पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

2030 पर्यंत अन्वेषण आणि उत्पादन (ई अँड पी) क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी


ऊर्जा वार्ता 2024 परिषदेचे पुरी यांच्या हस्ते उद्घाटन: भारताच्या ऊर्जा सुरक्षा उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यासाठी भागधारकांनी व्यासपीठाचा लाभ घेण्याचे केले आवाहन

Posted On: 11 JUL 2024 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024

अन्वेषण आणि उत्पादन (ई अँड पी) क्षेत्र 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करणार असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितले. ऊर्जा वार्ताच्या पहिल्या आवृत्तीच्या उद्घाटन सत्रात ते दिल्लीत बोलत होते. ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी आणि सातत्याने आर्थिक वाढ होण्यासाठी अन्वेषण आणि उत्पादन (ई अँड पी ) क्षेत्राचे महत्त्व त्यांनी सांगितले. भारतातील 26 खोऱ्यांमध्ये कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरेसा साठा असून तिथल्या स्त्रोतांचा अद्याप पूर्णपणे उपयोग झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

या क्षेत्रात भरीव प्रगती होऊनही देशातील गाळाच्या खोऱ्यांपैकी फक्त 10% क्षेत्रात शोधमोहीम सुरू आहे. आगामी ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी (ओएएलपी) राउंड अंतर्गत 2024 च्या अखेरीस ते 16 टक्क्यापर्यंत वाढेल, अशी माहिती त्यांनी दिली.

"केरळ-कोकण खोरे आणि मुंबई खोरे आणि पूर्व किनाऱ्यावरील महानदी आणि अंदमान खोरे यांची भू-वैज्ञानिक माहिती उपलब्ध  आहे", असे त्यांनी नमूद केले. हायड्रोकार्बन्स महासंचालनालयाद्वारे (डीजीएच) नॅशनल डेटा रिपॉजिटरी क्लाउड-आधारित नेटवर्क डिटेक्शन अँड रिसपॉन्स मध्ये सुधारणा केल्याचा संदर्भ त्यांनी दिला. यामुळे भूकंप, विहीर आणि उत्पादन डेटाचा त्वरित प्रसार करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

या क्षेत्रातील व्यवसायांमध्ये सुलभता आणण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली. 37 मंजुरी प्रक्रियांना एकत्र केले आहे आणि 18 प्रक्रिया सोप्या केल्या आहेत तर, 9 प्रक्रिया आता स्वयं-प्रमाणीकरणासाठी पात्र आहेत, असे त्यांनी सांगितले.

उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि या क्षेत्रात अधिक व्यवसाय सुलभता आणण्यासाठी खाजगी अन्वेषण आणि उत्पादन कंपन्या, राष्ट्रीय तेल कंपन्या, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि हायड्रोकार्बन्स महासंचालनालय यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला संयुक्त कार्य गट स्थापन करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली.

उर्जावार्ता 2024

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज येथे भारत मंडपम येथे पहिल्या ऊर्जावार्ता परिषदेचे उद्घाटन केले. हायड्रोकार्बन्स महासंचालनालयाने ही दोन दिवसीय परिषद आयोजित केली आहे.

भारतातील हायड्रोकार्बन संसाधनांचा शोध घेऊन भारताच्या हायड्रोकार्बन क्षेत्राच्या भविष्याविषयी, गुंतवणूक, नाविन्यता, भागीदारी आणि शाश्वत वाढ याविषयी संवाद आणि चर्चा करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग तज्ञ, सेवा पुरवठादार, सल्लागार आणि शैक्षणिक सदस्य या परिषदेच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. भारतीय तेल आणि वायू उद्योग तसेच ऊर्जा संक्रमणाशी संबंधित आव्हाने आणि संधींवर या परिषदेचा भर आहे. 400 पेक्षा जास्त प्रतिनिधी, 50 पेक्षा अधिक प्रदर्शक आणि 100 पेक्षा अधिक वक्ते यात सहभागी झाले आहेत. त्याच बरोबर परिषदेदरम्यान, तेल आणि वायू क्षेत्रातील सुधारित तेल पुनर्प्राप्ती तंत्रापासून ते डिजिटलायझेशनपर्यंतच्या विस्तृत विषयांवर संशोधक आणि व्यावसायिक तांत्रिक त्यांचे निष्कर्ष सादर करतील.


 N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar


 



(Release ID: 2032599) Visitor Counter : 23