नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
“हवाई वाहतुकीत सुलभता निर्माण करण्याला प्राधान्य,विमान प्रवास प्रत्येक नागरिकासाठी सहज उपलब्ध आणि सोयीचा करणार” – नायडू
Posted On:
13 JUN 2024 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2024
केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार आज नवी दिल्ली इथे स्वीकारला. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई वाहतूक सचिन वुमलूनमंग वुअलनाम यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण आभारी आहोत, असे यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नायडू म्हणाले.
प्रत्येक नागरिकाला विमान प्रवास सहज शक्य आणि सोयीस्कर होईल अशी सुलभता हवाई वाहतुकीत आणण्याला मंत्रालयाचे प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले. हवाई वाहतुकीचे फायदे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या स्तरांवरील शहरांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे नायडू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या विचारधारेला अनुसरत नायडू म्हणाले, “भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात त्वरेने प्रगती करण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून तो अंमलात आणणार आहोत. भारत 2047 साली स्वातंत्र्यांची शताब्दी साजरी करेल तोवर विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी हा आराखडा ही एक पायरी ठरेल.” विमान प्रवासाच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. प्रवाशांना विमान प्रवासाबाबत असलेल्या चिंता दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांचा वापर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मंत्रालयाच्या सर्व धोरणात्मक निर्णयांच्या प्राधान्यक्रमावर प्रवाशांची सोय व प्रवासाचा आरामदायी अनुभव असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
देशांतर्गत विमान वाहतुकीच्या बाजारपेठेत भारताला जगात आघाडीचे स्थान मिळवून देण्याप्रती सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्र्यांनी केला.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025157)
Visitor Counter : 111