोपरा जिवंत झाला आहे.

राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनाची  मुलांना इत्थंभूत माहिती व्हावी यासाठी ‘कहानी राष्ट्रपती भवन की’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.‘आमचे राष्ट्रपती’,‘राष्ट्रपती भवनाचे मुख्य आकर्षण’ आणि ‘राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुल’ या तीन प्रकरणांमध्ये विभागलेले हे पुस्तक राष्ट्रपती भवनाचा सुमारे शंभर वर्षांचा इतिहास सोप्या शब्दांत मांडते. राष्ट्रपती भवनात असलेल्या विविध चित्रांचा आकर्षक वापर या पुस्तकात केला आहे.

 

 


 N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 


(Release ID: 2034111) Visitor Counter : 59