पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन

Posted On: 04 JUL 2024 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे भाषण वाचून दाखवले.

महामहीम,

2017 साली कझाकस्तानच्या अध्यक्षपदाच्या काळात मिळालेले एससीओ चे सदस्यत्व भारतासाठी गौरवास्पद आहे. तेव्हापासून आपण  एससीओ मधील अध्यक्षपदाचे एक अखंड आवर्तन पूर्ण केले आहे.

भारताने 2020 मध्ये सरकार प्रमुखांची परिषद तसेच 2023 मध्ये राष्ट्र प्रमुखांची परिषद, या दोन्ही बैठकांचे आयोजन केले होते. आमच्या परराष्ट्र धोरणात एससीओ ला महत्वाचे स्थान आहे.

या संघटनेचे सदस्यत्व मिळालेल्या इराणचे आम्ही अभिनंदन करतो, तसेच हेलिकॉप्टर दुर्घटनेत राष्ट्राध्यक्ष रायसी आणि इतरांच्या  निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.

मी अध्यक्ष लुकाशेन्को यांचेही अभिनंदन करतो आणि संघटनेचे नवीन सदस्य म्हणून बेलारूसचे स्वागत करतो.

महामहीम,

महामारीचा प्रभाव, चालू असलेले संघर्ष, वाढता तणाव, विश्वासाची कमतरता आणि जगभरातील हॉटस्पॉट्सची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर आपण आज एकत्र आलो आहोत. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि जागतिक आर्थिक विकासावर विलक्षण ताण आला आहे. या घटनांमुळे जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या काही समस्या आणखी तीव्र झाल्या आहेत. या घडामोडींचे परिणाम कमी करण्यासाठी सामायिक उपाय शोधणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

एससीओ ही एक तत्वाधारित संस्था असून, यामधील एकमत त्याच्या सदस्य देशांच्या दृष्टिकोनाला चालना देते. यावेळी हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की, आम्ही सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता, समानता, परस्पर लाभ, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, आपल्या परराष्ट्र धोरणांचा आधार म्हणून बळाचा वापर न करणे किंवा बळाचा वापर करण्याची धमकी न देणे, या गोष्टींमध्ये परस्परांचा आदर ठेवण्याचा पुनरुच्चार करत आहोत. देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांविरोधात कोणतीही कृती न करण्यावरही आपण सहमती दिली आहे.

असे करत असताना, एससीओ च्या मूळ उद्दिष्टांपैकी एक, म्हणजे दहशतवादाचा सामना करण्याला नैसर्गिकरित्या प्राधान्य द्यायलाच हवे. आपल्यापैकी अनेकांना दहशतवादाचा अनुभव आहे, ज्याचा उगम बहुतेकदा सीमापार असतो. आपण हे स्पष्ट करूया, की जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठे धोकादायक ठरू शकते. कोणत्याही प्रकारचा आणि स्वरूपातील दहशतवाद हा समर्थनीय नसतो, आणि त्याला माफी दिली जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या, त्यांना सुरक्षित निवारा  देणाऱ्या आणि दहशतवादाला माफ करणाऱ्या देशांना एकटे पाडणे आणि त्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला निर्णायक प्रतिसाद आवश्यक असून, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि दहशतवाद्यांची भरती, याचा कठोरपणे सामना करणे आवश्यक आहे. आपल्या युवा पिढीमध्ये कट्टरतावादाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्रियपणे पावले उचलायला हवीत.  

भारताच्या अध्यक्षतेत गेल्या वर्षी या विषयावर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात आमची सामायिक वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

आजघडीला आपल्या समोर असलेली अजून एक गंभीर समस्या हवामान बदलाची आहे. पर्यायी इंधने, विजेवर चालणारी वाहने, बदलत्या हवामानाच्या परिणामांशी जुळवून घेतील अशा पायाभूत सुविधांची उभारणी आदी उपाययोजनांसह उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध सक्रीयतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या संदर्भात, नव्या पर्यायी इंधनांविषयी संयुक्त निवेदन आणि परिवहन क्षेत्रात कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याबाबत संकल्पनेला शांघाय सहकार्य संघटने (एस.सी.ओ.) च्या भारताच्या अध्यक्षतेच्या काळात मंजुरी मिळाली.

महामहिम,

आर्थिक विकासासाठी संपर्काची भक्कम व्यवस्था आवश्यक आहे. त्यातून विविध समाजांमध्ये सहकार्य आणि विश्वासाची भावना निर्माण होण्यास मदत होते. संपर्क व्यवस्था आणि पायाभूत प्रकल्पांसाठी सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडता प्रति आदर गरजेचा आहे. त्याचबरोबर व्यापार व दळणवळणासाठी सर्वांना समान अधिकारही आवश्यक आहेत. या घटकांचा एस.सी.ओ.ने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. तंत्रज्ञान निर्मितीक्षम करून समाजांचे कल्याण आणि प्रगतीसाठी त्याचा वापर आपण केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बाबत राष्ट्रीय धोरण आणि एआय अभियानाला सुरुवात करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाना’प्रती आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब एस.सी.ओ.च्या एआयसाठी सहयोगाने वाटचालीच्या चौकटीत उमटले आहे.

या प्रदेशातील लोकांशी भारताचे नागरी बंध दृढ आहेत. एस.सी.ओ.साठी मध्य आशिया केंद्रस्थानी असून आम्ही आमच्या आकांक्षा आणि महत्त्वाच्या विषयांचा प्राधान्यक्रम हे लक्षात घेऊन ठरवला आहे. मोठे व्यवहार, प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये ते दिसून येत आहे.

एस.सी.ओ.तील सहकार्य हे आमच्या दृष्टीने जनकेंद्रीत राहिले आहे. भारताने एस.सी.ओ. भरड धान्य खाद्य महोत्सव, एस.सी.ओ. चित्रपट महोत्सव, एस.सी.ओ. सूरजकुंड कला मेळा, एस.सी.ओ. थिंक-टँक्स परिषद आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा परिषदेचे आयोजन आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केले. इतरांकडून आयोजित अशा उपक्रमांना आम्ही अर्थातच पाठींबा देऊ.

नवी दिल्ली इथे एस.सी.ओ. सचिवालयाचे गेल्या वर्षी उद्घाटन झाले तेव्हापासून या वास्तूत अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये या वर्षी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचाही समावेश आहे.

महामहिम,

एस.सी.ओ.ने लोकांना एकत्र आणण्यासाठी, सहयोगासाठी, एकत्रित वाढ आणि संपन्नतेसाठी तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’चे शतकानुशतके चालत आलेले ब्रीद पुन्हा साकारण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले, हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो. या भावना आपण सातत्याने प्रत्यक्ष सहकार्यात उतरवल्या पाहिजेत. आज आपण घेणार असलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचे मी स्वागत करतो.

एस.सी.ओ. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी कझाकस्तानचे अभिनंदन करतो आणि एस.सी.ओ.च्या अध्यक्षपदाच्या आगामी कार्यकाळासाठी चीनला उत्तमोत्तम शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवतो.

 

* * *

S.Kane/Rajshree/Reshma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2030703) Visitor Counter : 59