वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीएम गतिशक्ती’ अंतर्गत नेटवर्क प्लानिंग गटाच्या 72व्या बैठकीत 3 महत्वाच्या प्रकल्पांचे मूल्यमापन
‘एनपीजी’ने केले रस्ते, रेल्वे आणि शहरी परिवहन प्रकल्पांचे मूल्यांकन
Posted On:
15 JUN 2024 10:19AM by PIB Mumbai
12 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे नेटवर्क प्लानिंग गटाच्या (NPG) 72व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (DPIIT) अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत तीन प्रमुख प्रकल्पांवर भर देण्यात आला. त्यामध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH), रेल्वे मंत्रालय (MoR) आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश होता. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्याच्या (NMP) सिद्धांतांना अनुसरून हे प्रकल्प आहेत का, याचे मूल्यांकन करण्यात आले.
या प्रकल्पांचे मूल्यांकन आणि त्यांचे संभाव्य परिणाम खालीलप्रमाणे आहेतः
1. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे (MoRTH) जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प
या प्रकल्पामध्ये रफियाबाद ते चमकोट या NH-701 च्या 51 किमी विभागाचे बांधकाम आणि अद्ययावतीकरण यांचा समावेश आहे. ग्रीनफिल्ड (14.34 किमी) आणि ब्राउनफिल्ड (36.66 किमी) या दोन्ही प्रकारच्या विकासासह, या प्रकल्पासाठी 1,405 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दर्जासुधारणा केलेला हा मार्ग कुपवाडा, चौकीबाल आणि तंगधर यांसारख्या गावांसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ करेल, ज्यामुळे संरक्षण दलांसाठी लॉजिस्टिक पाठबळात सुधारणा होईल आणि आरोग्य, शिक्षण आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण करून सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सुधारणा करेल.
2. रेल्वे मंत्रालायाचा आंध्र प्रदेशातील गुडुर-रेनिगुंटा तिसरा रेल्वे मार्ग
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील गुडुर आणि रेनिगुंटा यांच्यामधील तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीअंतर्गत 83.17 किमी मार्गाची बांधणी अपेक्षित असून सध्याच्या दुपदरी मार्गाची क्षमता दुप्पट करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे. अंदाजे 884 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीच्या क्षमतेत सुधारणा होईल आणि त्यासाठी 36.58 हेक्टर जमिनीची गरज आहे.पायाभूत सुविधांच्या दर्जासुधारणेत नवे पूल, विस्तारित अंडरपास आणि अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणालीचा समावेश असेल,त्यामुळे या प्रदेशातील आर्थिक व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
3. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा (MoHUA) महाराष्ट्रातील पुणे मेट्रो लाईन विस्तार प्रकल्प
पुण्यातील वनाझ ते रामवाडी पर्यंत परिचालित मेट्रो कॉरिडॉरचा विस्तार करण्याचे या MoHUA प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामध्ये वनाझ-रामवाडी मेट्रो कॉरिडॉरच्या पूर्व आणि पश्चिमेकडील दोन मार्गांचा विस्तार समाविष्ट आहे. पश्चिमेकडील विस्तार वनाज ते चांदणी चौकापर्यंत 1.12 किमीचा उन्नत विभाग आहे, तर पूर्वेकडील विस्तार रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडीपर्यंत 11.63 किमीचा उन्नत विभाग आहे. या उन्नत मेट्रो कॉरिडॉरची एकूण लांबी 12.75 किमी असून त्याच्या उभारणीसाठी अंदाजे 3,757 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
2027 पर्यंत या मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या 3.59 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि 2057 पर्यंत ती 9.93 लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या विस्तारामुळे मध्यवर्ती पुण्याला झपाट्याने वाढणाऱ्या उपनगरांशी जोडले जाईल, प्रवासाचा वेळ आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल.
या बैठकीदरम्यान सर्व प्रकल्पांच्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या सिद्धांतांसोबतच्या एकात्मिकरणाचे मूल्यमापन करण्यात आले.
सामाजिक-आर्थिक लाभ, सुधारित कनेक्टिव्हिटी, प्रवास खर्चात कपात आणि कार्यक्षमतेत वाढ यावर भर देण्यात आला. एकंदर परिवहन आणि लॉजिस्टिक्स जाळ्यामध्ये वाढ करून मल्टीमोडल एकात्मिकरण करणे हा देखील या प्रकल्पांचा उद्देश आहे.
विविध परिवहन प्रकल्पांचे एकात्मिकरण करून सामाजिक-आर्थिक लाभ देणारे आणि जीवन सुकर करणारे हे प्रकल्प राष्ट्रउभारणीत मध्यवर्ती भूमिका बजावण्याची आणि त्याद्वारे या प्रदेशातील एकंदर विकासामध्ये योगदान देण्याची अपेक्षा आहे.
***
S.Pophale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025500)
Visitor Counter : 75