भारतीय निवडणूक आयोग

18 व्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपत असताना, आपला, या जनतेच्या एकजुटीचा आवाज प्रतिध्वनी होऊन घुमतो आहे, आणि लोकशाहीची चाके फिरती ठेवत आहे


मतदानाची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार, राजकीय पक्ष, मतदान यंत्रणा आणि या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांचे मानले मनापासून आभार

Posted On: 01 JUN 2024 6:11PM by PIB Mumbai

 

भारताने आज इतिहास रचला. 18 व्या लोकसभेसाठी एप्रिल महिन्यात 19 तारखेपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाने या निवडणुकीला सुरुवात झाली आणि आज अखेरच्या 7 व्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपुष्टात आली. अठरावी लोकसभा स्थापन करण्यासाठी भारतीय मतदारांनी आपला अत्यंत मोलाचा, मतदानाचा हक्क बजावला. भारतीय लोकशाही आणि भारतीय निवडणुकांनी पुन्हा जादूमयी कामगिरी  केली आहे. भारताच्या  मतदारांनी जात, पंथ, धर्म, सामाजिक - आर्थिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार न करता पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे भारताचा मतदार हाच खरा विजेता ठरला आहे.

भारताचे मतदार त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आणि अनेक अडचणी असूनही, त्यावर मात करत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचले. या अशा सर्व मतदारांसमोर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्यासह निवडणूक आयोगाचे संपूर्ण व्यवस्थापन नतमस्तक आहे. केंद्रीय  निवडणूक आयोग अत्यंत प्रामाणिकपणे औपचारिकरित्या या सर्व मतदारांविषयी आभार आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे.

भारताच्या मतदारांनी आपल्या या अभूतपूर्व सहभागातून, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी, निवडणुक आधारित राजकीय व्यवस्थेत मत देण्याचा अधिकार सामान्य मतदारांना देताना दाखवलेला विश्वास अधिक दृढ केला आहे.

लोकशाहीच्या या महाभियानात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग भारताची लोकशाही आणि एकीची भावना अधिक बळकट करतो.

देशभरातील मतदारांना निर्विघ्न, शांततापूर्ण आणि उत्सवाचे वातावरण प्रदान करण्यासाठी, खडतर हवामान, खडतर भूप्रदेश, लॉजिस्टिक आव्हानांना तोंड देत आणि विविध भागात कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या  सुरक्षा दलांसह संपूर्ण निवडणूक यंत्रणेप्रति भारतीय निवडणूक आयोगाने कृतज्ञता व्यक्त केली आहे . 

भारतीय निवडणुकांचा केंद्रबिंदू असणाऱ्या  सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांचेही निवडणूक आयोगाने आभार मानले.

निवडणूक आयोगाने मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रसार माध्यमांना नेहमीच आपला सहयोगी मानले आहे.

वयाची शंभरी ओलांडलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि तृतीयपंथी यांनी दिलेल्या मतांचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्याचे मत लोकशाहीची पताका खांद्यावर घेऊन पुढे जाणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असेही आयोगाने म्हटले आहे. भारताच्या पुढच्या पिढीतील मतदार हा सहभाग  आणखी नव्या उंचीवर नेतील अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली.

निवडणुकीतील मतदानादरम्यान मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा दले यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही आणखी मजबूत झाली असून हे सर्वजण अत्यंत आदर आणि कौतुकास पात्र आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.  सामूहिक प्रयत्नांमुळे आपण भारतीय जनतेने लोकशाहीची चाके फिरती ठेवली आहेत.

***

S.Kane/T.Pawar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022464) Visitor Counter : 88