माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नेमिल शाह यांनी 18 व्या मिफ्फमध्ये उलगडला चित्रपट निर्मितीमागचा प्रवास


एखाद्या खेळाप्रमाणे जीवनाचा शोध घेतल्यास तुमची सर्जनशीलता वृद्धिंगत होण्यास मदत होईल : दिग्दर्शक नेमिल शाह

निर्मिती पूर्णपणे समजून घेणे ही निर्मात्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे :नेमिल शाह

उत्कटतेने, स्वतःच्या आनंदासाठी चित्रपट तयार केल्यास तो त्याचे स्थान नक्की मिळवेल : नेमिल शाह

Posted On: 19 JUN 2024 4:30PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जून 2024

 

"मानवी जीवन हा भावना आणि घटनांनी समृद्ध एक वेधक खेळ आहे. काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक निर्मितीसाठी आपण त्याचा शोध घेऊया, समरसून ते जगूया'', असे आवाहन दिग्दर्शक नेमिल शाह यांनी केले आहे. ते आज 18 व्या मिफ्फ महोत्सवादरम्यान आयोजित मास्टरक्लासमध्ये बोलत होते. आपली निर्मिती पूर्णपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला. ''एक निर्माता म्हणून सर्वप्रथम आपली निर्मिती पूर्णपणे समजून घेणे, तिचे पूर्ण अवलोकन होणे आवश्यक असून, मगच पुढे जा ''असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या कलात्मक प्रक्रियेत पूर्णपणे समरसून जाण्याचे आवाहन त्यांनी चित्रपटकर्मीना केले. 

लघुपट निर्मितीमध्ये ध्वनीची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे दिग्दर्शक नेमिल शाह यांनी अधोरेखित केले. चित्रपटाचा एकंदर प्रभाव वृद्धिंगत करण्यात ध्वनीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि निर्मात्यांना ध्वनीविषयक बाबींकडे लक्ष पुरवण्यासाठी प्रोत्साहित केले. ''तुमच्याभोवती असलेल्या नादाविषयी सजग व्हा,लघुपटासाठी ध्वनी संयोजन ही कला आहे,'' असे ते म्हणाले. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शाह यांनी लघुपट निर्मितीच्या कलेविषयी मार्गदर्शन केले. स्थान, वेळ,  प्रेक्षक अशा कुठल्याही मर्यादांच्या बंधनात न जखडता स्वतःच्या हृदयाला भिडणारे चित्रपट करा, असे आवाहन त्यांनी चित्रपटकर्त्यांना केले. ''स्वतःसाठी उत्कट चित्रपट करा, तो त्याचे स्थान नक्कीच मिळवेल. इतर कुठल्या बाबींपेक्षा सर्जनशील पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करा,'' असे त्यांनी तळमळीने सांगितले. 

संसाधने आणि आर्थिक तरतूद कमीत कमी असतानाही उत्कृष्ट लघुपट बनवता येतात, असे सांगून नेमिल शाह यांनी निधी आणि लॉजिस्टिक  यासारख्या अडथळ्यांवर प्रकाश टाकला. ''तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आताच्या काळात मोबाईल, किमान साधनांसह आणि लेन्ससह चांगला लघुपट बनवता येऊ शकतो,''असे मत त्यांनी व्यक्त केले. 

योग्य नियोजन आणि चिकाटी अवलंबण्यास त्यांनी सांगितले. त्याचसोबत लघुपटाकडे चित्रपटासाठीचे प्रवेशद्वार म्हणून किंवा सीमित कला प्रकार म्हणून पाहू नये, असा सल्ला शाह यांनी दिला. ''जीवन आणि समाजाविषयीची तुमची निरीक्षणे तुमच्या स्वतःच्या पद्धतीने तुमच्या कलेच्या माध्यमातून दर्शवा. योग्य नियोजन ठेवा आणि प्रयत्न करत राहा,'' असे त्यांनी सांगितले. 

 

नेमिल शाह यांच्याविषयी : 

नेमिल शाह हे जामनगर येथील कलाकार असून   चित्रपट आणि व्हिडीओ इन्स्टॉलेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. ''दाल-भात'' या त्यांच्या पहिल्याच लघुपटाने राष्ट्रीय चित्रपटासह विविध पुरस्कार जिंकले असून  त्याला  ऑस्करसाठीही अधिकृत प्रवेशिका होती. सन 2023 मध्ये त्यांनी अमेझॉन वर्षावनांवर केलेल्या  कलाकृतीचा  नुकताच  अपिचटपोंग वीरसेथाकुल यांच्यासारख्याच्या कलाकृतींसोबत प्रीमिअर झाला. अलीकडेच त्यांनी सुपर 8mm फिल्म केली असून थायलंड द्वैवार्षिक महोत्सव 2024 मध्ये तिचा सहभाग असेल. सेवन टू सेवन या त्यांच्या पहिल्या फिचर  चित्रपटांची निर्मिती लवकरच सुरु होणार आहे. 24 वर्षीय नेमिल 18 व्या मिफ्फच्या मास्टर क्लासमधले सर्वात तरुण वक्ते आहेत.

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/S.Kakade/D.Rane | 42

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026632) Visitor Counter : 77