ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

शेतकरी कल्याणाला तसेच ग्राहकांचे आणि उद्योगाचे हित जपण्यास केंद्राचे सर्वोच्च प्राधान्य : प्रल्हाद जोशी


आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64 वी परिषद भारताने केली आयोजित

Posted On: 25 JUN 2024 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या (आयएसओ) 64 व्या परिषदेचे उद्घाटन केले. 27 जून 2024 रोजी या बैठकीचा समारोप होईल. ऊस, साखर आणि संबंधित क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने आणि उपाययोजनांविषयी चर्चा आणि विचारविनिमयासाठी 30 हून अधिक देशांतील तज्ज्ञ  या परिषदेत सहभागी झाले आहेत. यापूर्वी भारताने 2012 मध्ये 41वी आयएसओ परिषद भरवली होती.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.

भारतात सुमारे 5 कोटी शेतकरी ऊस लागवड करत आहेत आणि  हा उद्योग प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध करून देत आहे, असे जोशी यावेळी म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि ग्राहकांबरोबर उद्योगाचे हित जपत असल्याचे जोशी यांनी सांगितले. कृषी पद्धतीत सहयोगी प्रयत्नातून सुधारणेवर जोशी यांनी भर दिला.

आयएसओ परिषदेचे आयोजन करण्याची संधी मिळणं हे भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.  साखर आणि जैवइंधन क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या साखरेवर अवलंबून आहे, असे ते म्हणाले. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर ग्राहक आणि महत्त्वपूर्ण जैवइंधन उत्पादक आहे. जैवइंधन उत्पादक म्हणून भारताने पेट्रोलमध्ये 12 टक्क्यापेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले असून लवकरच 20% उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती त्यांनी दिली.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जैवइंधनाची भूमिका त्यांनी विशद केली. इथेनॉल ब्लेंडेड विथ पेट्रोल (इबीपी) कार्यक्रमामुळे साखर उद्योग आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती जोशी यांनी दिली. साखर क्षेत्रातील भविष्यातील उपक्रमांसाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन या परिषदेत मिळणार असून त्याचा लाभ घेण्याचे प्रोत्साहन त्यांनी प्रतिनिधींना दिले आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.

A person standing at a podiumDescription automatically generated

या परिषदेच्या निमित्ताने ‘शुगर अँड बायो-एनर्जी – इमर्जिंग व्हिस्टा’ ही कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली. साखर आणि जैव-ऊर्जा क्षेत्रातील विचारांची देवाणघेवाण आणि भविष्यातील या क्षेत्रांतील संधींची चाचपणी करणारी ही कार्यशाळा उद्योजक आणि सरकारी अधिकारी यांच्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरली.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028594) Visitor Counter : 45