माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) अॅनिमेशन वरील क्रॅश कोर्स आणि व्हीएफएक्स पाईपलाईनच्या प्रारंभाने उदयोन्मुख अॅनिमेटर्समध्ये उत्साह
Posted On:
17 JUN 2024 9:28PM by PIB Mumbai
मुंबई, 17 जून 2024
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) सिनेप्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, त्या अॅनिमेशन वरील अल्पकालावधीच्या अभ्यासक्रमाचा अर्थात क्रॅश कोर्सचा आणि व्हीएफएक्स पाईपलाईनचा मोठ्या उत्साहात प्रारंभ केला गेला. वॉर्नर ब्रदर्समध्ये अत्यंत अनुभवी अॅनिमेटर म्हणून कार्यरत असलेले राहुल बाबू कन्निक्कारा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) वतीने राबवल्या जात असलेल्या या विशेष आणि सर्व मुद्यांना स्पर्श करणाऱ्या उपक्रमाला कालपासून या सुरुवात झाली. एकूण पाच दिवस हा उपक्रम चालणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) संकुलात सुरु असलेल्या या उपक्रमात सहभागी सिनेप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
अॅनिमेशन क्षेत्राच्या तांत्रिक मुद्यांशी संबंधित असलेल्या या कार्यशाळेत देशाच्या विविध भागांमधील तसेच इतर देशांमधील 23 उदयोन्मुख अॅनिमेटर सहभागी होत आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व सहभागींना कार्यशाळेतून अ ॅनिमेशन , चित्रपट, मालिका आणि गेमिंगच्या जगताविषयी संबंधीत इत्यंभूत ज्ञान आणि माहिती मिळवण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेत अ ॅनिमेशन क्षेत्राविषयी सखोलपणे समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या 16 ते 55 या वयोगटातले युवा आणि प्रौढ असे सर्वच सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेत शिकवणी मार्गदर्शनाकरता अ ॅनिमेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेंडर या सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. यामुळे सहभागींना अॅनिमेशनविषयी काहीच माहिती नसली तरीदेखील, अॅनिमेशनशी संबंधित अगदी पहिल्या टप्प्यावरच्या मूलभूत मुद्यांसह सर्व बारकावे खोलवर समजून घेण्यात तसेच स्वतःच्या सर्जनशीतेला कृतीत उतरवण्यात मोठी मदत मिळणार आहे.
बॅटमॅन आणि वंडर वुमन यांसारख्या जगप्रसिद्ध आणि अॅनिमेशन क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या प्रकल्पांवर केलेल्या कामासाठी ओळखले जाणारे राहुल बाबू कन्निक्कारा हे या कार्यशाळेत सहभागींना मार्गदर्शन करत आहेत. अॅनिमेशनचा प्रत्यक्ष वापर आणि या क्षेत्राविषयीचे त्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि या क्षेत्रातील व्यवसाय उद्योगातील आपल्या निपुणतेचा कौशल्याने वापर करत, ते सहभागींना स्वत:च्या संकल्पनेतली अॅनिमेशन क्लिप तयार करण्यात तसेच चित्रपट आणि गेमिंग अॅनिमेशन पाइपलाइनचे बारकावे समजून घेण्यात मदत करत आहेत. राहुल बाबू कन्निक्कारा हे अॅनिमेशन क्षेत्रातले दिग्गज अनुभवी व्यक्तिमत्व असून, ते कॅनडात मॉन्ट्रियल इथे स्थायिक झाले आहेत. ही कार्यशाळा म्हणजे सहभागींसाठीची अॅनिमेशनवरील प्राथमिक मूलभूत अभ्यासक्रम अर्थात फाऊंडेशनल कोर्सच असून, यामुळे या क्षेत्राशी नव्याने जोडल्या जात असलेल्यांमध्ये अॅनिमेशनबद्दल प्रचंड रस निर्माण व्हायला मदत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या कार्यशाळेच्या अखेरीला सर्व सहभागींना स्वतःचा 10 ते 15 सेकंदांचा अॅनिमेशन व्हिडिओदेखील तयार करायला दिला जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी झालेले बहुतांश विद्यार्थी या क्षेत्रासाठी नवखे असले तरी, कार्यशाळेत त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद खूपच सकारात्मक असून, त्यांना शिकवलेल्या गोष्टींचे ते वेगाने आकलनही करत आहेत. ब्लेंडर या सॉफ्टवेअरचा सुलभतेने वापर करण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांना जगभरातील अॅनिमेशन क्षेत्राशी संबंधित उद्योगजगताबद्दल आवश्यक मूलभूत माहिती प्रदान करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. हा संक्षिप्त कालावधीचा अभ्यासक्रम जेव्हा संपेल, तेव्हा या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना व्हीएफएक्स आणि गेमिंग पाईपलाईनचा देखील अनुभव मिळालेला असेल असा विश्वासही राहुल बाबू कन्निक्कारा यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना या क्षेत्रातील कारकिर्दिच्या संधींविषयी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे, त्यामुळे त्यांना भारतात तसेच परदेशातही अॅनिमेशनशी संबंधित उपलब्ध असलेल्या रोजगार आणि नोकरीच्या संधी शोधण्यात मोठी मदत होणार आहे.
