पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केले बिहारमध्ये राजगीर येथे नालंदा विद्यापीठ संकुलाचे उद्‌घाटन


“नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि सक्रीय सांस्कृतिक विनिमयाचे प्रतीक आहे”

“नालंदा हे केवळ नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, एक सन्मान आहे, एक मूल्य, एक मंत्र, एक अभिमान आणि एक गाथा आहे”

“या पुनरुज्जीवनाद्वारे भारतातील सुवर्णयुगाचा प्रारंभ होत आहे”

“नालंदा हे भारताच्या इतिहासाचे केवळ पुनरुज्जीवन नाही.जगातील अनेक देश आणि आशियाचा वारसा त्याच्याशी संलग्न आहे”

“भारत अनेक शतके एक आदर्श म्हणून वाटचाल करत राहिला आणि शाश्वततेचे दर्शन घडवले.आम्ही प्रगती आणि पर्यावरणाला सोबत घेऊन पुढे जातो”

“भारत जगासाठी शिक्षण आणि ज्ञानाचे केंद्र बनावा हे माझे मिशन आहे.जगातील सर्वात महत्त्वाचे ज्ञान केंद्र म्हणून भारताची जगात ओळख निर्माण व्हावी हे माझे मिशन आहे”

“भारतामध्ये जगातील सर्वात जास्त समावेशक आणि परिपूर्ण कौशल्य प्रणाली आणि भारतात सर्वात आधुनिक संशोधन आधारित शिक्षण प्रणाली असावी हा आमचा प्रयत्न आहे”

“नालंदा हे जागतिक गरजांची पूर्तता करणारे एक महत्त्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे”

Posted On: 19 JUN 2024 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 17 देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक रोपटेही लावण्यात आले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या 10 दिवसांत नालंदाला भेट द्यायला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत आभार मानले. भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी हे सकारात्मक संकेत आहेत, असे ते म्हणाले. नालंदा हे फक्त एक नाव नाही, ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल,असे त्यांनी अधोरेखित केले.

नालंदाचे तिच्या प्राचीन भग्नावशेषांच्या जवळ पुनरुज्जीवन केल्यामुळे जगाला भारताच्या क्षमतेची ओळख होईल कारण ती जगाला हे सांगेल की भक्कम मानवी मूल्ये असलेल्या देशांमध्ये आपल्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करून एका चांगल्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता असते, असे पंतप्रधान म्हणाले.

नालंदा जगाचा, आशियाचा आणि अनेक देशांचा वारसा आपल्यासोबत वाहात आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन हे केवळ भारतीय पैलूंच्या पुनरुज्जीवनापुरते मर्यादित नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजच्या उद्‌घाटन सोहळ्याला अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतून हे सिद्ध होत आहे असे त्यांनी नालंदा प्रकल्पामध्ये मित्र देशांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत सांगितले. त्यांनी बिहारच्या जनतेची देखील नालंदामध्ये प्रतिबिंबित होत असलेले आपले वैभव परत आणण्याच्या निर्धाराबद्दल प्रशंसा केली.

नालंदा हे एकेकाळी भारताची संस्कृती आणि परंपरा यांचे जिवंत केंद्र होते याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की नालंदाचा अर्थ आहे ज्ञान आणि शिक्षण यांचा सतत वाहात राहणारा प्रवाह आणि हा भारताचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन आणि विचार आहे.    

"शिक्षण हे सीमांच्या पलीकडे आहे. त्याला आकार देताना ते मूल्ये आणि विचार बिंबवत असते., पंतप्रधान म्हणाले की, प्राचीन नालंदा विद्यापीठात विद्यार्थ्यांना त्यांची ओळख आणि राष्ट्रीयत्व विचारात न घेता प्रवेश दिला जात होता.  नव्याने उदघाटन झालेल्या आधुनिक स्वरुपातील नालंदा विद्यापीठाच्या संकुलात त्याच प्राचीन परंपरांना बळकटी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नालंदा विद्यापीठात 20 हून अधिक देशांतील विद्यार्थी आधीपासूनच शिकत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि हे ‘वसुधैव कुटुंबकम’ चे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.

शिक्षणाला मानव कल्याणाचे साधन मानण्याची भारतीय परंपरा पंतप्रधानांनी अधोरेखित केली. त्यांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख करून योग दिन हा आंतरराष्ट्रीय सण बनल्याचे सांगितले. ते म्हणाले की योगसाधनेचे अनेक प्रकार विकसित करूनही, भारतात कोणीही या साधनेवर मक्तेदारी सांगितली नाही. तशाच प्रकारे भारताने आयुर्वेदाची माहिती संपूर्ण जगासोबत सामाईक केली, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भारताची शाश्वततेची भक्ती अधोरेखित केली आणि सांगितले की, भारतात आम्ही प्रगती आणि पर्यावरण एकत्र आणले आहे.यामुळे भारताला मिशन लाइफ आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स सारखे उपक्रम देता आले. ते म्हणाले की, नेट झिरो एनर्जी, नेट झिरो एमिशन, नेट झिरो वॉटर आणि नेट झिरो वेस्ट मॉडेलसह नालंदा संकुल शाश्वततेची भावना पुढे नेईल.

