माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मिफमधील पर्यावरण-प्रेरित चित्रपटांच्या पॅकेजच्या माध्यमातून करा ‘मिशन लाईफ’चा अंगीकार


Posted On: 17 JUN 2024 2:32PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जून 2024

 

शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन पर्यावरण रक्षणाप्रती नागरी जबाबदारीची भावना रुजवण्याचा एक प्रयत्न म्हणून 18 व्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “मिशन लाईफ” या शीर्षकाखाली विशेष पॅकेजमधील चित्रपट सादर होणार आहेत. सीएमएस वातावरण यांच्यातर्फे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट संग्रहामध्ये मानवजात  आणि पृथ्वी यांच्यातील गुंतागुंतीच्या आणि सहजीवनात्मक नातेसंबंधांचा शोध घेणाऱ्या आणि अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या पाच चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट पृथ्वीशी असलेल्या आपल्या गहन संबंधांचे मार्मिक स्मरण करून देऊन आपल्या सुसंवादी सह-अस्तित्वाच्या तातडीच्या गरजेवर अधिक भर देतात.

“मिशन लाईफ” : या विशेष पॅकेजमध्ये सादर होणारे चित्रपट

1) सेव्हिंग द डार्क

जगातील 80% लोकसंख्या आता आकाशगंगा पाहू शकत नाही. तारे आपल्या दृष्टीस पडत नाहीत तेव्हा आपण नेमकं काय गमावतो? अति प्रमाणातील आणि अयोग्य पद्धतीची प्रकाशयोजना हि आपल्याला  रात्रीच्या आकाशाचे दर्शन घडण्यावर  मर्यादा घालते, झोपेच्या चक्र  पद्धतींमध्ये अडथळे निर्माण करते आणि निशाचर जीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करते. एलईडी तंत्रज्ञानामध्ये सध्या होत असलेली प्रगती अनेक शहरांतील रस्ते सुरक्षित पद्धतीने प्रकाशिक करणे शक्य करते तसेच रात्रीच्या काळातील वातावरणाला धक्का न लावता उर्जा बचतीचे देखील कार्य करते. ‘सेव्हिंग द डार्क’ हा चित्रपट रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या आकाशाचे जतन करण्याच्या गरजेबाबत आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो आणि प्रकाशामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आढावा घेतो.

 

2) लक्ष्मण-रेखा (लक्ष्मणाने आखलेली रेषा)

“लक्षमण-रेखा” हा चित्रपट म्हणजे लक्ष्मण सिंग या शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या व्यक्तीने एका दुष्काळग्रस्त गावासह भारतातील ग्रेट इंडियन वाळवंट भागातील 58 गावांचे नशीब बदलून टाकणाऱ्या स्वयंस्फूर्त शक्तीमध्ये परिवर्तीत करून चैतन्य कसे निर्माण केले याची कहाणी दाखवणारा एक मनस्वी, चित्रपटीय झरोका आहे. तिथे आजच्या काळातही पाणी पुरवठा अत्यंत अनियमित आहे आणि अशा वेळी हा लक्ष्मण सिंग पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम चालवतो. मात्र, आजूबाजूचे लोक त्याचे म्हणणे गांभीर्याने ऐकतात की ते एखाद्या चमत्काराच्या प्रतीक्षेत आहेत? याचे उत्तर हा चित्रपट देतो. 

 

3) द क्लायमेट चॅलेंज

आपण हवामानविषयक संकटाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत. या हवामान बदलाच्या संकटाचा सर्वाधिक फटका जगाच्या क्रायोस्फेरिक भागातील म्हणजेच आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालय या प्रदेशांना बसल्यामुळे हे भाग वाईट प्रकारे प्रभावित झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आर्क्टिक महासागरावरील हिमाच्छादन 30 टक्क्यांनी कमी झाले आहे आणि या भागात बर्फ वितळण्याची क्रिया वेगवान झाल्याचे दिसते आहे. या घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी शास्त्रज्ञ आता टोकाच्या परिस्थितींच्या अभ्यासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. द क्लायमेट चॅलेंज हा चित्रपट तुम्हाला आर्क्टिक, हिमालय आणि महासागराच्या दक्षिणेकडील भागाच्या सफरीवर घेऊन जातो आणि तेथील जीवघेण्या परिस्थितीचे दर्शन घडवून त्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

 

4) द जवार बॅलेड (ज्वारीची गाथा)

द जवार बॅलेड (ज्वारीची गाथा) या चित्रपटातून भरड धान्याची स्वदेशी वाणं, वैविध्यपूर्ण पाककृती आणि त्यात अंतर्भूत असलेल्या भरड धान्ये पिकवण्याच्या पारंपरिक पद्धती सजीव होऊन अवतरल्या आहेत. या संदर्भातील समृध्द परंपरा विविध लोकगीते, परंपरा आणि कहाण्यांतून आपल्यासमोर येतात तर त्याचवेळी कोरडवाहू भागात भरड धान्यांच्या लागवडीचे प्रमाण घसरल्याबद्दल शेतकरी मंडळी दुःख व्यक्त करतात. नव्या प्रकारच्या कृषी लागवड वाणांमुळे आरोग्य आणि सुगी दोन्हींसाठी जोखीम निर्माण झाली आहे याचा पुनरुच्चार ज्येष्ठ मंडळी करतात.

 

5) पेंग यू साई

पेंग यू साई हा एक शोधात्मक माहितीपट असून तो भारतीय महासागरात आढळणाऱ्या  मंटा रेज या माशांच्या बेकायदेशीर व्यापारावर प्रकाश टाकतो. या माहितीपटाच्या माध्यमातून वन्यजीव प्रदर्शक मलाईका वाझ हि   भारतीय महासागरातील मासेमारी बोटींमधून बेकायदेशीर व्यापारी व्यवहारांचा माग काढत भारत-म्यानमार सीमेपर्यंत जाते आणि शेवटी हॉंगकॉंग तसेच चीनमधील ग्वांग्झू भागातील वन्यजीव तस्करी केंद्रांमध्ये गुप्तपणे शिरते. या तिच्या प्रवासात, या महाकाय महासागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेत असतानाच ती मच्छिमार, मध्यस्थ, तस्कर, सशस्त्र दलांचे जवान आणि वन्यजीव व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना भेटते.

 

* * *

PIB Team MIFF | JPS/S.Chitnis/D.Rane | 22

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025881) Visitor Counter : 45