विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर च्या 'फेनोम इंडिया' प्रकल्पाने 10,000 नमुने गोळा करून गाठले लक्ष्य, अचूक वैद्यकशास्त्रातील नव्या युगाचे उद्दिष्ट
भारतातील हृदय-चयापचय आजारांसाठी उत्तम अंदाज प्रारुप सक्षम करण्यासाठी प्रथमच संपूर्ण भारतातील विस्तृत अभ्यास : वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ, सीएसआयआर - आयजीआयबी
Posted On:
03 JUN 2024 7:35PM by PIB Mumbai
गोवा, 3 जून 2024
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) त्यांच्या नव्या पथदर्शी विस्तृत आरोग्य देखरेख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा, 'फेनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहॉर्ट नॉलेजबेस' (PI-CheCK) च्या यशस्वी निष्कर्षाची घोषणा केली आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानिमित्त आनंद साजरा करण्यासाठी सीएसआयआरने आज, 3 जून 2024, रोजी गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था येथे 'फेनोम इंडिया अनबॉक्सिंग 1.0' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. सीएसआयआर - आयजीआयबी (CSIR- IGIB) चे संचालक डॉ. सौविक मैती, सीएसआयआर - राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (NIO) चे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह, सीएसआयआर - आयजीआयबी (CSIR- IGIB) मधील वरिष्ठ प्राचार्य शास्त्रज्ञ, डॉ. शांतनु सेनगुप्ता, सीएसआयआर मधील वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद सिंग आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इंटेलिजेंट सेन्सर्स अँड सिस्टीमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वीरेन सरदाना यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतीय आरोग्यसेवेसाठी हा एक महत्त्वाचा दिवस होता अशी प्रतिक्रिया माध्यमांना संबोधित करताना सीएसआयआर- इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शांतनु सेनगुप्ता यांनी दिली. भारतामध्ये हृदय-चयापचय रुग्णांच्या संख्येचा मोठा भार असूनही अशा घटनांची कारणे पूर्णपणे स्पष्ट नाहीत हे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले. “पश्चिमेकडील राष्ट्रांमधील जोखीम घटक भारतातील जोखीम घटकांसारखे असू शकत नाहीत. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी महत्त्वाचा असणारा घटक दुसऱ्या व्यक्तीसाठी तितका महत्त्वाचा असू शकत नाही. त्यामुळे आपल्या देशातील सर्वांसाठी एकाच प्रकारचा उपचार ही संकल्पना रद्दबातल ठरवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. हृदय-चयापचय आजार, विशेषत: मधुमेह, यकृताचे आजार आणि हृदयविकारासाठी वर्धित अंदाज प्रारुप विकसित करण्याच्या उद्देशाने प्रथमच संपूर्ण भारतात विस्तृत अभ्यास केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. या आजारांमध्ये अनुवांशिक आणि जीवनशैली या दोन्ही घटकांमुळे अधिक धोका निर्माण होत असल्याने असा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
10,000 नमुन्यांचे लक्ष्य पार करण्यात अध्ययन यशस्वी झाल्याचे सांगत इतर संस्थांनीही अशाच प्रकारची नमुना संकलन मोहीम राबवण्याचे आवाहन वरिष्ठ प्रधान वैज्ञानिकांनी केले. सीएसआयआरने नमुना संकलनासाठी एक किफायतशीर मानक प्रणाली विकसित केली असल्याचे उद्धृत करताना ते म्हणाले, “समजा, आम्हाला सुमारे 1 लाख किंवा 10 लाख नमुने मिळाले, तर ते आम्हाला देशातील सर्व प्रमुख मापदंडांची पुनार्व्याख्या करण्यास सक्षम करेल.”
7 डिसेंबर 2023 रोजी प्रारंभ झालेल्या, PI-CHeCK प्रकल्पाचे उद्दिष्ट भारतीयांच्या असंसर्गजन्य (कार्डिओ-मेटाबॉलिक) हृदय आणि चयापचय संबंधित आजारांमधील जोखीम घटकांचे मूल्यांकन करणे हे आहे. या अनोख्या उपक्रमात आजमितीस सुमारे 10,000 सहभागींची नोंदणी आहे, ज्यांनी स्वेच्छेने सर्वसमावेशक आरोग्यविषयक माहिती दिली आहे. या सहभागींमध्ये 17 राज्ये आणि 24 शहरांमधील सीएसआयआर कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांचा समावेश आहे. संकलित डेटामध्ये क्लिनिकल प्रश्नावली, जीवनशैली आणि आहाराच्या सवयी, मानवमितिक मोजमाप, इमेजिंग/स्कॅनिंग डेटा आणि विस्तृत जैवरासायनिक आणि रेण्विय डेटा यासह मापदंडांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे.
भारतीय लोकांमधील हृदय आणि चयापचय संबंधित विकारांच्या वाढत्या जोखीम आणि घटना समजून घेणे आणि या प्रमुख रोगांच्या जोखमीची वर्गवारी, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी नवीन धोरणे विकसित करणे महत्त्वाचे आहे. सध्या, यापैकी बहुतेक जोखीम अंदाज अल्गोरिदम (कार्यसूची) कॉकेशियन लोकसंख्येच्या साथीच्या डेटावर आधारित आहेत आणि ते भारतीय लोकसंख्येसाठी जातीय विविधता, विविध आनुवंशिक गुणधर्म आणि आहाराच्या सवयींसह जीवनशैलीच्या पद्धतींमुळे फारसे अचूक ठरत नसल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे भारत-विशिष्ट जोखीम अंदाज अल्गोरिदम विकसित करणे महत्त्वाचे आहे.
फेनोम इंडिया प्रकल्प सीएसआयआर च्या पूर्वानुमान (प्रीडिक्टिव), वैयक्तिकृत (पर्सनलाइझ्ड), सहभागी (पार्टिसिपेटरी) आणि प्रतिबंधात्मक (प्रिव्हेंटिव्ह) आरोग्यसेवेद्वारे अचूक औषध विकसित करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भारतीय लोकसंख्येच्या अनुषंगाने सर्वसमावेशक फेनोम डेटाबेस तयार करून, देशभरातील समान उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे, ज्यामुळे जोखीम अंदाज अल्गोरिदम अधिक अचूक आणि भारताच्या विविध अनुवांशिक आणि जीवनशैलीशी अनुरूप असल्याची खातरजमा करतील.
* * *
PIB Panaji | S.Kakade/Shraddha/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022671)
Visitor Counter : 110