माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 च्या आयोजनात दिव्यांगसुलभता केंद्रस्थानी


मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष चित्रपट सत्राचे आयोजन

Posted On: 12 JUN 2024 5:58PM by PIB Mumbai

मुंबई, 12 जून 2024

चित्रपटांचा आनंद समाजातील विविध घटकांना घेता येईल, अशाप्रकारे 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 च्या आयोजन असावे यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) स्वयंम या स्वयंसेवी संस्थेशी भागीदारी केली आहे. स्वयंम ही दिव्यांग सुलभता आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी समर्पण भावनेने काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यालाच अनुसरून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचे ठिकाण हे सर्व सिनेरसिकांच्या वावर आणि सोयी सुविधांच्यादृष्टीने सुलभतेचे केंद्र रहावे या उद्देशानेच स्वयंम या संस्थेसोबत भागिदारी केली गेली आहे. भागिदारीच्या या प्रयत्नाव्यतिरिक्त दिव्यांग व्यक्तिंना सिनेमांचा मनमोकळा आनंद घेता यावा यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये 'दिव्यांगजन फिल्म्स' हे विशेष सिनेमा सत्रही चालवले जाणार आहे.

18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - चित्रपट विभागाच्या (फिल्म्स डिव्हिजन) संकुलात होणार आहे. अशावेळी महोत्सवाच्या आयोजनाचे ठिकाण म्हणून हा संपूर्ण परिसर वावराच्यादृष्टीने दिव्यांगस्नेही असावा, यासाठी स्वयंम या संस्थेच्या भागिदारीत या परिसरात  संरचनात्मक आणि पायाभूत सोयीसुविधांमध्ये आवश्यक ते बदल केले जात आहेत, आणि या सोबतच दिव्यांग सुलभतेच्या मानकांच्या अनुसरून आजवर आखल्या गेलेल्या सर्वोत्तम उपाययोजनांचाही अवलंब केला जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच, आयोजनाचे ठिकाण वावराच्यादृष्टीने दिव्यांग सुलभ असावे या मुद्दाला सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. आयोजकांच्या या प्रयत्नामुळे चित्रपट महोत्सवांच्या आयोजनात नवा मानदंड प्रस्थापित होणार आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाचा दिव्यांग सुलभता भागीदार  या नात्याने स्वयंम या संस्थेने मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 चे आयोजन हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि येणाऱ्या सर्वच सिनेरसिकांच्या वावर आणि सोयीसुविधांच्यादृष्टीने सुलभ असेल याची सुनिश्चित करण्यासाठी खूपच प्रयत्नपूर्वक काम केले आहे. यासाठी स्वयंम या संस्थेने महोत्सवाच्या आयोजनाचे ठिकाण असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) संकुल परिसराचे तपशीलवार दिव्यांग सुलभता परिक्षण केले. यातून दिव्यांगसुलभता वाढवण्यासाठी दृष्टीने जागतिक सर्वोत्तम उपायोजनांना अनुसरत  नेमक्या उपाययोजना हाती आल्या.

या महोत्सवाच्या आयोजनादरम्यान आदरतिथ्यात सर्वसमावेशकता आणि भावनाशीलतेचे मूल्य प्रतिबिंबित व्हावे यादृष्टीने पहिल्यांदाच महोत्सवाच्या आयोजनात गुंतलेल्या संपूर्ण चमूमध्ये याविषयी संवेदनशीलतेची जाणिव निर्माण व्हावी याकरता, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच तर "यंदा आम्ही महोत्सवाच्या आयोजनाचे ठिकाण दिव्यांग सुलभ असेल याची सुनिश्चिती करण्याबरोबरच  महोत्सवाच्या आयोजनात गुंतलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला, महोत्सवासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींसोबत नेमके कसे वागावे - सहकार्य करावे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल याचीही सुनिश्चिती करणार आहोत",अशी ग्वाही देखील महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार यांनी दिली आहे.

