माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फ मधील ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची जादू’ या विषयावरील चर्चा सत्रात चित्रपट उद्योगासाठी तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे यावर विचारमंथन


मिफ्फ-2024 मध्ये चित्रपट निर्मितीवरील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतिकारी प्रभावाचे तज्ञांनी केले अवलोकन

Posted On: 17 JUN 2024 9:05PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जून 2024

 

मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये आज एआय, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चित्रपट उद्योगावरील परिवर्तनात्मक प्रभावावर उद्बोधक पॅनेल चर्चा झाली. ‘द मॅजिक ऑफ एआय (कृत्रिम बुद्धिमत्तेची जादू)’ या विषयावरील हे सत्र चित्रपट निर्मितीमधील एआय तंत्रज्ञानाची व्याप्ती, प्रयोग आणि नैतिकता या मुद्द्यांवर केंद्रित होते. पॅनेलच्या सदस्यांनी ‘एआय’चे फायदे आणि संभाव्य तोटे या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा केली आणि चित्रपट उद्योगावरील त्याच्या प्रभावाचा सर्वसमावेशक आढावा प्रेक्षकांपुढे मांडला.  

पॅनेल सदस्यांमध्ये चित्रपट उद्योगातील नामवंत व्यक्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांचा समावेश होता. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि त्रिवेंद्रम येथील एआय शंकर रामकृष्णन, ‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्स इंडिया’चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशनचे तांत्रिक सल्लागार उज्वल निरगुडकर, फायरफ्लाय क्रिएटिव्ह स्टुडिओचे सहसंस्थापक आणि संचालक सनथ पी.सी., आणि चितकारा विद्यापीठातील ॲनिमेशन आणि डिझाइनचे डीन संजय जांगीड, यांचा समावेश होता. सायन्स कम्युनिकेटर आणि सायन्स फिल्म क्युरेटर डॉ. निमिष कपूर यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे विज्ञान प्रसार यांच्यासह या सत्राला संबोधित केले.  

शंकर रामकृष्णन यांनी एआय ने चित्रपट निर्मितीमध्ये आणलेल्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकताना सांगितले की, एआय चित्रपटाच्या सेटवर प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ कमी करून अनेक कामांचे अचूक व्यवस्थापन करते. त्यांनी निदर्शनास आणून दिले की एआय मानवी श्रमाची गरज कमी करते, मात्र त्यामुळे मानवाने तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहण्याचा धोका देखील संभवतो. "एआय केवळ एका क्लिकवर सर्व प्रकारच्या कामांचे व्यवस्थापन करू शकते, मात्र त्याचवेळी आपल्यासाठी कामे करून आपल्याला आळशी देखील बनवू शकते," त्यांनी नमूद केले. उज्ज्वल निरगुडकर यांनी तंत्रज्ञानाच्या जलद विकासावर आणि त्यामध्ये सतत नवे बदल होण्याच्या गरजेवर भर दिला.

त्यांनी पारंपारिक एआय, जो अंदाज करण्यासाठी डेटामधील नमुन्यांवर अवलंबून असतो आणि जनरेटिव्ह एआय, जो उपलब्ध डेटापासून शिकून त्याच्यासारखा नवीन डेटा तयार करतो, या दोन एआय मधील फरक स्पष्ट केला.

चित्रपट उद्योगातील नवोदित आणि लहान निर्मात्यांसाठी हे क्षेत्र सुलभ करण्याची एआय ची  क्षमता त्यांनी अधोरेखित केली. स्टोरीबोर्ड तयार असल्यावर त्या प्रकल्पासाठी आवश्यक घटक एआय कसे सुचवू शकते, हे त्यांनी सांगतले, मात्र याचा वापर नैतिकतेने व्हायला हवा, असे सूचित केले.

सनाथ पी.सी. यांनी एआय ची स्वतः विचार करण्याची क्षमता आणि चित्रपटांच्या कथाकथन शैलीत आणखी भर घालण्याच्या भूमिकेवर चर्चा केली. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे  महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि कोणतेही सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञान मानवाद्वारे कसे नियंत्रित केले जाते आणि आपल्या गरजेनुसार त्यात बदल करता येतो, हे सांगितले. एआयचा जबाबदारीने वापर करणे ही आपली जबाबदारी कशी आहे, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.

संजय जांगीड यांनी एआय च्या संभाव्य प्रभावाची तुलना वीज, इंटरनेट आणि मोबाईल फोन यांसारख्या भूतकाळातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीशी केली. एआयचा शॉर्टकट म्हणून वापर करण्याविरुद्ध इशारा देत त्यांनी नैतिक वापराच्या महत्त्वावर भर दिला. “तुम्ही कचरा वापरलात, तर त्यापासून कचराच मिळेल. आपण एआयचा वापर काळजीपूर्वक आणि केवळ चांगल्या कारणांसाठी करायला हवा,” ते म्हणाले.

नैतिकता आणि जबाबदार वापराची गरज अधोरेखित करत, चित्रपट उद्योगात क्रांती घडवण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता या चर्चेने अधोरेखित केली.

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/R.Agashe/D.Rane | 25

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025991) Visitor Counter : 49