कोळसा मंत्रालय
आत्मनिर्भर भारत – जगातील सर्वात मोठ्या पाच कोळसा खाणींपैकी दोन भारतात
एस.ई.सी.एल.च्या छत्तीसगडमधील गेवरा आणि कुसमुंडा या दोन भव्य खाणकाम प्रकल्पांना जगातील सर्वात मोठ्या 10 कोळसा खाणींच्या यादीत दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर स्थान
Posted On:
18 JUL 2024 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2024
कोल इंडियाची सहाय्यक कंपनी छत्तीसगड स्थित एस.ई.सी.एल. अर्थात साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणींना वर्ल्डॲटलास डॉट कॉम ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात मोठ्या 10 कोळसा खाणींच्या यादीत दुसरे आणि चौथे स्थान मिळाले आहे.
गेवरा प्रकल्पातील खाणकामाचे विहंगम दृश्य
छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यात असलेल्या या दोन खाणींमधून वर्षाला 100 दशलक्ष टनापेक्षा जास्त कोळसा काढला जातो. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी हे 10% उत्पादन आहे.
गेवरा ही ओपनकास्ट खाण असून तिची वार्षिक कोळसा उत्पादन क्षमता 70 दशलक्ष टन आहे. आर्थिक
वर्ष 2023-24 मध्ये या खाणीतून 59 दशलक्ष टन कोळसा काढण्यात आला. वर्ष 1981 मध्ये गेवरा इथे खाणकामाला सुरुवात झाली आणि पुढील 10 वर्षे देशाची ऊर्जेची मागणी भागवू शकेल इतका कोळशाचा साठा इथे आहे.
कुसमुंडा खाणीतून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 50 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन घेण्यात आले. भारतात गेवरा खाणीपाठोपाठ हिचा क्रमांक लागतो.
कुसमुंडा खाणीतील खनिकर्माचे ड्रोनमार्फत घेतलेले छायाचित्र
या खाणींमध्ये खनिकर्मासाठी ‘सरफेस मायनर’ सारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक खाणकाम यंत्रांचा वापर केला जात आहे. ही यंत्र स्फोट घडवल्याशिवाय कोळसा काढून घेतात. कोळशाच्या वर असलेले माती, दगड इ. चे थर काढून कोळशाच्या थरापर्यंत पोहोचण्यासाठी स्फोट न घडवता 240 टनाचे डंपर, 42 घनमीटरचे विशेष फावडे अशा जगातील अतिवजनदार यंत्रांचा वापर केला जातो.
गेवरा इथे ‘सरफेस मायनर’च्या सहाय्याने होत असलेले खाणकाम
गेवरा खाणीतील रॅपिड लोडिंग सिस्टीम (आरएलएस) आणि फर्स्ट माईल कनेक्टिविटी (एफएमसी) अंतर्गत सिलोचे विहंगम दृश्य
एसईसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रेम सागर मिश्रा यांनी या प्रसंगाचे औचित्य साधून सांगितले की जगातील सर्वात मोठ्या पाच कोळसा खाणींपैकी दोन छत्तीसगडमध्ये आहेत ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. कोळसा मंत्रालय, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, राज्य सरकार, कोल इंडिया, रेल्वे यांच्यासह इतर भागीदार आणि सर्वात महत्त्वाचा घटक असलेले खाण कामगार या सर्वांप्रती मिश्रा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2034059)
Visitor Counter : 135