आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा उद्या आयुष्मान भारत गुणवत्त आरोग्य कार्यक्रमात तीन उपक्रमांचे करणार उद्घाटन, प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया सिंह पटेल हे केंद्रीय राज्यमंत्रीही राहणार उपस्थित


आयुष्मान आरोग्य मंदिरे उपकेंद्रांसाठी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांचे मूल्यांकनही सुरू करणार, तसेच भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांसाठी डॅशबोर्डचे उद्घाटन आणि अन्न विक्रेत्यांना स्पॉट फूड लायसन्सचे वितरणही होणार

Posted On: 27 JUN 2024 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा उद्या (28 जून 2024 रोजी) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयुष्मान भारत गुणवत्त आरोग्य कार्यक्रमात तीन उपक्रमांचे अनावरण करणार आहेत. प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया सिंह पटेल हे याच खात्याचे राज्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.

आयुष्मान आरोग्य मंदिरे (आम) उपकेंद्रांसाठी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकांचे (एनक्यूएएस) मूल्यांकनही नड्डा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरू होणार आहे. वेळ आणि पैशांची बचत करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या दर्जाची हमी देणारा हा महत्त्वाचा कल्पक नवउपक्रम आहे. या प्रणालीद्वारे मूल्यांकन केलेल्या उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक प्रमाणपत्र मिळणार आहे.

भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांची (आयपीएचएस) मार्गदर्शक तत्त्वे  2007 मध्ये सादर केली गेली. वेळोवेळी ही तत्त्वे अद्ययावत करण्यात आली. अगदी अलीकडे 2022 मध्ये त्यात सुधारणा झाली.  प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी दर्जेदार मानदंड ठेवण्यात आले. देशभरातील आरोग्य सेवा सातत्याने सहज उपलब्ध व्हावी आणि ही सेवा रूग्णांशी बांधिलकी मानणारी असायला हवी याची हमी या मानकांमुळे मिळते. सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांना मूल्यांकनासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि लक्षात आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि या आरोग्य संस्थांना पाठिंबा देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक डॅशबोर्ड विकसित केला आहे. या डॅशबोर्डमुळे राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा आरोग्य तसेच आरोग्य सुविधा संस्थांना मानकांचे त्वरित पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होईल आणि त्यानुसार कृती करता येईल. नड्डा यांच्या हस्ते उद्याच्या कार्यक्रमात या डॅशबोर्डचेही उद्घाटन होणार आहे.

जिल्हा रुग्णालयांमध्ये असलेल्या एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांसाठीची (आयपीएचएल) राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानकेदेखील (एनक्यूएएस) या कार्यक्रमात जाहीर केली जातील. या मानकांमुळे प्रयोगशाळांचे व्यवस्थापन तसेच चाचण्यांचा दर्जा आणि कार्यक्षमता सुधारेल. त्यामुळे चाचण्यांमधून मिळणारे निष्कर्ष अधिक खात्रीलायक असतील. रुग्ण तसेच जनतेचा विश्वास त्यामुळे संपादन करण्यासाठी मदत होणार आहे. कायकल्पसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही उद्या जाहीर केली जाणार आहेत.

फूड सेफ्टी अँड कम्प्लायन्स सिस्टीम (FoSCoS) द्वारे त्वरित परवाने आणि नोंदणी करण्यासाठी एक नवीन प्रणाली सुरू केली जाणार आहे. अन्न सुरक्षेसाठीचे आवश्यक नियम पाळून तयार केलेली FoSCoS ही अत्याधुनिक प्रणाली असून संपूर्ण भारतातील माहिती आहे. या अभिनव प्रणालीमुळे परवाना आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे  वापरकर्त्याला दिलासादायक अनुभव मिळतो.

केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सेवा प्रदाते आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांसह प्रमुख भागधारक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कार्यक्रम थेट येथे पाहता येईल: https://youtube.com/live/CBrN_eFOqtQ?feature=share

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029209) Visitor Counter : 16