संरक्षण मंत्रालय
कारगिल विजयाच्या 25 वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याची ‘डी5’ मोटरसायकल मोहीम’
Posted On:
12 JUN 2024 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2024
कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली म्हणून, भारतीय लष्कराने आज संपूर्ण भारत मोटारसायकल मोहिमेला सुरुवात केली आहे. 1999 च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त ह्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या शूर सैनिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि वारसा यांचे दर्शन या मोहिमेतून घडणार आहे.
पूर्वेला दिनजान,पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेला धनुषकोडी-अशा प्रत्येकी आठ मोटारसायकलस्वारांच्या तीन पथकांनी देशाच्या तीन कोपऱ्यांतून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली आहे. हे मोटारसायकलस्वार विविध भूप्रदेश आणि आव्हानात्मक मार्ग पार करुन आपल्या सशस्त्र दलांच्या एकता आणि लवचिकतेचे प्रतीक दर्शवतील. मोटारसायकलस्वार मार्गात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कारगिल युद्धातील वीर आणि वीर महिला यांच्यापर्यंत पोहोचतील, त्याचबरोबर युद्ध स्मारकांवर श्रद्धांजली वाहतील आणि तरुणांना भारतीय सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतील.
दिनजान ते दिल्ली सुमारे 2,489 किमी, द्वारका ते दिल्ली सुमारे 1,565 किमी तर धनुषकोडी ते दिल्ली मार्ग सुमारे 2,963 किमी आहे.
26 जून रोजी ही पथक दिल्लीत एकत्र येतील आणि दोन वेगवेगळ्या मार्गांनी द्रासकडे जातील. या मोहिमेचा समारोप द्रास येथील गन हिल येथे होईल, हे ठिकाण कारगिल युद्धादरम्यानच्या सामरिक महत्त्वासाठी इतिहासात कोरले गेले आहे.या मोहिमेचा शेवटचा टप्पा केवळ शौर्याच्या मार्गांचा मागोवा घेणार नाही तर आपल्या सैनिकांच्या निःस्वार्थ वृत्ती आणि समर्पणाची आठवणही करुन देईल.
सर्व प्रमुख ठिकाणी ध्वजवंदन समारंभ प्रख्यात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केले जातील ज्यामध्ये वरिष्ठ लष्करी अधिकारी, दिग्गज, वीर, वीर महिला आणि प्रतिष्ठित अतिथींचा समावेश असेल आणि ते मोटारसायकलस्वारांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देतील.कारगिल युद्धातील वीर त्याच बरोबर वीर महिलांनाही युद्धादरम्यान त्यांच्या त्याग आणि अतुलनीय पाठिंब्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
या मोहिमेचे नेतृत्व तोफखाना रेजिमेंटकडून केले जात आहे ज्यांनी ऑपरेशन विजयमध्ये यश मिळविण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. हे मोटारसायकलस्वार देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करत असताना ते त्यांच्यासोबत शौर्य, त्याग आणि देशभक्तीच्या गाथा घेऊन जातील. ही मोहीम केवळ आदरांजली नसून भारतीय लष्कराच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024801)
Visitor Counter : 111