पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात झाले सहभागी

Posted On: 14 JUN 2024 10:14PM by PIB Mumbai

 

इटलीमध्ये अपुलिया येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियनया विषयावरील संपर्क सत्रात आपले विचार व्यक्त केले. 50 व्या वर्धापन दिनापर्यंत मजल मारण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांनी या समूहाचे अभिनंदन केले. 

मानव जमातीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेतून आपली फेरनिवड झाल्यानंतर या परिषदेला उपस्थित राहताना आपल्याला अतिशय समाधान वाटत आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. कोणतेही तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी ते मानवकेंद्रित दृष्टीकोनावर आधारित असावे लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक सेवा वितरणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून मिळालेल्या यशाचा दाखला दिला. सर्वांसाठी एआयया तत्वावर आधारित असलेल्या भारताच्या एआय मिशनविषयी बोलताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की सर्वांच्या प्रगतीला आणि सुबत्तेला चालना देण्याचे तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवूनच भारत एआयसाठी जागतिक भागीदारीचा संस्थापक सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देत आहे.

पंतप्रधानांनी भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या मार्गाबद्दल अधिक सविस्तर माहिती देताना सांगितले की या मार्गाचा दृष्टीकोन उपलब्धता, हाताळणी, परवडण्याजोगी स्थिती आणि स्वीकृती यावर आधारित आहे. 2070 सालापर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत काम करत असल्याचे ते म्हणाले. भारताच्या मिशन LiFE [पर्यावरणासाठी जीवनशैली] कडे निर्देश करत, त्यांनी जागतिक समुदायाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या "प्लांट4मदर" [एक पेड माँ के नाम] या वृक्षारोपण मोहिमेत सामील होण्याचे, आणि प्रत्यक्ष सहभागाने आणि जागतिक उत्तरदायित्वाने ही एक लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथच्या समस्यांकडे, विशेषतः आफ्रिकेच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. आपल्या जी-20 अध्यक्षतेच्या कार्यकाळात आफ्रिकन महासंघाला स्थायी सदस्य बनवण्यात आले ही बाब भारतासाठी अतिशय सन्मानाची आहे, असे  त्यांनी सांगितले.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2025538) Visitor Counter : 63