गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंदूरमध्ये 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत एका दिवसात 11 लाख रोपे लावण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले वृक्षारोपण

Posted On: 14 JUL 2024 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या  संकुलामध्ये वृक्षारोपण करून 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत एकाच दिवसात 11 लाख झाडे लावण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत इंदूर शहराने आज 51 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट गाठले आणि एकाच दिवसात 11 लाख रोपे लावण्याचा जागतिक विक्रम देखील केला.

  

ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदर्शी कल्पना आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.  आपल्या माता आणि आपल्या पृथ्वीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण करण्याचे आणि ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेत सामील होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्वांना केले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हा ही मोहीम सुरू केली तेव्हा ही मोहीम लोकचळवळ बनेल याची कुणालाही कल्पना नव्हती, असेही शाह यांनी सांगितले. 'एक पेड माँ के नाम' मोहिमेत लोक आज वृक्षारोपण करून आपल्या मातेला आणि धरणी मातेला आदर देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. हा केवळ सरकारचा उपक्रम नाही, कारण प्रशासन केवळ सुविधा देऊ शकते परंतु मोहीम यशस्वी करू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. 

झाडाचे महत्त्व सांगताना शाह म्हणाले की मत्स्य पुराणात असे लिहिले आहे की एक बारव 10 विहिरींच्या समान असतात, एक तळे 10 बारवांच्या समान असते,  एक पुत्र 10 तळ्यांच्या समान असतो आणि एक झाड 10 पुत्रांच्या समान असते.  रोपे मोठी होईपर्यंत आपण त्यांची काळजी मुलासारखी घेतली पाहिजे, आणि नंतर ही झाडे मोठी झाल्यावर ती तुमची आईप्रमाणेच काळजी घेतील, असेही ते म्हणाले.

   

आपण आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.  जग ज्या पद्धतीने विकसित होत आहे, त्यामुळे आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पर्यावरण रक्षण ही चिंतेची बाब बनली आहे, असेही ते म्हणाले.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2033186) Visitor Counter : 100