स्वयंम या संस्थेच्या वतीने महोत्सवाला सुरूवात होण्याआधी 13 जून 2024 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजन ठिकाणाच्या प्रांगणात स्वयंसेवकांमध्ये दिव्यांग सुलभतेविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी  विशेष मार्गदर्शनपर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात वरिष्ठ अधिकारी, भागधारक, स्वयंसेवक आणि कर्मचारी वर्गासह महोत्सवाच्या आयोजन चमूमध्ये सहभागी असलेल्या 120 पेक्षा जास्त सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण सत्रात सन्मानाधारीत शिष्टाचार आणि पारिभाषिक शब्दावलीविषयी जागरूकता आणि आकलन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.  या प्रशिक्षणामुळे स्वयंसेवकांना चित्रपट रसिक आणि महोत्सवासाठी आलेल्या व्यक्तिंसोबत विशेषत:  दिव्यांगत्वाची लक्षणे खुलेपणाने न दिसणाऱ्या दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासह वावरण्यास त्रास होत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत संवाद साधण्याच्या प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे.

स्वयंसेवकांमध्ये दिव्यांग सुलभतेविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीच्या या  विशेष मार्गदर्शनपर प्रशिक्षण सत्रात दिव्यांगत्व म्हणजे कायहे समजून घेणे, शारिरीक अक्षमता आणि दिव्यांगत्वामधील फरक, दिव्यांगजन अधिकार  कायदा 2016 नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार समजून घेणे, दिव्यांगत्वाचे स्वरुप - प्रारुप, अडथळामुक्त वातावरण म्हणजे कायदिव्यांगत्व शिष्टाचार आणि योग्य पारिभाषिक शब्दावलीच्या वापरासह अडथळ्यांबाबतची उदाहरणे अशा व्यापक मुद्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. 

यासोबतच या प्रशिक्षण सत्रात सहभागी होणारे सदस्य, वावरण्यात अडचणी येत असलेल्या व्यक्तींना  साथ देण्याचा अनुभव घेणार आहेत. त्यामुळे त्यांना अशा व्यक्तींना येणाऱ्या अडचणी समजून घेता येणार आहेत. त्यानंतर ते आपले हे अनुभव आणि त्यांना मिळालेली शिकवण एकमेकांसोबत सामाईक करण्यासाठी गट संवाद सत्रातही सहभागी होणार आहेत.

प्रवेशसुलभता  हा मूलभूत अधिकार आहे आणि स्वयंम   सर्वांना सामावून घेण्यासाठी वचनबद्ध आहे. चित्रपट महोत्सवात सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी मिफ्फ 2024 आणि स्वयम यांच्यातील सहयोग एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. असे स्वयंमच्या संस्थापक-अध्यक्ष स्मिनू जिंदाल यांनी सांगितले. "दिव्यांग  सुलभतेला  प्राधान्य देऊन आम्ही दिव्यांगांसाठी महोत्सवाची दारे खुली करत आहोतच त्याचबरोबर विविधतेचा सन्मान करून भविष्यात अधिक समावेशकता येईल यासाठीचा मार्ग मोकळा करत आहोत."

18 व्या मिफ्फ 2024 मधील काही स्क्रिनिंगची रचना दिव्यांग व्यक्तींना चित्रपट पाहता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल, अशी केली आहे. 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सगळ्यांना आनंद घेता येईल अशा दृष्टीने  चित्रपट प्रदर्शित केले जातील . भारतीय सांकेतिक भाषेतील चित्रपट आणि श्रवण विकलांग असलेल्या प्रेक्षकांसाठी क्लोज्ड कॅप्शन आणि दृष्टिहीनांसाठी ऑडिओ वर्णन असलेले चित्रपटदेखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. तसेच भारतीय सांकेतिक भाषेचा वापर करून नृत्यासह ‘क्रॉस ओव्हर’ हा चित्रपट दाखवला जाईल, असे 18व्या मिफ्फचे  संचालक प्रितुल कुमार यांनी पूर्वतयारीविषयक पत्रकार परिषदेत  सांगितले.

दिव्यांगजन या शीर्षकाखाली दिव्यांगजनासाठी विशेष चित्रपट पॅकेज आहे. याअंतर्गत चार चित्रपट/भाग 19 जूनला मिफ्फमध्ये बघायला मिळणार आहेत. ते चित्रपट आहेत  –

1. द क्रॉसओव्हर (आयएसएल/इंग्रजी - 21 मिनिटे) मेथिल देविका

द क्रॉसओव्हर हा एक नृत्याधारित लघुपट आहे. भारतीय सांकेतिक भाषा आणि मोहिनीअट्टमची सौंदर्यात्मक सांकेतिक भाषा अशा  मिलापातून नर्तक नृत्य करून कथा उलगडून दाखवतात. मोहिनीअट्टम हा केरळमधील भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे.

