माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18व्या मिफ्फ मध्ये सुवर्ण शंख पुरस्कारासाठी चौदा माहितीपटांमध्ये चुरस


आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात रौप्य शंख पुरस्कारासाठी चार ॲनिमेशनपट आणि सात लघु कथापट स्पर्धेत

माहितीपटाच्या संकल्पनांमध्ये चिकाटीपासून मानवी संघर्षापर्यंत आणि न्याय आणि ओळख प्राप्तीचा वेध असे वैविध्य

Posted On: 18 JUN 2024 8:45PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

या वर्षी सुरू असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाकरिता असलेल्या सुवर्ण शंख पुरस्कारासाठी तीन भारतीय चित्रपटांसह चौदा चित्रपटांमध्ये चुरस आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी एकूण 25 चित्रपट निवडले गेले आहेत ज्यात माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांसाठी स्वतंत्र श्रेणी समाविष्ट आहेत.

माहितीपट विभागात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाला सुवर्ण शंख आणि रोख 10 लाख रुपयांचा पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघु कथापटाला आणि ॲनिमेशनपटाला रौप्य शंख आणि प्रत्येकी 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले जाईल. 

याशिवाय सर्वाधिक अभिनव/प्रायोगिक चित्रपटाकरिता एक विशेष ज्युरी पुरस्कार - प्रमोद पती पुरस्कार देखील दिला जाणार आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट ध्वनीरचनेसाठी तीन तांत्रिक पुरस्कार प्रदान केले जातील जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्पर्धा विभागांसाठी समान आहेत. आंतरराष्ट्रीय बिगर -स्पर्धा PRISM विभागात पाच चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ज्युरीमध्ये केको बँग, बार्थेलेमी फुगिया, ऑड्रिअस स्टोनीस, भरत बाला आणि मानस चौधरी यांसारख्या जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील माहितीपट विविध संकल्पनांनी युक्त असतात, ज्यात वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांचा खोलवर विचार केला जातो. एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत व्यक्तींची चिकाटी आणि वैयक्तिक जीवनप्रवास. "लव्हली जॅक्सन" हा मॅट वाल्डेक दिग्दर्शित अमेरिकेतील माहितीपट चुकीच्या पद्धतीने 39 वर्षांसाठी तुरुंगवास भोगलेल्या आणि परतल्यावर जीवनाचा अर्थ उमजून स्वतःतील तरुणाईचा बोध घेणाऱ्या रिकी जॅक्सनची वेदनादायक परंतु प्रेरणादायी कहाणी उलगडतो. त्याचप्रमाणे, "हायफन" हा लेबनॉनमधील अरबी/इंग्रजी माहितीपट, व्यसनाशी झुंजणाऱ्या, वैयक्तिक विकासासाठी, सामाजिक दडपशाहीविरोधात कल्पनांचा धांडोळा घेणाऱ्या आणि स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्त्रीच्या आव्हानात्मक प्रवासाचे चित्र रेखाटतो. "धोरपाटन- नो विंटर हॉलिडेज" या नेपाळी माहितीपटात दोन वृद्ध प्रतिस्पर्ध्यांची कहाणी चित्रित केली आहे ज्यांनी त्यांच्या निर्जन गावात एकत्र राहण्यासाठी भूतकाळातील संघर्ष बाजूला ठेवून जीवनाच्या संधिप्रकाशात सलोखा आणि सहनशीलता या विषयांवर प्रकाश टाकला आहे.

दुसरी प्रमुख संकल्पना  म्हणजे समुदायांना भेडसावणाऱ्या  सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक आव्हानांचा शोध घेणे. सर्वनिक कौर चा "अगेन्स्ट द टाइड", हा  भारतीय माहितीपट दोन मच्छीमार बांधवांचे विरोधाभासी जीवन दाखवतो  जे  परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील व्यापक सामाजिक संघर्षांचे रूपक आहे. निष्ठा जैन यांचा  "द गोल्डन थ्रेड" हा भारतीय माहितीपट कोलकाता मधील कामगार-केंद्रित जूट उद्योगावर प्रकाश टाकतो, जो औद्योगिक कामगारांचे कठोर वास्तव समोर आणतो.   डल्स फर्नांडिस दिग्दर्शित "कॉन्टोस डू एस्क्वेसिमेंटो"मध्ये अटलांटिक गुलामांच्या व्यापारात पोर्तुगालची विस्मरणात गेलेली भूमिका दाखवताना  ऐतिहासिक अन्याय समोर आणला आहे.

जागतिक घडामोडींचा वैयक्तिक प्रभाव पर्शियन माहितीपट  "माजराये साले अखर" मध्ये चित्रित केला आहे. यामध्ये महामारीच्या काळात डिजिटल युगाशी जुळवून घेणाऱ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा संघर्ष दाखवला आहे.  अशा वैविध्यपूर्ण कथांच्या माध्यमातून माहितीपट वैयक्तिक संघर्ष आणि मोठ्या सामाजिक-राजकीय संदर्भांचे छेदनबिंदू एकत्रितपणे अधोरेखित करतात आणि मानवी लवचिकता, स्मरणशक्ती आणि न्याय आणि अस्तित्वाच्या शोधाबाबत मार्मिक विचार मांडतात.  विघ्नेश कुमुलाई यांचा 'करपरा' हा मिफ्फ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील तिसरा माहितीपट आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील ॲनिमेशन विभाग आणि काल्पनिक लघुपट   विभागात वैभव कुमारेश दिग्दर्शित 'रिटर्न ऑफ द जंगल', सचिन धीरज मुदिगोंडा दिग्दर्शित 'मेन इन ब्लू', जया सुरिया दिग्दर्शित 'द ड्यूड अँड द व्हाईट रोज' आणि विवेक राय दिग्दर्शित 'शांती' हे भारतीय चित्रपट देखील आहेत.  या वर्षी, मिफ्फ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात इटली, पोलंड, चीन, अमेरिका, पोर्तुगाल, नेदरलँड, इस्रायल, जपान, लेबनॉन, नेपाळ, इराण, झेक प्रजासत्ताक, ब्रिटन, सर्बिया, एस्टोनिया, रशिया आणि गौतेमाला येथील चित्रपट दाखवले जात  आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील माहितीपट, काल्पनिक लघुपट आणि ॲनिमेशनपटांच्या अधिक तपशीलांसाठी भेट द्या:

https://miff.in/wp-content/uploads/2024/06/FINAL-COMPILATION-V12.pdf

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/Vasanti/Sushma/D.Rane | 33

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026327) Visitor Counter : 68