रेल्वे मंत्रालय

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने केली 84,119 मुलांची सुटका

Posted On: 17 JUL 2024 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2024

 

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेली सात वर्षे ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या लहान मुलांची सुटका करण्यासाठी हे अभियान समर्पित आहे.  आरपीएफ ने गेल्या सात वर्षांत (2018- मे 2024), रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या  84,119 मुलांची सुटका करून, संभाव्य धोक्यापासून त्यांचे संरक्षण केले आहे.

"ऑपरेशन नन्हे फरिश्ते" च्या आरंभासह 2018 हे वर्ष महत्वाचे ठरले. या वर्षात, आरपीएफने एकूण 17,112 मुलांची सुटका केली. यामध्ये मुलगे आणि मुली दोन्ही समाविष्ट होते. 2018 या वर्षाने अशा उपक्रमाची तातडीची गरज अधोरेखित करत, या अभियानाचा भक्कम पाया रचला.

2019 या वर्षात, आरपीएफ च्या प्रयत्नांना फळ मिळू लागले, या वर्षी एकूण 15,932 मुलांची सुटका करण्यात आली, ज्यात मुले आणि मुली दोन्ही आहेत.

कोविड-19 साथ रोगामुळे 2020 हे वर्ष आव्हानात्मक ठरले, ज्यामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आणि अभियानाच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला. तरीही या आव्हानांचा सामना करत, आरपीएफने 5,011 मुलांची सुटका करण्यात यश मिळविले.

2021 मध्ये, आरपीएफ ने आपल्या बचाव कार्यात आणखी प्रगती केली आणि 11,907 मुलांची सुटका केली.

2022 मध्ये, आरपीएफ अदम्य वचनबद्धता दिसून आली, कारण या वर्षात त्यांनी 17,756 मुलांची सुटका केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होती. या वर्षी घरातून पळून गेलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने सापडली. त्यांना आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले.
2023 या वर्षात आरपीएफ ने 11,794 मुलांची सुटका केली.

2024 च्या पहिल्या पाच महिन्यांत, आरपीएफने 4,607 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये घरातून पळून गेलेल्या 3430 मुलांचा समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या या कामामधून  आरपीएफची 'नन्हे फरिश्ते' अभियानाप्रति वचनबद्धता दिसून येते. या संख्येवरून मुलांची घरातून पळून जाण्याची समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आरपीएफचे समर्पित प्रयत्न दोन्ही दिसून येते.  

आरपीएफने आपल्या अथक परिश्रमांनी केवळ मुलांची सुटका केली नाही, तर पळून जाणाऱ्या आणि हरवलेल्या मुलांच्या वाढत्या समस्येबाबत जागरुकता निर्माण केली, ज्यामुळे पुढील कारवाई शक्य झाली आणि या अभियानाला विविध हितधारकांचे पाठबळ मिळाले.  

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033841) Visitor Counter : 41