2. लिटल कृष्णा (इंग्रजी) भारतीय सांकेतिक भाषेसह

भाग 3: हॉरर केव्ह (22 मिनिटे) आणि भाग 8: चॅलेंज ऑफ द ब्रूट (23 मिनिटे)

भगवान श्रीकृष्ण वृंदावनातील वनात सवंगड्यांबरोबर बाललीलेत मग्न असताना आणि त्यांच्याशी खेळण्याचा आनंद लुटत असताना कंसाने पाठवलेला अघासुर नावाचा राक्षस त्यांना मारण्यासाठी तिथे येतो.तसेच वृंदावन गावात अरिष्टासुर नावाचा एक राक्षस धुमाकूळ घालून रहिवाशांना घाबरवतो.त्यामुळे  ते कृष्णाकडून संरक्षण मागतात.अर्थातच कृष्ण असुरांचा सामना करतो,सहजतेने त्यांचा पराभव करतो.

3. जय जगन्नाथ (हिंदी - 36 मिनिटे) श्रीपाद वरखेडकर

भगवान जगन्नाथ  हे जगन नावाच्या मुलाचा अवतार घेतात. त्यांचा एकनिष्ठ अनुयायी बलराम. त्यांच्या साहसाचे वर्णन यात आहे. पौराणिक आणि मैत्रकथा यांची सुरेख सांगड घालत ही लोककथा पुढे सरकते.

मिफ्फ 2024 ची दिव्यांगसुलभतेसंदर्भातली बांधिलकी ही या चित्रपट महोत्सवात प्रत्येकजण पूर्णपणे सहभागी होऊ शकेल अशा सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देण्यात तिचे समर्पण अधोरेखित करते. स्वयंमच्या सहयोगातून मिफ्फ ने अन्य महोत्सवांसमोर एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे की दिव्यांगसुलभता  केवळ साध्य करण्यायोग्य नव्हे तर सर्व उपस्थितांचे अनुभव खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याकरिता गरजेची आहे.

18 व्या मिफ्फ 2024 विषयी

दक्षिण आशियातील नॉन-फिचर फिल्म करिता सर्वात जुना आणि सर्वात भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिफ चे माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची कला प्रदर्शित करण्याचे हे 18 वे वर्ष आहे. वर्ष 1990 मध्ये सुरू झालेला आणि आता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आयोजित केला जाणारा मिफ जगभरातील सिनेप्रेमींना आकर्षित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात विकसित झाला आहे.

18 वा मिफ हा आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या विस्तृत निवडीसह वर्क इन प्रोग्रेस लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट्स आणि व्ह्यूइंग रूम यांचा समावेश असणाऱ्या पहिल्याच डॉक्युमेंटरी फिल्म बाजार सारख्या अत्युच्च दर्जाच्या कार्यक्रमांच्या विस्तृत श्रेणीद्वारे चित्तवेधक ठरेल. वरिष्ठ वॉर्नर ब्रदर ॲनिमेटरद्वारे एक विशेष ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स पाइपलाइन कार्यशाळा देखील आयोजित केली जात आहे. प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांमध्ये अध्ययनाची गतिशील देवाणघेवाण करण्यासाठी पॅनल चर्चा, ओपन फोरम, फायरसाइड चॅट आणि शीर्ष चित्रपट उद्योग तज्ञांच्या मास्टरक्लास सारखे खास निवडक कार्यक्रम देखील आहेत. या व्यतिरिक्त पत्रकार परिषदा आणि निवडक मुलाखतींद्वारे माध्यम प्रतिनिधींना त्यांच्या आवडत्या माहितीपट निर्माते आणि कलाकारांना जवळून आणि वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी https://miff.in ला भेट द्या.

PIB Team MIFF | N.Chitale/Tushar/Prajna/Vasanti/Priti | 04

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2024795) Visitor Counter : 69