अॅनिमेशन हे कला जगतातील सध्याचे वेगाने वाढत असलेले क्षेत्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्षाळेत सहभागी झालेल्यांना या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज करणे हे देखील कार्यशाळेचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. या कार्यशाळेत ऑस्ट्रेलियातील महत्त्वाकांक्षी अॅनिमेटर मॅक्सिन जार्डिनर यांनीही सहभाग घेतला आहे. पात्रांना खाली वर करण्यासाठीची हालचाल कशी द्यावी, पात्रांनी उडी मारण्याचा परिणाम कसा साधावा तसेच पात्र योग्य शारिरीक स्थितीत असावेत यासाठी काय करावे या आणि अशा अत्यंत मूलभूत गोष्टी आपण शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. अॅनिमेश करताना इच्छित परिणाम साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कि फ्रेम्स नेमक्या कशा काम करतात, त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दलही आपण समजून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या लोकांच्या गाठीभेटी होण्याच्या दृष्टीने तसेच नवा अनुभव देणारे चित्रपट पाहण्याची संधी म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे उत्तम व्यासपीठ आहे. या महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या चर्चासत्रांचा आपण खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकलो. ही चर्चासत्रे प्रत्येकाला बांधून ठेवणारी होती, त्यामधून विविध चित्रपट दिग्दर्शकांबद्दलची नवी माहिती मिळाली, चित्रपटासारख्या माध्यमातून कलात्मकपद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याचे तसेच आसपासच्या विविध कथा या माध्यमातून इतरांपर्यंत पोहचवण्याचे महत्व या चर्चांमधून कळले. या सगळ्यामुळे आता आणखी सिनेमे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे, अशा शब्दांत मॅक्सिन यांनी आपला महोत्सवाबद्दलचा अनुभव मांडला.
फ्रीलान्सर आणि पॉलिमर तंत्रज्ञ असलेल्या जोस पॉल यांनीही स्वतःचा अनुभव मांडला. आपण स्वत:तल्या कौशल्यात अधिकची भर टाकण्यासाठी आणि अॅनिमेशनविषयी शिकण्यासाठी या अभ्यासक्रमाकरता नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेमुळे स्वतःच्या व्यावसायिक प्रगतीला मोठी मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अॅनिमेशन क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी मोठा वाव आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या कारकिर्दीसाठीचा पर्याय म्हणून अॅनिमेश क्षेत्राचाही विचार करावा, यादृष्टीने लोकांमध्ये अॅनिमेशन क्षेत्राबद्दलचा रस वाढवणे हा या कार्यशाळेचा एक मूलभूत उद्देश आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तसेच पुरस्कार प्राप्त माहितीपट आणि अॅनिमेशन लघुपटांशी संबंधित उपक्रमांध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून दिली आहे. हे विद्यार्थी या क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवरांच्या मार्गदर्शन लाभलेल्या विशेष मास्टरक्लास सत्रांमध्येही सहभागी होत आहेत. येत्या 20 जून 2024 रोजी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.
* * *
PIB Team MIFF | M.Chopade/T.Pawar/D.Rane | 27
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025995)
Visitor Counter : 84