शिक्षणाच्या विकासामुळे अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची मुळे अधिक खोलवर रुजतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. जागतिक अनुभवातून आणि विकसित देशांच्या अनुभवातून हे सिद्ध झाले आहे.2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या लक्ष्याच्या दिशेने काम करणारा भारत आपल्या शिक्षण प्रणालीत परिवर्तन करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.भारत हे जगासाठी शिक्षण आणि ज्ञानाचे केंद्र बनणे हे माझे मिशन आहे. माझे मिशन हे आहे की भारत पुन्हा जगातील सर्वात प्रमुख ज्ञान केंद्र म्हणून ओळखला जावा. एक कोटीहून अधिक मुलांना शिक्षण देणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब्स , चांद्रयान आणि गगनयान द्वारे निर्माण होणारी विज्ञानाची आवड आणि 10 वर्षांपूर्वी केवळ काही शेकडा असलेल्या स्टार्टअपची  संख्या 1.30 लाखांवर नेणारे स्टार्ट अप इंडियासारखे उपक्रम, विक्रमी संख्येने दाखल होणारे पेटंट आणि संशोधन प्रबंध आणि एक लाख कोटी संशोधन निधी याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

जगातील सर्वात प्रगत संशोधन-केंद्रित उच्च शिक्षण प्रणाली  सोबतच सर्वात व्यापक आणि संपूर्ण कौशल्य प्रणाली तयार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  जागतिक क्रमवारीत भारतातील विद्यापीठांच्या सुधारित कामगिरीचाही त्यांनी उल्लेख केला.  गेल्या 10 वर्षात शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात भारताच्या अलीकडील कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी QS रँकिंगमध्ये भारतीय शैक्षणिक संस्थांची संख्या 9 वरून 46 वर, तर  टाइम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंगमध्ये 13 वरुन 100 वर पोहचल्याचा उल्लेख केला. भारतात गेल्या 10 वर्षांत दर आठवड्याला एक विद्यापीठ स्थापन केले गेले आहे, दररोज एक नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे, दर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उघडण्यात आली आहे आणि दररोज दोन नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात आज 23  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आहेत, आज भारतीय व्यवस्थापन संस्थांची (IIM) संख्या 13 वरून 21 वर पोहोचली आहे आणि एम्स (AIIMs) ची संख्या जवळपास तीन पटीने वाढून 22 वर पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.गेल्या 10 वर्षात देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या देखील जवळपास दुप्पट झाली आहे.", असे ते म्हणाले.  शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांबाबत बोलताना, पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख केला आणि या नव्या धोरणामुळे भारतीय तरुणांच्या स्वप्नांना एक नवीन आयाम मिळाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आणि परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याचा तसेच डीकिन आणि वोलोंगॉन्ग सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे देशात नवीन कॅम्पस स्थापित केले जाण्याचा उल्लेख केला.या सर्व प्रयत्नांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भारतातच सर्वोत्तम शैक्षणिक संस्था उपलब्ध झाल्या आहेत.  यामुळे आपल्या मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत होत आहे, असेही पंतप्रधानांनी पुढे सांगितले.

नुकत्याच सुरू झालेल्या प्रमुख भारतीय संस्थांच्या जागतिक कॅम्पसचा उल्लेख करून पंतप्रधानांनी नालंदा विद्यापीठाबाबतही असेच घडण्याची आशा व्यक्त केली.

जगाच्या नजरा भारतीय तरुणांवर खिळल्या आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत हा भगवान बुद्धांचा देश आहे आणि जगाला लोकशाहीची जननी असलेल्या भारताबरोबर खांद्याला खांदा लावून चालण्याची इच्छा आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. जेव्हा भारत 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' म्हणतो तेव्हा जग भारताबरोबर उभे राहते. भारत जेव्हा ‘एक सूर्य, एक जग, एक ग्रिड’ म्हणतो तेव्हा तो जगाच्या भविष्याचा मार्ग मानला जातो.  जेव्हा भारत ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ म्हणतो तेव्हा जग त्यांच्या विचारांचा आदर करते आणि या विचारांचा स्वीकारही करते.नालंदाची भूमी विश्वबंधुत्वाच्या या भावनेला नवा आयाम देऊ शकते.त्यामुळे नालंदा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर आणखी मोठी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

नालंदा विद्यापीठाचे विद्यार्थी आणि विद्वान हे भारताचे भविष्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना ‘नालंदा विद्यापीठाचा वैचारिक मार्ग’ आणि ‘नालंदा विद्यापीठाची मूल्ये’ सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले.या विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, धैर्यवान  आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या बोधचिन्हानुसार दयाळू बनून समाजात सकारात्मक बदलासाठी काम करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

नालंदा विद्यापीठाचे ज्ञान मानवतेला दिशा देईल आणि आगामी काळात हे ज्ञान प्राप्त झालेले तरुण संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.  "मला विश्वास आहे की नालंदा विद्यापीठ  जागतिक कल्याणासाठी काम करणारे एक महत्त्वाचे केंद्र बनेल", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

बिहारचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि  सम्राट चौधरी,नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरविंद पनगरिया आणि नालंदा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. अभय कुमार सिंग यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

नालंदा विद्यापीठ प्रांगणात दोन शैक्षणिक ब्लॉक असून यातील 40 वर्गखोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे 1900 इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले दोन सभागृहे आहेत.येथे सुमारे 550 विद्यार्थी क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे.  या प्रांगणात आंतरराष्ट्रीय केंद्र, सुमारे 2000 लोकांना सामावून घेणारे ॲम्फी थिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.

हे प्रांगण ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करणारे हरित प्रांगण आहे.  हे प्रांगण सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र,100 एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयं-पूर्ण आहे.

या विद्यापीठाचा इतिहासाशी गहिरे नाते आहे.सुमारे 1600 वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. 2016 मध्ये, नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

S.Tupe/N.Chitale/S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2026602) Visitor Counter : 54