माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आलेले जुने चित्रपट मिफ्फमध्ये दाखवण्यात येणार


18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे, ऋत्विक घटक आणि आणखी बरेच काही : सिनेमाप्रेमींसाठी पर्वणी

Posted On: 18 JUN 2024 10:00PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या संग्रहातील निवडक लघुपट, ऍनिमेशनपट  आणि माहितीपट  अनुभवण्याची एक अनोखी संधी मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत हे चित्रपट डिजिटल पद्धतीने पुनर्संचयित केले असून भारतातील समृद्ध सिनेमॅटिक वारसा अधोरेखित करतात.

1980 मध्ये सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला "पिकू" हा यातील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 26 मिनिटांचा हा बंगाली चित्रपट रे यांच्या पिकूर डायरी या लघुकथेचे चित्रपट  रूपांतर आहे. लहान पिकूच्या आयुष्यातील एक दिवस यात दाखवला असून त्याच्या आई-वडिलांच्या विस्कळीत नातेसंबंधाच्या गुंतागुंतीचा प्रवास आणि त्याच्या निष्पाप एकाकी जगाचे मार्मिक चित्रण यात आहे.

1981 मध्ये बी. आर. शेंडगे यांनी दिग्दर्शित केलेला "द आर्ट ऑफ ॲनिमेशन", ॲनिमेशनच्या कष्टप्रद प्रक्रियेची ओळख करून देतो. 10 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट कागदावरील स्थिर प्रतिमांपासून ते आकर्षक  चलचित्रांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवतो.

1965 मध्ये ऋत्विक घटक यांनी दिग्दर्शित केलेला "फिअर" हा भविष्यातील पार्श्वभूमी दाखवणारा दुर्मिळ लघुपट आहे आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थांच्या  विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देण्याच्या दृष्टीने तयार केला आहे. 16 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट एका येऊ घातलेल्या आण्विक हल्ल्याचा सामना करत असलेल्या सैनिकी तळावर बेतलेला आहे.

1988 मध्ये संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला "द स्टोरी ऑफ टिब्लू" हा अरुणाचल प्रदेशातील इडू या दुर्गम खेड्यातील नऊ वर्षांच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास आहे. 84 मिनिटांच्या या हिंदी चित्रपटात टिब्लूचे शिक्षणाप्रति  प्रेम आणि त्याचा तिच्या समाजावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दाखवण्यात आला आहे.

2018 मध्ये संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केलेल्या "अराउंड इंडिया विथ अ मूव्ही कॅमेरा" मध्ये साबू आणि गांधी यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटिश आणि भारतीय उपखंडातील सामायिक इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी संग्रहित प्रतिमा वापरल्या आहेत. 86 मिनिटांचा हा इंग्रजी चित्रपट एक काव्यात्मक आणि आकर्षक कथा सादर करतो.

1978 मध्ये दीपक हळदणकर यांनी दिग्दर्शित  केलेल्या "व्हेअर टाइम स्टँड स्टिल" मध्ये अभूजमाड आणि बस्तर क्षेत्राच्या लगतच्या परिसरातील आदिवासींचे मानववंशशास्त्रीय चित्रण आहे. 11 मिनिटांचा हा हिंदी चित्रपट त्यांच्या आत्मनिर्भर कृषी पद्धती, सामाजिक चालीरीती आणि सामुदायिक सहभाग अधोरेखित करतो.

विविध संकल्पनाधारित आणि विविध कालखंडातील भारतीय चित्रपट निर्मितीचा पुनर्संचयित ठेवा खुला करून सिनेसृष्टीचा अनुभव समृद्ध करण्याची बांधिलकी मिफ 2024 मधून प्रतीत होते. हे चित्रपट प्रदर्शन भारताचा सिनेजगताचा वारसा जतन आणि साजरा करण्यासाठी महोत्सवाचे समर्पण अधोरेखित करते.

एनएफडीसी- एनएफएआय विषयी 

पुण्यात मुख्यालय असलेले एनएफडीसी- एनएफएआय हे भारत आणि जगभरातील चित्रपटांचे संकलन, सूची आणि जतन करण्यासाठी जबाबदार आहे. मूकपट, माहितीपट, कथापट आणि लघुपटांसह 30,000 हून अधिक चित्रपटांच्या विशाल संग्रहासह, एनएफएआय भारताच्या सिनेसृष्टीतील इतिहासाचे संरक्षक म्हणून काम करते.

चित्रपट जतनासाठी एनएफएआय ची बांधिलकी ही त्याच्या अत्याधुनिक चित्रपट संकलन सुविधा, तापमान-नियंत्रित व्हॉल्ट्स आणि चित्रपट रिळांची काळजीपूर्वक देखभाल करणाऱ्या समर्पित तज्ञ कर्मचाऱ्यांमधून प्रतीत होते. 

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान)

वर्ष 2015 मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी उपक्रम आहे. भारताच्या अफाट सिनेसृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एनएफएचएम हा एक बृहद उपक्रम आहे ज्यामध्ये चित्रपट संरक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश आहे, ज्यामध्ये खराब होत चाललेल्या चित्रपटांचे पुनर्संचयन करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तावेज बनवणे आणि खबर्दारीपूर्वक संवर्धन यांचा समावेश आहे. हे सर्व एनएफडीसी- एनएफएआय च्या पुणे येथील संकुलात अत्याधुनिक पुनर्संचयन आणि डिजिटायझेशन सुविधेद्वारे केले जाते. 

एनएफडीसी- एनएफएआय गेल्या अनेक महिन्यांपासून पुनर्संचयनावर काम करत आहे ज्यात प्रत्येक फ्रेम चे काळजीपूर्वक पुनर्संचयन केले जात आहे. आपला सेनेविश्वाचा इतिहास आणि आज आपण 4K रिझोल्यूशनमध्ये बघत असलेली सामग्री जतन करणे हा यामागचा उद्देश आहे.

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/Sushama/Vasanti/D.Rane | 37

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026378) Visitor Counter : 43