माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच आयुष मंत्रालय सचिवांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या व्यापक प्रसारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा घेतला आढावा


यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार

Posted On: 07 JUN 2024 5:10PM by PIB Mumbai

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी येत्या  21 जून रोजी साजरा होणार असलेल्या आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या व्यापक प्रसारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आज आढावा घेतला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम विभागाकडून योगाभ्यासाच्या सरावामुळे होणाऱ्या लाभांसह, कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) (योगाभ्यासाच्या सरावाला पहिल्यांदाच सुरुवात करणार असलेल्यांसाठी योगाभ्यासाच्या सरावाला आधुनिक काळानुसार दिलेला नवा स्पर्श ) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्याची तयारी केली आहे. याअनुषंगाने पत्र सूचना कार्यालय, प्रसार भारती, नव माध्यमे विभाग यांसह मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागांच्या वतीने अनेक महत्वाच्या उपक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे.

भारताची सार्वजनिक प्रसारण सेवा असलेल्या प्रसार भारतीद्वारे दूरदर्शन आणि आकाशवाणी प्रसारण सेवेच्या अनेकविध माध्यमांद्वारे विविध कार्यक्रमांचे प्रक्षेपण आणि प्रसारण केले जाणार आहे. याअंतर्गत दूरदर्शनवर सकाळच्या सत्रातील विशेष कार्यक्रमांच्या थेट  प्रक्षेपणासोबतच योगाभ्यास तज्ञांच्या मुलाखतींचेही प्रसारण केले जाणार आहे.

आपली जीवनपद्धती आणि लोकांच्या सर्वांगीण आरोग्यसंपन्नतेचे  माध्यम म्हणून योगाभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने विशेष कार्यक्रमांचे आकाशवाणीवरून प्रसारण केले जाणार आहे.  आयुष मंत्रालयांतर्गतच्या स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त असलेल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योगाभ्यास संस्थेच्या सहकार्याने हे कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. याच अनुषंगाने आयुष मंत्रालयाने एक 'योग गीत' ही तयार केले आहे. हे गीत माध्यम जगताच्या सर्व उपलब्ध व्यासपीठांवरून सामायिक केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान (AYDMS) यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून खाजगी माध्यम संस्थांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सुरूच ठेवला जाणार आहे. याअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडिओ या व्यासपीठांवरून माध्यम समूह / कंपन्यांनी योगाभ्यासाचे  महत्व अधोरेखीत करण्याच्या दृष्टीने प्रचार प्रसारात दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिनांक 09 जून .2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान  पुरस्काराचे आयोजन केले आहे. याअंतर्गत 'वृत्तपत्रांमधून योगाभ्यासाविषयीचे सर्वोत्तम वृत्तांकन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून (दूरचित्रवाणी) योगाभ्यासाविषयीचे सर्वोत्तम वार्तांकन, आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून (रेडिओ) योगाभ्यासाविषयीचे सर्वोत्तम प्रसारण अशा विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. या वर्षीचा सोहळा पार पडल्यानंतर यावर्षीचे आणि मागच्या वर्षीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नव माध्यमे विभागाद्वारे कुटुंबाने एकत्रित योगाभ्यासाचा सराव करण्याची अर्थात योगा विथ फॅमिली स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समाजमाध्यम अकाउंटवरून घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत नागरिकांना त्यांनी योग गीताचा वापर करून, कुटुंब एकत्रितपणे योगाभ्यासाचा सराव करत असल्याचे रील्स अपलोड करण्याचे आव्हान देण्यात आले आहे. यासोबतच योगाभ्यास प्रश्नमंजुषा आसनाचे नाव ओळखा  ही स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. या सगळ्यासोबतच आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या निमीत्ताने विशेष पॉडकास्टही प्रसारित केले जाणार आहे.

या सगळ्याला जोडून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विविध माध्यम विभाग आणि संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाआधी होणारे सह उपक्रम म्हणून योगाभ्याशी संबंधित विविध सत्रे / कार्यशाळांचे आयोजन ही केले जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांमध्ये योगाभ्यास आणि निरोगी आयुष्याशी संबंधित आरोग्यविषयक बाबींचा प्रचार प्रसार करता यावा यासाठी या वर्षी योगाभ्यास शिबिरे, चर्चासत्रे असे उपक्रमही राबवले जाणार आहेत.

21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित झाला आहे, तेव्हापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याची व्याप्ती आणि दर्जा वाढताच राहिला आहे. या अनुषंगानेच योगाभ्यासाला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कायमच आघाडीवर राहिले आहेत.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023511) Visitor Counter : 51