संरक्षण मंत्रालय
डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीतून नियमित अभ्यासक्रमाचे 154 आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 137 असे एकूण 394 ऑफिसर कॅडेट उत्तीर्ण
Posted On:
08 JUN 2024 3:13PM by PIB Mumbai
उत्तराखंडमधील डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीमधून 8 जून 2024 रोजी, नियमित अभ्यासक्रमाचे 154 तर तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 137 असे एकूण 394 ऑफिसर कॅडेट्स उत्तीर्ण झाले. यामध्ये 10 मित्र देशांतील 39 अधिकारी कॅडेट्सचाही समावेश होता.
जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नॉर्दन कमांड लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी पासिंग आऊट परेडचे निरिक्षण केले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अधिकारी कॅडेट्सचे त्यांनी अभिनंदन केले.
“हे संचलन म्हणजे तुमच्या प्रशिक्षणाची समाप्ती आणि व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले. तुमच्या आयुष्यात एकदाच येणारा हा क्षण भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुम्ही राष्ट्र सेवेची घेतलेली प्रतिज्ञा आणि तुम्ही तुमच्या राष्ट्रासाठी घेतलेली शपथ अत्यंत पवित्र असून यापुढे तुमच्या आयुष्यात इतर कर्तव्यांच्या आधी ही वचनबद्धता असेल, असे ते म्हणाले. आज तुम्ही ज्या अभिमानाने आणि खंबीरपणाने उभे आहात, ही वस्तुस्थिती तुम्ही अधिकारी होण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाची आणि परिश्रमाची साक्ष आहे,” असे संचलन निरिक्षण अधिकाऱ्यांनी या कॅडेट्सना सांगितले.
संचलन निरिक्षण अधिकाऱ्यांनी युद्धाच्या पद्धतीत वेगाने होत असलेल्या बदलांवर भर देत ते म्हणाले की, युद्धामध्ये अंतराळ, सायबर आणि ज्ञान व कौशल्याचा वापर ही समकालीन वास्तविकता आहे आणि माहिती युद्ध, ड्रोन, स्वायत्त प्रणाली, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा गैरवापर तसेच मनुष्य-मशीन यांनी एकसंध बनून काम करणे ही आताच्या काळातील सामान्य बाब आहे. हे युद्ध कल्पना, बुद्धी आणि नवोन्मेषाचे युद्ध असल्याचे सांगत त्यांनी अधिकारी कॅडेट्सना या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेहमी सज्ज राहण्याचे आवाहन केले. "शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक चपळता, चिकित्सक विचारसरणी, तंत्रज्ञान सामर्थ्य आणि बदलत्या परिस्थितींत झटपट प्रतिसाद ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल," असेही ते म्हणाले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023603)
Visitor Counter : 69